सात लाख फेसबुकधारकांच्या आवडीनिवडीत फेसबुकने त्यांना न सांगता बदल करून, सकारात्मक वा नकारात्मक प्रतिसाद फेसबुकवर निर्माण करता येतात, हे सिद्ध केले. या पद्धतीवर अनेकांनी आक्षेप घेतलेला आहेच. परंतु यातून निघालेल्या निष्कर्षांची फिकीर आपल्यासारख्या समाजाने अधिक करावयास हवी..

सर्वसाधारण माणूस हा कळपाने राहणारा प्राणी आहे आणि एकदा का तो कळपात सामील झाला की कळपाची मानसिकता ही त्याचीही मानसिकता होत असते. याची उदाहरणे आपणास पदोपदी दिसतात. मग ते रस्त्यावर एक पाहतो म्हणून थांबून पाहणारा दुसरा असो किंवा समूहाने एखादी कृती केली म्हणून तिचे अनुकरण करणारा दुसरा समूह असो. स्वत:च्या बुद्धीने, चिकित्सकपणे निर्णय घेण्याची क्षमता सर्वसामान्यांत नसते. परिणामी अशी माणसे आपल्या कृतीसाठी सतत दुसऱ्या कोणाचा आधार शोधीत असतात. कधी हा आधार अण्णा हजारे यांच्या रूपात असू शकतो तर कधी एखादा बोगस बाबा वा बापूदेखील कोणासाठी असा आधार ठरू शकतो. स्वत:च्या निर्णयांसाठी आवश्यक तो कार्यकारणभाव स्वतंत्रपणे बौद्धिक पातळीवर शोधणे हे अनेकांना जड जाते. यात जसे त्यांचे अपंगपण असते तसा क्वचित बौद्धिक आळसदेखील असू शकतो. कारण काहीही असो. हे असे होते हे मात्र खरे. आधुनिक तंत्रविज्ञान, दळणवळण जाळे वयात आले नव्हते तोपर्यंत या अशा सामुदायिक कृतीसाठी प्रत्यक्ष समुदायाची गरज असे. म्हणजे समभावनेने प्रेरित झालेल्या वा होऊ पाहणाऱ्या मानव समुदायास प्रत्यक्षात एकत्र यावे लागत असे. प्रगतीच्या काळात नभोवाणी, चित्रवाणी आदी माध्यमांनी या प्रत्यक्ष एकत्र येण्याची भौगोलिक गरज संपुष्टात आणली. या माध्यमांमुळे ठरलेल्या विवक्षित वेळेस एखाद्या कार्यक्रमाच्या रूपाने भौगोलिक सीमा ओलांडून माणसे एकमेकांशी जोडली जाऊ लागली. ही मोठी क्रांतीच होती. या अशा क्रांतीचा पहिला मोठा आविष्कार अप्रगत भारताने महात्मा गांधी यांच्या रूपाने अनुभवला. आपल्या ईप्सित ध्येयासाठी ज्ञात-अज्ञात अशा लाखो जणांना एकाच भावनेने बांधता येऊ शकते ही माध्यमांची ताकद मोहनदास करमचंद गांधी यांनी पहिल्यांदा जाणली. या मोहनदासाचे महात्मा गांधी होण्यात त्यांची ही माध्यमजाण अत्यंत महत्त्वाची होती याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पुढे नभोवाणी आणि चित्रवाणीच्या पडद्यात अडकून पडलेली ही माध्यमताकद संगणकाने मोकळी केली आणि आधीच्या माध्यमांची कालमर्यादाही त्यामुळे दूर झाली. या संगणकीय संकरातून इंटरनेटचे महाजाल प्रसवले गेले आणि या ताकदीचा गुणाकार होत गेला. फेसबुक, ट्विटर आदी नवनवीन माध्यमसेवा या याच ताकद गुणाकारातून जन्माला आल्या. यातील सर्वात वैशिष्टय़पूर्ण ठरले ते फेसबुक. मार्क झुकेरबर्ग या अमेरिकी तरुणाने महाविद्यालयीन वसतिगृहात त्याच्यासमवेत राहणाऱ्यांसाठी एखादा सामायिक सूचना फलक असावा या हेतूने एक व्यासपीठ तयार केले. त्याच्या हार्वर्ड विद्यापीठातील महाविद्यालयात ते चांगलेच लोकप्रिय झाले तेव्हा ते समस्त हार्वर्डीयांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे आली आणि बघता बघता ते जगभर पसरले. या व्यासपीठाचे नाव फेसबुक. महाजालातील संगणकाच्या माध्यमातून कोणीही त्या व्यासपीठावर सहभागी होऊ शकतो आणि आपापली मते मांडू शकतो. आजमितीला तब्बल १३० कोटी जण दर महिन्याला या व्यासपीठास किमान एकदा तरी भेट देतात. समस्त माहिती महाजालास या फेसबुक नावाच्या आधुनिक चावडीने ग्रासले असून आपापल्या मतांची पिंक तेथे टाकल्याखेरीज अनेकांना चैन पडत नाही, अशी परिस्थिती आहे. हा एवढा मोठा जनसमुदाय जेव्हा कळत नकळतपणे एकत्र येत असतो तेव्हा त्या समूहाची म्हणून एक मानसिकता घडत असते. सुरुवातीला नकळतपणे घडलेली ही मानसिकता घडवताही येते याची जाणीव जेव्हा संबंधितांना होते तेव्हापासून हे माध्यम ‘वापरले’ जाण्याची शक्यता असते. फेसबुकच्या संदर्भात हेच घडले असून त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.
फेसबुकच्या चालकांनी आपल्या चावडीस भेट देणाऱ्यांच्या मानसिकतेवर नियंत्रण मिळवता येते किंवा काय याची गुप्त चाचणी केली असून तिचे निष्कर्ष धक्कादायक म्हणावे लागतील. फेसबुकच्या व्यासपीठावर गेल्या गेल्या प्रथमदर्शनी काही बातम्या वा वृत्तलेख आढळतात. त्यातील विषयांची निवड करण्याचा अधिकार फेसबुक सदस्यास असतो. परंतु जगभरातील निवडक सात लाख फेसबुकधारकांच्या या आवडीनिवडीत फेसबुकने त्यांना न सांगता बदल केला आणि त्यांच्या प्रतिक्रिया कशा काय उमटतील याची शास्त्रोक्त पाहणी केली. त्यासाठी फेसबुकने या सात लाख जणांच्या फेसबुक खात्यात दोन प्रकारच्या बातम्या भरल्या. एक म्हणजे अत्यंत सकारात्मक अशा आणि दुसऱ्या तितक्याच टोकाच्या नकारात्मक. ते वाचल्यावर या फेसबुकधारकांची प्रतिक्रिया नोंदली गेली. त्या पाहणीचा अहवाल सर्वसामान्यांच्या समूहाच्या मानसशास्त्रास दुजोरा देणाऱ्या आहेत. ज्या फेसबुकधारकांना सकारात्मक बातम्या दिल्या गेल्या त्यांनी ती माहिती आपल्या सग्यासोयऱ्यांना दिली आणि ही सकारात्मकता अन्यत्र पसरवली. त्याच वेळी ज्यांना काही नकारात्मक माहिती दिली गेली त्यांची प्रतिक्रिया ते वाचून अधिक नकारात्मक झाली आणि त्यांनी या नकारात्मकतेत आपली भर घालून तिचा आकार वाढवत ती नकारात्मकता इतरांच्या अंगणात ढकलली. याचाच अर्थ नकारात्मकता अधिक वेगाने आणि सक्रिय पसरली गेली. या पाहणीचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर नागरी स्वातंत्र्याचा अधिकार मानणाऱ्यांनी फेसबुकविरोधात आघाडीच उघडली असून त्यांच्या युक्तिवादास अनेक पदर आहेत. एक म्हणजे फेसबुकने आपण ही चाचणी घेत आहोत, याची कसलीही पूर्वसूचना फेसबुकला भेट देणाऱ्यांना दिली नाही. म्हणजे लोकांच्या नकळत त्यांच्या मनोव्यापाराची पाहणी केली गेली. हा गुन्हा ठरतो. ज्याप्रमाणे औषध कंपन्यांना औषधाची चाचणी घेण्याआधी संबंधित रुग्णांना माहिती देणे बंधनकारक असते तसेच येथेही घडणे आवश्यक होते, असे त्यांचे म्हणणे. दुसरे म्हणजे यातील नकारात्मकतेच्या भाराने वाकून नैराश्यवादाने ग्रासलेल्या रुग्णांनी समजा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असते तर काय, असेही त्यांचे म्हणणे आहे. जगात नैराश्यवादाने ग्रासलेल्यांची संख्या सर्वात मोठी असून त्यांच्या निराशेचा नकारात्मक उद्रेक होण्यासाठी कोणतेही कारण पुरते. ते कारण फेसबुक ठरले असते, असा युक्तिवाद काहींनी सप्रमाण केला आणि तो नाकारणे फेसबुकला शक्य झाले नाही. तेव्हा याचा फारच बभ्रा होत असल्याचे लक्षात आल्यावर फेसबुकच्या वतीने ही पाहणी करणाऱ्यांनी फेसबुक सदस्यांची जाहीर माफी मागितली असून या पाहणीचे परिणाम असे काही होतील हे आपल्या ध्यानात आले नाही, असे प्रांजळपणे नमूद केले. हे झाले वास्तव. परंतु त्याच्या परिणामांची फिकीर आपल्यासारख्या अर्धशिक्षित समाजाने अधिक करावयास हवी.    
याचे कारण असे की मुदलातच आपले समाजमन लाटांवर हिंदकळण्याइतके हलके आणि छचोरही. त्यात हे नवमाध्यमकार या लाटा अधिकाधिक कशा तयार होतील यासाठीच प्रयत्न करणार. खेरीज या माध्यमांचा भाग असलेल्यांकडे बौद्धिक स्थैर्यदेखील नाही. या स्थिरबुद्धी अभावामुळेच चेतन भगत वा तत्सम उठवळ लेखक इजिप्तप्रमाणे भारतातही क्रांती व्हावयास हवी अशा प्रकारचे बालिश मत व्यक्त करतो आणि ते फेसबुकसारख्या माध्यमामुळे वाऱ्यासारखे पसरते. विवेकाचे अंग फुटण्याआधीच फेसबुकादी माध्यमे वापरणाऱ्या अनेक तरुणांना त्या वेळी भारतातही क्रांती व्हावी असेच वाटत होते. पारंपरिक माध्यमांनाही त्या वेळी या फेसबुक क्रांतीने उचंबळून आले होते. हे गंभीर आहे आणि तेव्हाही आम्ही या संदर्भातील धोक्याची जाणीव करून दिली होती. याचे कारण या फेसबुकी भावना घडवता येऊ शकतात, नियंत्रित करता येऊ शकतात आणि बदलताही येऊ शकतात. अरविंद केजरीवाल, आम आदमी पक्षाचा अचानक उदय, नरेंद्र मोदी यांचे देशाला आलेले भरते आदी अनेक उदाहरणे या संदर्भात देता येतील. फेसबुकच्या ताज्या संशोधनाने तीच अधोरेखित केली आहेत.    
तेव्हा तंत्रविज्ञान हे विवेकाला पर्याय असू शकत नाही याचे भान असलेले बरे. याचा अर्थ इतकाच की या फेसबुकादी फुसकुल्यांना अवास्तव महत्त्व देणे शहाणपणाचे नाही.