News Flash

खलनायक

पाकिस्तानच्या आयएसआय या संस्थेचे हमीद गुल हे माजी प्रमुख. १९८७ ते १९८९ अशी सुमारे दोनच वष्रे ते प्रमुखपदी होते,

| August 18, 2015 03:43 am

पाकिस्तानच्या आयएसआय या संस्थेचे हमीद गुल हे माजी प्रमुख. १९८७ ते १९८९ अशी सुमारे दोनच वष्रे ते प्रमुखपदी होते, परंतु या काळात त्यांनी भारतीय उपखंडातील भूराजकीय परिस्थितीला अत्यंत घातक असे वळण लावण्यात जी कामगिरी बजावली त्याची विषारी फळे आजही केवळ भारत वा अफगाणिस्तान नव्हे, तर पाकिस्तानही भोगत आहे. रविवारी वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्याबद्दल काय म्हणावे? भारतीय परंपरा ‘मरणान्ति वैराणी’ असे सांगते. गुल यांच्याबद्दल मात्र तसे म्हणता येणार नाही. कारण हा माणूस वारला असला तरी त्याने लावलेल्या विखारी रोपटय़ांचे आज विषवृक्ष बनले आहेत. भारतीय उपखंडातील शांतता आणि सौहार्दाच्या गळ्याभोवती त्या विषवृक्षाच्या मुळ्या नेहमीच असणार आहेत. आणि म्हणूनच गुल यांच्या निधनाबद्दल कोणतीही शांतताप्रेमी व्यक्ती तोंडदेखलेसुद्धा दु:ख व्यक्त करू शकत नाही. किंबहुना गुल यांच्या निधनाबद्दल अनेकांनी समाजमाध्यमांतून आनंद व्यक्त केला आहे. या अनेकांमध्ये जसे भारतीय आहेत, तसेच अफगाणिस्तानी आणि पाकिस्तानीही आहेत. पण एखाद्यासाठी खलनायक असलेला माणूस दुसऱ्यांसाठी नायकही असू शकतो. पाकिस्तानातील कडव्या धर्मवादी शक्तींसाठी गुल हे प्रेरणास्रोत होते. पाश्चात्त्य देश, आधुनिक विचार आणि परधर्म यांचा द्वेष कडव्या धर्मवाद्यांच्या गुणसूत्रातच असतो. अशा व्यक्तींसाठी ते आदर्शवत होते. गुल हे कडवे अमेरिकाद्वेष्टे, परंतु अफगाणिस्तानातील सोव्हिएत आक्रमणाच्या काळात ते अमेरिकेच्या जवळ होते. आयएसआयच्या प्रमुखपदी असताना अमेरिका आणि सौदी अरेबियातून येणारा निधी आणि शस्त्रास्त्रे अफगाणी मुजाहिदींना पुरवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती, परंतु पुढे सोव्हिएत फौजांनी माघार घेतल्याच्या काळात त्यांचे आणि अमेरिकेचे संबंध बिनसले. गुल हे तालिबानचे पाठीराखे बनले. ओसामा बिन लादेन, मुल्ला मुहम्मद ओमर, जलालुद्दिन हक्कानी, गुलबुद्दिन हिकमतयार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. खरे तर पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि इस्लामी दहशतवादी संघटना यांच्यातील नातेसंबंधांचा हमीद गुल हा उत्तम पुरावा होता. त्यांच्या या तालिबानप्रेमामुळेच त्यांचे आणि पाकिस्तानातील मवाळपंथी नागरी सरकारांचे कधीच जमू शकले नाही. पंतप्रधान बेनझीर भुत्तोंनी तर आयएसआयच्या महासंचालकपदावरून त्यांची हकालपट्टी केली. त्यामागे अफगाणिस्तानातील आयएसआयच्या एका फसलेल्या मोहिमेचे कारण सांगण्यात येत असले तरी खरे कारण गुल यांची पाकिस्तानी राजकारणातील ढवळाढवळ हेच होते. आयएसआयच्या माध्यमातून त्यांनी भुत्तोंच्या विरोधात कडव्या उजव्या पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. पुढे जन. मुशर्रफ यांनी अमेरिकेचा हात धरल्यावर गुल हे त्यांचेही विरोधक बनले. त्यांच्या या सगळ्या कार्य आणि कर्तृत्वामागे मूळ प्रेरणा होती ती पॅन इस्लामिझमची. त्यांचे गुरू जन. झिया उल हक. काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरू करण्यासाठीचे ‘ऑपरेशन टोपाझ’ हे झियांच्या मेंदूचे अपत्य. ही मोहीम गुल यांनी आयएसआयच्या माध्यमातून पुढे नेली. निवृत्तीनंतर तर ते त्याचे उघड समर्थक बनले. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीझ सईद याच्यासारख्यांबरोबर व्यासपीठावरून ते अखेपर्यंत भारताविरोधात गरळ ओकत होते. आणि त्यामुळे ते पाकिस्तानातील उजव्या शक्तींच्या गळ्यातील ताईत होते. ते स्वाभाविकच होते. कारण ते धर्मनिष्ठ होते, कर्मठ राष्ट्रवादी होते, त्यांना स्वदेशी परंपरांचा अभिमान होता आणि ‘वाह्य़ात’ पाश्चात्त्य संस्कृतीबद्दल राग. अशी माणसे काहींसाठी निश्चितच नायक असतात. पण व्यापक मानवतेच्या दृष्टीने ती खलनायकच असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2015 3:43 am

Web Title: ex isi chief hamid gul dies
Next Stories
1 मनोहरांचा मजला
2 वैचारिक लाळघोटेपणा
3 भावी पिढीची शोकांतिका
Just Now!
X