मौन म्हणजे नेमकं काय, असाच खडा हृदयेंद्रनं टाकला, तेव्हा मौनाचा खरा अर्थ आपण जाणतो का, हा प्रश्न ज्ञानेंद्र आणि योगेंद्रच्या मनात उमटला. कर्मेद्र ताडकन म्हणाला..
कर्मेद्र – मौन म्हणजे गप्प बसणं, यापेक्षा आणखी काय अर्थ असणार? आता त्या मौनावरही तुम्ही तासन् तास चर्चा करणार असाल तर मात्र हद्दच झाली!
हृदयेंद्र – (हसत) एखाद्या गोष्टीचा अर्थ स्पष्ट होणंही तेवढंच गरजेचं असतं आणि त्यासाठी चर्चा अनिवार्य असते, मग ती मौनावरही का असेना! बरं, पण कर्मू म्हणाला, त्याप्रमाणे मौन म्हणजे गप्प बसणं, हाच अर्थ आपण गृहित धरतो..
कर्मेद्र – पण तोच अर्थ नाही का?
हृदयेंद्र – आहे ना! तोही अर्थ आहे, पण ‘गप्प बसणं’चा खरा अर्थ तरी आपण जाणतो का?
कर्मेद्र – मला वाटतं, आता मला गप्पच बसण्यावाचून पर्याय नाही!
हृदयेंद्र – (हसत) अरे चिडू नकोस! मी खरंच गंभीरपणे सांगतोय. आपण गप्प बसतो, पण आतून किती तगमग आणि किती कोलाहल सुरू असतो! आणि म्हणूनच मी म्हणतो, जोवर खरं मौन साधत नाही तोवर कोणतीही साधना खऱ्या अर्थानं पूर्णत्वास जाणार नाही. कितीही का जप-तप करा ना, कितीही प्राणायाम करा, कितीही ज्ञानोपासना करा, कितीही योगसाधना करा.. जोवर मौनावस्था ही खरी आंतरिक सहज स्थिती होत नाही, तोवर कोणतीही साधना पूर्णत्वास जातच नाही! मौनावस्थेतला जप हाच खरा जप आहे, मौनावस्थेतला प्राणायाम हाच खरा प्राणायाम आहे, मौनावस्थेतलं भजनच खरं भजन आहे.. पण त्यासाठी मौन म्हणजे काय, हे नीट जाणलं पाहिजे.. कर्मू म्हणाला त्याप्रमाणे चकार शब्दही न बोलणं, यालाच आपण मौन मानतो, पण मन, चित्त आणि बुद्धीत कोणतीही ‘मी’केंद्रित प्रतिक्रिया उमटत नाही, तेव्हाच खरं मौन साधतं तेच खरं मौन असतं!
कर्मेद्र – पण किती धोकादायक आहे हे! मेंदूच निकामी झालेला माणूस जसा हृदयक्रिया सुरू आहे, म्हणून जगत रहावा, तसंच नाही का हे? असल्या जगण्यात काय अर्थ आहे?
हृदयेंद्र – मी कोणत्या प्रतिक्रियात्मकतेबद्दल बोललो, ते नीट लक्षात घे. ज्या प्रतिक्रिया ‘मी’च्या आसक्तीतून उमटतात, मोह आणि भ्रमातून उमटतात त्या प्रतिक्रिया मला भ्रामक गोष्टींच्या आसक्तीतच अडकवत असतात. आता एखाद्या मनोरुग्णावर मानसिक उपचार करावे लागतात, ते कशासाठी? त्याची मनोधारणा बदलण्यासाठीच ना? कोणतं तरी भ्रामक भय त्याच्या मनात असतं, भ्रामक द्वेष असतो, भ्रामक आणि धोकादायक समजुतीचा पगडा असतो.  त्यातून त्याची मनोधारणा तयार झाली असते. त्या मनोधारणेतूनच त्याचं मानसिक खच्चीकरण होत असतं. तेव्हा मनानंच तयार केलेल्या गुंत्यातून मानसोपचारतज्ज्ञ त्याला बाहेर काढतो ना? हा गुंता भ्रामक प्रतिक्रियात्मकतेतूनच झाला असतो ना?
योगेंद्र – असा गुंता आपल्या प्रत्येकाच्या मनात असतोच. तो गुंता सोडविण्याचं आव्हान जो-तो आपापल्या परीनं पेलत असतोच. कोणाच्या मनात प्रेमभंगाचा गुंता असेल, कुणाच्या मनात परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याचा गुंता असेल, कुणाच्या मनात जवळच्या माणसाच्या वियोगाचा गुंता असेल.. आपल्या प्रत्येकाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर अशा गुंत्याला सामोरं जावं लागलंच आहे, नाही का?
हृदयेंद्र – वियोग वा मृत्यूचं सोडू एकवेळ, पण बरेचदा हा गुंता होतो कारण ‘हृदयी देवाचं’ नव्हे ‘मी’ आणि ‘माझे’चंच अहोरात्र चिंतन आहे म्हणून! या ‘मी’ आणि ‘माझे’च्या चिंतनामुळेच मन, चित्त, बुद्धी भ्रामक प्रतिक्रियात्मकतेनं व्याप्त असते. ही प्रतिक्रियात्मकता थांबवण्यासाठीच तर मौनाचा अभ्यास आहे!
योगेंद्र – हृदू तू सांगतोस त्यात तथ्य आहे.. ‘मौनाचा अभ्यास’ म्हणून आपण काही तासांचं मौन बाळगतो, पण तेवढय़ा वेळातही अंत:करणात प्रतिक्रियांचा किती कोलाहल सुरू असतो.. का उमटतात या प्रतिक्रिया? आमचं मन, चित्त, बुद्धी प्रतिक्रियाविवश कधी होतात? जेव्हा त्यांचं लक्ष्य आतऐवजी बाहेर सरकतं तेव्हाच!
हृदयेंद्र – बरोबर. परमात्मलयता आणि परमात्ममयतेऐवजी जगद्लयता आणि जगद्मयतेनं लिप्त अंत:करणाचं ‘मौन’ही बोलकंच तर असतं!
चैतन्य प्रेम