‘वृत्तपत्रातील बातमी ही प्रसिद्धीपत्रकापेक्षा खूप महत्त्वाची असते. वृत्तपत्रात बातमी आली की ते वृत्तपत्र ती बातमी हाच पुरावा आहे असे सांगते. त्यामुळे पत्रकारांनो, दबाव गट तुम्हालाही आमिष दाखवू शकतात. कृपया त्यांना बळी पडू नका. जे अन्याय्य आहे ते उघड केलेच पाहिजे..’ शोधपत्रकारितेतील पुलित्झर विजेते पत्रकार एरिक लिप्टन यांचा हा सल्ला सर्व शोधपत्रकारांना लागू आहे. कोलंबिया पत्रकारिता विद्यापीठाकडून जोसेफ पुलित्झर यांच्या नावाने दिले जाणारे हे पुरस्कार म्हणजे पत्रकारितेतील नोबेल मानले जाते.
एरिक लिप्टन यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६५ रोजी फिलाडेल्फियात झाला. पत्रकारितेचे शिक्षण व्हरमाँट विद्यापीठात झाले. १९९९ मध्ये ते न्यूयॉर्क टाइम्समध्ये आले. ते मूळ इतिहासाचे विद्यार्थी असल्याने त्यांनी विश्लेषणात्मक विचाराची सवय लावून घेणे जड गेले नाही. त्यांना पहिला पुलित्झर पुरस्कार १९९२ मध्ये हार्टफोर्ड कोरंट येथे काम करीत असताना हबल दुर्बिणीतील दोष दाखवून दिल्याबद्दल मिळाला होता. त्यांनी त्याआधी ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्येही काम केले होते. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये ते शहर वार्ताहर म्हणून काम करीत असताना २००१ मध्ये दहशतवादी हल्ला झाला. वर्ल्ड ट्रेड सेंटरचे मनोरे भस्म झाले, त्या वेळी त्यांचे स्थानिक वृत्तक्षेत्र जागतिक झाले. त्यांनी त्या हल्ल्याबाबत ‘सिटी इन द स्काय- द राइज अँड पॉल ऑफ  द वर्ल्ड ट्रेड सेंटर’ हे पुस्तक लिहिले. कतरिना वादळ, कॅपिटॉल हिलमध्ये क्लोरिनचा साठा अशी प्रकरणे त्यांनी हाताळली. आपली बातमी एकाच वेळी देश, न्यूयॉर्क टाइम्स व संपूर्ण जग या तीन वर्तुळांना भेदून जात होती असे ते सांगतात.
आपल्याकडे राडिया टेप प्रकरणात दबाव          गटांचा वापर झाला होता, पण वाईट म्हणजे काही पत्रकारच त्यात सामील होते. अलीकडे अमेरिकी आर्थिक मंदीत अनेक खासगी वकील, दबाव गटातील लोकांनी संपुट योजनेतील रकमा (बेलआउट पॅकेज) मिळवून देण्यात हात धुऊन घेतले. अमेरिकी काँग्रेस व लॉबिंग (दबाव गट) हे वृत्तक्षेत्र हाताळताना त्यांनी सरकारी महाधिवक्ते (वकील), अमेरिकी काँग्रेसचे नेते व दबाव गटातील लोक एकत्र येऊन न्यायाचा तराजू श्रीमंतांकडे कसा झुकवतात यावर ‘कोर्टिग फेवर’ वृत्तमालिका सादर केली होती. त्यासाठी एरिक लिप्टन यांना यंदाचा शोधपत्रकारितेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यासाठी त्यांनी नऊ महिने परिश्रम केले. त्यांच्या संस्थेनेही त्यांचे काम सुकर होण्यासाठी बराच खर्च केला होता.