तिचं नाव आहे सुझन सांगी. वय र्वष अवघं १७. बेंगळुरूमध्ये राहणारी. महाविद्यालयात शिकणारी. मोठय़ा शहरातील सुखवस्तू कुटुंबातली मुलगी. खरं तर या परिचयात काहीच वेगळं नाही. तिच्या वयातली मुलं हल्ली मोबाइलवर सतत बोलत असतात, किंवा फेसबुकवर असतात. तेही सुझन करत असे. ती फेसबुकवेडी होतीच. त्याच्या अगदी आहारी जाण्याइतकी वेडी.
पण सुझनची दहावीची परीक्षा झाली आणि सुट्टीत तिला आपल्या आणि आपल्या मित्रांच्या फेसबुक वापराविषयी प्रश्न पडायला लागले. त्यावर ती विचार करायला लागली. तिच्या डोक्यात फेसबुकवर आधारित कादंबरी लिहायची कल्पना आली. ती लगेच कामाला लागली. एकेक प्रसंग सुचेल तसा लिहीत गेली. आपले मित्र, त्याचे कुटुंबीय, म्हणजे सात वर्षांच्या भावापासून ते ६५ वर्षांच्या आजीपर्यंत, सुझनची बहीण, तिचं फेसबुकवर सतत स्वत:विषयी अपडेट टाकत राहणं, अशा आजबाजूच्या गोष्टींतून तिला आपल्या कादंबरीसाठीची पात्रं सापडत गेली. कल्पना सुचल्यावर सुझन लिहू लागली. ती इतकी झपाटली गेली की, एका दिवसांत तिने कादंबरीची दोन प्रकरणं लिहून काढली. रोज पुढचा थोडा थोडा भाग लिहीत राहिली. आणि एकेदिवशी ‘फेसबुक फँटम’ ही कादंबरी पूर्ण झाली.   
सुझनची ही पहिलीवहिली कादंबरी नुकतीच डकबिल बुक्स या मान्यवर प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केली आहे. सोनाली मच्याडो, नील सार्थी आणि जॉनी लेस्लि हे मित्रांचं त्रिकुट, ही या कादंबरीतील मुख्य पात्रं आहेत. ती एकमेकांशी सर्व गोष्टी शेअर करत असतात. सोनालीला एके दिवशी फेसबुकचा शोध लागतो. तिथे तिला ओमी दान हा मित्र भेटतो. तो तिला विचारतो, ‘तू आनंदी आहेस?’ आणि तिथून ती स्वत:चा शोध घ्यायला लागते.
ज्याला इंग्रजीत ‘यंग अ‍ॅडल्ट’ म्हणतात, तशी ही कादंबरी आहे. सुझन आता दुसरी कादंबरी लिहीत असून ती फँटसी असेल.