12 July 2020

News Flash

आपुली नवनवोन्मेषशालिनी अवनी!

नवनवी संसाधने वापरायला शिकत, नवनव्या अधिवासात शिरकाव करून घेत, विस्तारवादी जीवसृष्टीच्या उत्पादनाची, वैविध्याची पातळी सतत उंचावत गेली आहे..

| July 4, 2014 04:20 am

नवनवी संसाधने वापरायला शिकत, नवनव्या अधिवासात शिरकाव करून घेत, विस्तारवादी जीवसृष्टीच्या उत्पादनाची, वैविध्याची पातळी सतत उंचावत गेली आहे..
महिनाभर पावसाकडे डोळे लावून, जरा काळजीत बसावे लागले; कारण हे आहे एल निनोचे वर्ष. जेव्हा एल निनो नसतो, तेव्हा प्रशान्त महासागरातले पेरू देशाच्या पश्चिमेकडील पाणी गार असते, कारण त्या वेळी तिथे खोलातले पाणी वर उफाळून येते. या गार पाण्याबरोबर समुद्रतळावर साठलेली पोषक द्रव्ये वरती लोटतात. त्यांच्या जोरावर वनस्पतींचे भरपूर उत्पादन होते, त्यावर पोसलेल्या िझग्यांची भरभराट होते, हे िझगे खात मासे खूप वाढतात. मग मनुष्यप्राणी आणि मत्स्याहारी समुद्रपक्षीही खुशीत मासे पकडतात. समुद्रातल्या बेटांवर पक्ष्यांच्या विष्ठेतून फॉस्फरसयुक्त खत साठते आणि पेरूवासी खत विकून भरपूर कमावतात. एल निनोच्या वर्षी सगळेच मुसळ केरात जाते आणि पेरूवासी दु:खात चूर होतात. केवळ पेरूवासीच नाही, तर पुष्कळदा आपण भारतीयही. कारण सागराचे आणि वातावरणाचे असे काही दूरगामी परस्परसंबंध आहेत की एल निनोच्या वर्षी अनेकदा भारतालाही अवर्षणाचा फटका बसतो.
अशी आहे कुठून कुठे एकमेकांशी जोडलेल्या निसर्गचक्रांची लीला. या चक्रात एक कळीची भूमिका बजावणारे, प्रकाशाची ऊर्जा वापरणारे साधेसुधे सायनोबॅक्टेरिया तब्बल साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर अवतरले, तर आजचे मत्स्याहारी, आकाराने लाखोपट मोठे, वस्ताद पाणकावळे ऊर्फ कार्मोरान्ट अवतरले अवघ्या पंधरा-वीस कोटी वर्षांपूर्वी. या दीर्घ कालावधीत जीवसृष्टीचे वैविध्य बहरत राहिले आहे, वेगवेगळ्या परिसंस्थांतली – इकोसिस्टम्समधली – ऊर्जेची, प्राणवायू, फॉस्फरससारख्या पदार्थाची चक्रे अधिकाधिक समृद्ध होत राहिली आहेत.  
हे सगळे घडते निसर्गनिवडीतून. निसर्गनिवडीतल्या यशाची एक गुरुकिल्ली आहे- काही तरी नवे, वेगळे करून दाखवणे, ऊर्जेचे नवे स्रोत हाताळणे, नवनव्या अधिवासांत बस्तान बसवणे, नव्या गोष्टी आहारात आणणे, शत्रूंपासून बचावासाठी नवी शस्त्रे, नवे डावपेच वापरायला लागणे. प्रशान्त महासागरातल्या परिसंस्थेच्या इतिहासात या सगळ्यांची उदाहरणे पाहायला मिळतात. पावणेचार अब्ज वर्षांपूर्वी खोल समुद्रतळावर हायड्रोजन, लोह, गंधकांच्या रेणूंतली रासायनिक ऊर्जा वापरत जीव प्रगटले. याचा ठोस पुरावा आपल्यापाशी नाही, पण साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी सागरतळावर क्लोरोफिलच्या मदतीने प्रकाश हा ऊर्जेचा नवा स्रोत वापरू लागलेले सायनोबॅक्टेरिया फोफावू लागले होते याची खात्री आहे, कारण त्यांच्याभोवतीच्या चिकट आवरणात रेती चिकटून बनलेले जीवाश्म सापडले आहेत. सुरुवातीस आनुवंशिकतेचा आधार असलेल्या डीएनएची तोडफोड करणारे अल्ट्रा-व्हायोलेट किरण हे एक मोठे आव्हान होते. या काळी वातावरणात प्राणवायू अगदी नगण्य प्रमाणात होता आणि अल्ट्रा-व्हायोलेट किरणांना वातावरणातच शोषून घ्यायला प्राणवायूच्या तीन अणूंनी बनलेला ओझोनही नव्हता, पण पाणीही अल्ट्रा-व्हायोलेट किरण व्यवस्थित शोषून घेते. तेव्हा आरंभी अल्ट्रा-व्हायोलेट किरण शोषून घेतले जातात, पण पुरेसा प्रकाश पोचू शकतो अशा खोलीच्या परिसरातच प्रकाशाची ऊर्जा वापरणे शक्य होते. अशाच परिसरात सायनोबॅक्टेरिया फोफावू लागले. जरी केवळ तळावर वाढणाऱ्या सायनोबॅक्टेरियांचे जीवाश्म सापडलेले आहेत, तरी त्यांच्या जोडीलाच पाण्यात तरंगणारे सायनोबॅक्टेरिया आणि इतर क्लोरोफिलयुक्त बॅक्टेरियाही अस्तित्वात असणारच. यांच्या उत्पादनातून सर्वत्रच समुद्रतळी भरपूर सेन्द्रिय गाळ साचला असणार आणि नानाविध बॅक्टेरिया या जीवाश्मांवर गुजराण करू लागले असणार. ही साधी-सोपी परिसंस्था अगदी संथ गतीने हळूहळू बदलत जीवसृष्टीच्या इतिहासातली पहिली तीन अब्ज वष्रे आपली अबाधित हुकमत गाजवत राहिली; आजही ती अधिक प्रगत जीवांच्या जोडीने आधुनिक परिसंस्थांचा एक भाग म्हणून टिकून आहे.
या क्लोरोफिलयुक्त बॅक्टेरियांच्या उत्पादनातून वातावरणातले, पाण्यातले प्राणवायूचे प्रमाण वाढत राहिले आणि जीवसृष्टीच्या इतिहासात रंग भरायला लागला. साखर हे सगळ्या जीवांच्या ऊर्जेचे चलन आहे. प्राणवायूविना ग्लुकोजच्या एका रेणूपासून जीवनव्यवहारात जितकी ऊर्जा मिळवता येते, त्याच्या पंधरापट ऊर्जा प्राणवायू वापरून उपलब्ध होते. अर्थात ऊर्जाव्यवहारात प्राणवायूचा वापर करण्यासाठी नवी रासायनिक यंत्रणा आवश्यक आहे. उत्क्रान्तीच्या ओघात ती साकारली आणि इतकी मुबलक ऊर्जा मिळायला लागल्यावर बॅक्टेरियांहून आकाराने खूप मोठय़ा, जास्त जटिल रचनेच्या वनस्पती, प्राणी, बुरशा अस्तित्वात आल्या. हे एकपेशी जीव चाबकाच्या दोरीसारख्या तंतूंच्या साह्य़ाने पाण्याचे प्रवाह निर्माण करून आपल्याकडे अन्नकण ओढून घेऊ शकतात. एवढेच नाही तर काही प्राणी जोशात पोहत पोहत बॅक्टेरियांची, वनस्पती-प्राण्यांची शिकार करू शकतात. मात्र या लिबलिबीत जीवांचे जीवाश्म बनत नसल्याने त्यांचा काहीच दाखला आज मिळू शकत नाही. म्हणून आपल्यापाशी भक्कम पुरावा आहे केवळ गेल्या साठ कोटी वर्षांपासूनचा. या सुमारास अवतरले बहुपेशी प्राणी, आणि आपली मोठी शरीरे सांभाळण्यासाठी व शत्रूंपासून बचाव करण्यासाठी त्यांच्या देहात काटे भरले, सांगाडे रचले गेले, बाह्य़ांगावर कवचे चढवली गेली. ही कवचे, सांगाडे बनवण्यासाठी आणखी नवनव्या जीवरासायनिक यंत्रणा अस्तित्वात आल्या.
सुरुवातीस उद्भवले भोके-पोकळ्यांनी सज्ज, आपल्याकडे पाण्याच्या प्रवाहांद्वारे अन्नकण ओढून घेणारे, समुद्रतळावर एका जागी ठिय्या मारून बसलेले काटेवाले स्पाँज, पण अशा प्रवाहांतून किती आहार मिळणार? समुद्राच्या गाळात मोठय़ा प्रमाणात साचलेले अन्नकण जर गांडुळांप्रमाणे गिळता आले, तर मोठंच घबाड हाती लागणार. यासाठी हवे डोके आणि शेपूट, पाठ आणि पोट, स्नायू आणि मेंदू यांनी सज्ज शरीर. साध्या कृमींपासून ते िझगे, मधमाशा, मासे, पक्षी, माकडांपर्यंत सगळ्या प्राण्यांचे शरीर याच धाटणीचे आहे. अशा शरीरांतल्या टणक अवयवांवर स्नायू रोवले की भरभर हलता येते. अशांपकी सुरुवातीला ट्रायलोबाइट नावाच्या समुद्रतळावरच्या गाळात अन्नकण धुंडाळणाऱ्या िझग्यांच्या भाईबंदांचे भरपूर जीवाश्म सापडतात. जोडीनेच नक्कीच असणार पाण्यात पोहत तरंगणाऱ्या बॅक्टेरिया व शेवाळ्यांना फस्त करणारे लहानुगे िझगे. मग समुद्रतळावर अवतरल्या कोनस नावाच्या चपळ शिकारी गोगलगायी. यांना ट्रायलोबाइट बळी पडले आणि त्यांच्या जागी आल्या गाळात बोगदे खणून बचाव करून घेणाऱ्या तऱ्हेतऱ्हेच्या कृमी. दुसरीकडे पाण्यात िझग्यांना मटकावायला आणखी जोमाने पोहणारे मासे अवतरले.
एव्हाना प्राणवायूचे प्रमाण पुरेसे वाढले होते आणि जीवसृष्टी जमिनीवर पसरू लागली होती. त्यांच्या योगदानाने एकूण जीवोत्पादन भरपूर वाढले, नद्यांतून समुद्राकडेही अधिकाधिक अन्नकण पोहोचू लागले आणि सागरी जीवसृष्टी आणखीच फोफावली. जमिनीवरून आधी कीटकांनी व मग पक्ष्यांनी आकाशात झेप घेतली. यातल्या अनेक पक्षिजाती जलचर खाऊ लागल्या, त्यांतले पाणकावळ्यांसारखे पक्षी खोल समुद्रातल्या माशांकडे वळले. हे डोकेबाज पक्षी थव्याथव्याने माशांच्या कळपांना रेटत, वेढा घालत शिकार करतात. यात अडचण नको म्हणून समुद्रात शिटत नाहीत, तर सावकाश एखाद्या बेटावर येऊन शिटतात. अशा, विशेषत: त्यांच्या विणीच्या बेटांवर, पक्ष्यांच्या विष्ठेतून शेतीला उपयुक्त खताचे डोंगरच्या डोंगर उभे ठाकले आहेत आणि हे आता जगभर, आपल्या भारतातही, फॉस्फरस खत म्हणून विकले जाऊ लागले आहेत. निसर्गाच्या करामतीतून जमीन, आकाश, समुद्र या साऱ्या परिसंस्था अशा घट्ट जोडल्या गेल्या आहेत आणि माणसाच्या करामतीतून जगाच्या अर्थव्यवस्थाही!
लेखक  ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2014 4:20 am

Web Title: evolution of life and ecology
Next Stories
1 विषाणू : सूक्ष्मांपासून अतिसूक्ष्मांकडे
2 पृथ्वीचे स्वामी : बॅक्टेरिया
3 निघाली संधिसाधू यात्रा!
Just Now!
X