15 October 2019

News Flash

श्रद्धा

या ऐहिक जगात कुठल्याही समाजाचे, राष्ट्राचे किंवा संपूर्ण जगाचे हित साधेल तर ते बुद्धीनेच, श्रद्धेने नव्हे. योग्य प्रयत्नांनीच ते शक्य आहे.

| August 17, 2015 01:01 am

या ऐहिक जगात  कुठल्याही समाजाचे, राष्ट्राचे किंवा संपूर्ण जगाचे हित साधेल तर ते बुद्धीनेच, श्रद्धेने नव्हे. योग्य प्रयत्नांनीच ते शक्य आहे. पूजाप्रार्थना, महायज्ञ करून किंवा ईश्वराला साकडे घालून ते होणार नाही.काही लोकांना हे पटते की, ‘अंधश्रद्धा’, माणसाची दिशाभूल करून त्याला निर्थक कर्मकांडात गुंतवून ठेवत असल्यामुळे त्या घातक असतात व म्हणून त्यांचे निर्मूलन होणे आवश्यक आहे. परंतु त्याबरोबरच त्यांना असे वाटत असते की, ‘श्रद्धा’ मात्र सोज्वळ, बिनधोक व प्रामाणिक म्हणून उपयुक्त असतात. पण हे खरे आहे का? ही एक साधी श्रद्धा पाहा. विशिष्ट देवाची, विशिष्ट परंपरेने रोज तासभर पूजाप्रार्थना केल्यावर, आपल्या सांसारिक अडचणी दूर होतात! किंवा अमुक मंत्राचा इतके हजार वेळा घोष केल्यावर, तमुक फलप्राप्ती होते. अशा श्रद्धा जर विश्वासार्ह मानल्या तर त्यामुळेसुद्धा सामान्य मनुष्य अनावश्यक कर्मकांडात गुंतून, वेळ आणि पैसा यांचा अपव्यय करीत राहील नाही का? हेही तेवढेच वाईट नाही का? देव असला तरी मंत्राने किंवा भावपूर्ण पूजाप्रार्थनेने प्रसन्न होऊन, तो आपल्यासारख्या प्रत्येक सामान्य माणसाशी देण्याघेण्याचे व्यवहार करील काय? आपले सांसारिक प्रश्न तो सोडवील का? सत्य तर हे आहे की, प्रार्थनेने प्रसन्न होईल अशा कुठल्याही देवदेवतेच्या अस्तित्वाला काहीही पुरावा नाही. पूजाप्रार्थना, मंत्रघोष किंवा यज्ञहोम किंवा असे काहीही करून काही प्राप्त होते हे ढळढळीत असत्य आहे. तरीही अशा श्रद्धा बाळगून, अशा गोष्टी करण्यात लोक आयुष्य खर्च करतात. आता जे युक्तिवाद अंधश्रद्धांविरोधात लागू होतात तेच युक्तिवाद जर श्रद्धा आणि धर्मश्रद्धांविरोधात लागू होत असतील तर विवेकवाद्यांनी लोकांना तेही सांगणे जरूर आहे. म्हणजे हे सांगणे जरूर आहे की, जशा अंधश्रद्धा समाजाला अनुपयुक्त, अहितकारक व घातक आहेत तशाच श्रद्धासुद्धा अहितकारकच आहेत.परंतु बहुतेक लोकांना श्रद्धेचा पांगुळगाडा वापरून जीवनात मार्गक्रमण करण्याची सवय झालेली असल्यामुळे, आम्ही श्रद्धा अहितकारक किंवा घातक आहेत असे म्हटल्यावर त्यांना राग व चीड येईल. माणसाजवळ, त्याच्या समजुतीची चिकित्सा करण्याचे ‘तर्कबुद्धी’ हे साधन, निसर्गत: उपलब्ध असूनही, त्याचा उपयोग न करताच, आपण कशावरही विश्वास ठेवणे, हे मुळातच समर्थनीय नाही, हे ते लक्षातच घेत नाहीत. हा विषय पूर्वीही माझ्या लेखनात येऊन गेलेला आहे. तरीही ‘मानव-विजय’ या प्रस्तुत लेखमालेतही तो असावा म्हणून पुनरुक्तीचा दोष स्वीकारून या व पुढील लेखात मी त्याविषयी पुन्हा एकदा मतमांडणी करीत आहे.अलीकडच्या काळात आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्यात तिथे भाजपचे सरकार असताना घडलेली ही घटना पाहा. जुलै २०१२च्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत पाऊस न पडल्याने कर्नाटक राज्य सरकारने तातडीने १७ कोटी रुपये मंजूर केले व दिले. ते काही क्लाऊड सीडिंगसाठी नव्हते, तर कर्नाटक राज्यातील सर्व ‘३४  हजार’ मंदिरांमध्ये दोन दिवस विधिवत पूजाप्रार्थना करण्यासाठी ते होते. ‘देवा-देवांनो कर्नाटक राज्यात पाऊस पाडा.’ अशा आपल्या श्रद्धा आणि असे उपाय; पण थोरामोठय़ांची ही अशी उदाहरणे पाहून लोक अंगारेधुपारे, गंडेदोरे, कवच, नवस, जादूटोणा किंवा कशावरही विश्वास ठेवून मूर्ख बनतील त्याचे काय? जगाचा जरी कुणी ईश्वर असला तरी तो त्याची स्तुतिप्रार्थना करणाऱ्यांसाठी ‘पक्षपात’ करील काय? कर्नाटकातील ३४ हजार देवळांतील पुजाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दक्षिणा मिळाली म्हणून तो बाजूच्या तामिळनाडूत पाऊस न पाडता फक्त कर्नाटकात पाऊस पाडील काय? देव असला तरी तो असा दुकानदारासारखा असणे शक्य आहे का? की भारताची ही ‘पाऊस टेक्नॉलॉजी’ ब्रिटन, अमेरिकेला एक्स्पोर्ट करून पैसे कमाविण्याचा कर्नाटक सरकारचा विचार होता? खरे तर प्रत्यक्षात कुणी ईश्वर नसूनही लोकांनी ईश्वराच्या ‘फक्त अस्तित्वावर’ श्रद्धा ठेवली तर मोठे काही बिघडत नाही असे म्हणता येईल. आम्हा बुद्धिप्रामाण्यवाद्यांचा जास्त आक्षेप आहे तो ‘ईश्वराच्या कर्तृत्वावरील श्रद्धेला’, जसे ईश्वर जग निर्माण करतो, जगावर सतत लक्ष ठेवतो, जगाला सांभाळतो, जगात न्याय प्रस्थापित करतो वगैरे. जगांतील सर्व सुखद-दु:खद घटनांचा सार्वत्रिक आढावा घेऊन बघा. जगात ईश्वरी न्याय दिसून येतो की त्याचा अभाव? पण होते असे की प्रत्येक आस्तिक माणूस आपोआपच ईश्वराचे कर्तृत्व मानू लागतो व त्या कर्तृत्वाचा आपल्यालाही फायदा मिळावा म्हणून त्याचा आधार शोधतो व प्रार्थना करू लागतो.आपल्या देशात अशा ‘नवसांना पावणाऱ्या’ देवांच्या देवळाबाहेर, क्षणभराच्या दर्शनासाठी, नमस्कारासाठी, शेकडो जण तासन्तास रांगा लावून ताटकळत उभे राहतात, हे आपण नेहमी पाहतोच. जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत अगदी यशवंत ठरलेल्या सुप्रसिद्ध स्टार व्यक्तीसुद्धा अशा देवळांमध्ये आवर्जून दर्शनाला, नवस करायला, फेडायला जातात आणि आम्हा सामान्य लोकांपुढे तसले चुकीचे आदर्श ठेवतात. एवढेच नव्हे तर आजकाळ देशात शहरीकरण, शहरांचे आकार, लोकवस्ती वगैरे वाढत असताना, देवळे, मशिदी व चर्चेस त्याहूनही जास्त वेगाने वाढत आहेत. हल्ली मुंबईत जिकडे तिकडे प्रत्येक गल्लीत एक-दोन देवळे बांधलेली आढळतात. आपल्याला एवढे देव कशाला लागतात? देऊळ बांधणे किंवा जुन्या देवळांचे नूतनीकरण करणे यामुळे ते करणाऱ्याला हमखास सतत उत्पन्न मिळण्याची साधने निर्माण होतात. आपल्याकडील मोठमोठय़ा प्रसिद्ध देवस्थानांमध्ये आज प्रत्येकी शेकडो कोटी रुपयांची ऐपत जमा झालेली आहे. त्याच्यापैकी किती टक्के ऐपत सामाजिक कार्यासाठी, गरिबांसाठी किंवा देशाची उत्पादकता वाढविण्यासाठी खर्च होते? देवदेवळे आणि गुरू फक्त घ्यायलाच बसले आहेत असे दिसते. ज्या देशात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६०-६५ वर्षांनीसुद्धा एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येने आदिवासी, भटक्या जातींचे लोक, दलित, वंचित, गरीब, अर्धपोटी लोक व कुपोषित बालके आहेत, त्या देशांतील काही देवळांमध्ये, मोजता येत नाही एवढी संपत्ती जमा झालेली आहे असे दिसून येते. भारतातील देव श्रीमंत झालेत खरे!
स्वातंत्र्यापूर्वीची तरी कित्येक शतके, आपल्या देशाने श्रद्धा जपण्याहून वेगळे काय केले? आक्रमकांचा, मूर्तिभंजकांचा, लुटारूंचा, अत्याचारींचा आपण काही विरोध किंवा प्रतिकार केला का? बहुधा नाहीच. सोरटी सोमनाथ, काशी-विश्वेवर असे मोठमोठे देव स्वत:च त्यांचे, देवळांचे व देवळात लपवून ठेवलेल्या संपत्तीचे आणि त्यांच्या भक्तांचे संरक्षण करतील अशा आपल्या श्रद्धा होत्या. बाहेरून आक्रमक येत होते, विध्वंस अत्याचार करीत होते, देवळे पुन:पुन्हा फोडत आणि लुटत होते, गुलामी लादत होते आणि आपण मात्र आपल्या श्रद्धांना गोंजारत, नवी देवळे पुन:पुन्हा बांधत, पोथ्यापुराणांचे भक्तिपूर्वक श्रवण करीत, अगणित पूजाप्रार्थना करीत राहिलो. याचे कारण आमच्या श्रद्धा.सर्वसाधारणपणे, श्रद्धा म्हणजे एखाद्या पंथावर, धर्मावर, देवावर, गुरूवर, ज्योतिषावर किंवा कुणाच्याही सांगण्यावर, चमत्कारांवर, साक्षात्कारांवर काहीही चिकित्सा न करता, काहीही तार्क समर्थन न मिळविता, ठेवलेला ‘अढळ’ विश्वास होय. तसा विश्वास ठेवण्यासाठी आपण तर्कबुद्धीची, विज्ञानाची कसोटी लावली पाहिजे, असे श्रद्धावंतांना मुळी वाटतच नाही. लहान मूल त्याचे पालनपोषण, रक्षण, शिक्षण वगैरे सर्वच बाबतीत त्याच्या आई-वडिलांवर पूर्णत: अवलंबून असल्यामुळे, ते जसे त्याचे आई-वडील जे जे सांगतील ते ते अक्षरश: खरे मानते तसेच हे आहे. सर्व प्रौढांच्या सर्व श्रद्धासुद्धा, अशाच लहानपणापासून त्यांच्या आई-वडिलांनी, वडीलधाऱ्यांनी सांगितल्यावरून, आप्तवाक्यांवरून, गुरूंच्या किंवा पवित्र मानलेल्या धर्मग्रंथांच्या मार्गदर्शनाने बनलेल्या व मनात ठसलेल्या असतात. या दृष्टीने पाहता सर्व धर्मश्रद्धा, पंथश्रद्धा, यातुश्रद्धा, अंधश्रद्धा, ईश्वरावरील श्रद्धा, एखाद्या देवावरील, देवदूतावरील, प्रेषितावरील किंवा गुरूवरील श्रद्धा या अगदी सारख्याच होत. त्यांच्याबाबत संशय घेऊ नये, त्यांचे तार्किक समर्थन शोधू नये. म्हणजे त्यांना सरळ सरळ ‘प्रमाण’ मानावे असे सर्व धर्म, धर्मगुरू सांगतात. कारण त्यांचे वर्चस्व टिकविण्यासाठी ते आवश्यक असते. पण विवेकवादाचे असे म्हणणे आहे की, ‘सत्य’ जर गवसायचे असेल तर संशय घेतलाच पाहिजे व तर्कबुद्धीचे समर्थन मिळाल्यावरच अविचल विश्वास ठेवला जावा. तसे पाहता जगांतील सर्व धर्म-पंथांच्या श्रद्धा परस्परभिन्न आणि परस्परविरोधीही आहेत व त्यामध्ये ‘वैश्विक सत्य’ असे काही नाही. त्यामुळे आपापले धर्म, पंथ, गुरू सांगतात त्याप्रमाणे आपण श्रद्धेला प्रामाण्य देऊन सर्व काही श्रद्धेने स्वीकारू शकत नाही. निसर्गाने व उत्क्रांतीने ज्या मनुष्यप्राण्याला अजब मेंदू व मनबुद्धी प्राप्त झालेली आहे, त्याच्याजवळ सत्यशोधनासाठी व अज्ञान-अंधारातील त्याच्या सुखमय प्रवासासाठी त्याची ती ‘बुद्धी’ हे त्याचे ‘एकमेव’ साधन आहे. त्यामुळे आम्ही मानवी बुद्धीला प्रमाण मानतो. ईश्वरावरील श्रद्धा हे आमचे प्रमाण होऊ शकत नाही.यापुढील काळात आम्हा भारतीयांना जर जगाच्या आघाडीवर राहायचे असेल तर आपण असे श्रद्धाळू, भाविक, भक्त, भोळेभाबडे न राहता, विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरून त्या मार्गाने निर्णय घेणारा, प्रगतिशील व पुरोगामी समाज बनणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण आपले सनातनत्व नाकारणे आवश्यक आहे. या ऐहिक जगात जर कुठल्याही समाजाचे, राष्ट्राचे किंवा संपूर्ण जगाचे हित साधेल तर ते बुद्धीनेच, श्रद्धेने नव्हे. फक्त योग्य प्रयत्नांनीच ते शक्य आहे; पूजाप्रार्थनेने, महायज्ञाने किंवा ईश्वराला, अवताराला साकडे घालून नव्हे.श्रद्धांनी व्यक्तीला मानसिक आधार मिळतो असे जे आपल्याला वाटते तो आधार खोटा आहे, भासात्मक आहे, ज्यावर विसंबून राहावे, असा नाही हे सर्व लक्षात घेऊन, आपण आपल्या सर्व श्रद्धा नाकारल्या पाहिजेत- विसर्जित केल्या पाहिजेत-आपल्याच मनाच्या समुद्रात- एकदा आणि कायमच्याच, स्वत:च्या, आपल्या देशाच्या आणि सबंध मानवी समाजाच्या हितासाठी.

First Published on August 17, 2015 1:01 am

Web Title: faith 3
टॅग Faith