फॉम्र्युला-वन म्हणजे वेगाच्या चाहत्यांसाठी अनोखी पर्वणीच. वेगाच्या या उत्सवाला पुढील आठवडय़ात सुरुवात होत असून जवळपास प्रत्येक संघ या मोसमात चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. रेड बुलचा ड्रायव्हर सेबॅस्टियन वेटेलने गेली तीन वर्षे लागोपाठ फॉम्र्युला-वन शर्यतींवर अधिराज्य गाजवले. सलग तीन वर्षे जेतेपद पटकावणारा तो आतापर्यंतचा सर्वात युवा ड्रायव्हर ठरला, पण गेल्या मोसमात अनेक ड्रायव्हर्सनी वेटेलच्या वर्चस्वशाहीला शह दिला होता. त्याचबरोबर या मोसमासाठी प्रत्येक संघ २.४ लिटर व्ही-२ इंजिन असलेल्या कारसह आणि पायरेलीच्या अद्ययावत टायरसह उतरणार असल्यामुळे रेड बुल आणि विशेष करून व्हेटेलपुढील आव्हान वाढले आहे, हे निश्चित.
प्रत्येक मोसमासाठी संघबांधणी करताना फॉम्र्युला-वनमधील संघांचा ड्रायव्हर्स, इंजिन आणि आर्थिक ताळेबंद आखण्यावर विशेष करून भर असतो. आपल्या बजेटनुसार प्रत्येक संघ अव्वल ड्रायव्हर्सची निवड करत असतो. बडय़ा आणि आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणाऱ्या संघांना पैशांची कधीच चिंता नसते. त्यामुळे प्रत्येक मोसमासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. आपल्याला हव्या त्या ड्रायव्हर्सची निवड ते करत असतात, पण प्रत्येक शर्यतीदरम्यान पैशांची चणचण भासणाऱ्या छोटय़ा संघांना ड्रायव्हर्सची निवड करताना दहा वेळा विचार करावा लागतो, ही फॉम्र्युला-वनमधील वस्तुस्थिती. या मोसमासाठी रेड बुल, फेरारी, टोरो रोस्सो आणि लोटस या चार संघांनी आपल्या गेल्या वर्षीच्या संघात कोणताही बदल केला नाही. बाकीच्या प्रत्येक संघात नवे किंवा जुनेच चेहरे सामील झाले आहेत.
महान ड्रायव्हर आणि सात वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या मायकेल शूमाकरने मर्सिडिझला अलविदा म्हणत फॉम्र्युला-वनमधून दुसऱ्यांदा निवृत्ती पत्करली. शूमाकरची उणीव फॉम्र्युला-वन चाहत्यांना यापुढे चांगलीच सलत राहील, पण त्याची जागा आता मॅकलॅरेनच्या लुइस हॅमिल्टनने घेतली आहे. त्यामुळे हॅमिल्टनच्या मॅकलॅरेन संघातील रिक्त झालेल्या जागेवर सौबेरचा ड्रायव्हर सर्जीओ पेरेझची वर्णी लागली आहे. सौबेरने या मोसमासाठी सहारा फोर्स इंडियाच्या निको हल्केनबर्गला आणि आपला राखीव ड्रायव्हर इस्तबेन गुटिरेझला संधी दिली. त्यामुळे चांगली कामगिरी करूनही कामुइ कोबायाशीला सौबेरने बाहेरचा रस्ता दाखवला.  
वेटेलसाठी आता कठीण, कठीण, कठीण किती..
विजेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवण्यासाठी वेटेलला २०१२ मोसमात प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. पहिल्या सात शर्यतींमध्ये सात वेगवेगळे विजेते पाहायला मिळाले. त्यापैकी किमी रायकोनेन याने सुरेख कामगिरी करत वेटेलपुढील आव्हान आणखीनच खडतर केले होते. २० पैकी १६ शर्यतींअखेर फेरारीचा फर्नाडो अलोन्सो आघाडीवर होता, पण त्यानंतर वेटेलने ‘टॉप गीअर’ टाकत कोरिया आणि इंडियन ग्रां.प्रि.चे जेतेपद पटकावून विश्वविजेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान कायम ठेवले. अखेरच्या शर्यतीत सुरुवातीला अपघात होऊनसुद्धा वेटेलने ब्राझील ग्रां. प्रि. शर्यतीत सहावे स्थान पटकावून अवघ्या चार गुणांच्या फरकाने अलोन्सोला मागे टाकून जेतेपदावर नाव कोरले, पण पुढील मोसमात आपण वेटेलला कोणत्याही परिस्थितीत मात देऊ, अशी शपथ अलोन्सोने घेतली आहे. फेरारी संघ नव्या कारसह सर्किटवर उतरणार आहे. त्याचबरोबर लोटस आणि मर्सिडिझ संघानेही वेटेलला निष्प्रभ करण्यासाठी योग्य रणनीती आखली आहे. त्यामुळे विजेतेपदाचा चौकार लगावण्यासाठी वेटेलला ‘कठीण, कठीण, कठीण किती’ म्हणत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करावी लागेल.
सहारा इंडियाचा ‘फोर्स’ हरवला?
फोर्स इंडियाचे मालक विजय मल्ल्या यांचे ग्रह सध्या फिरले असून त्यांची किंगफिशर एअरलाइन्स ही कंपनी आर्थिक दिवाळखोरीत सापडली आहे. घरच्या मैदानावर रंगलेल्या दुसऱ्या इंडियन ग्रां. प्रि.दरम्यान मल्ल्या गायब झाले होते, पण अखेरच्या क्षणी बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर अवतरलेल्या मल्ल्या यांनी प्रसारमाध्यमांचा ससेमिरा मात्र टाळला होता. पैशांची चणचण असतानाही मल्ल्या यांचा फॉम्र्युला-वनवरील सोस अद्यापही कायम आहे. दोन वर्षांपूर्वी फोर्स इंडियाला सहारा समूहाचा ‘सहारा’ मिळाला होता, पण प्रत्येक शर्यतीसाठी कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करण्याची क्षमता नसलेल्या भारतीय संघाचा या मोसमात ‘फोर्स’ जाणवेल का, याबाबत शंकाच आहे. निको हल्केनबर्गने फोर्स इंडियाला रामराम ठोकल्यानंतर मल्ल्याने या मोसमासाठी आपला जुना ड्रायव्हर एड्रियन सुटीलला पाचारण केले आहे.
कार्तिकेयनचे भवितव्य अंधारमय
भारताचा फॉम्र्युला-वनमधील एकमेव ड्रायव्हर नरेन कार्तिकेयनचा ‘हिस्पानिया रेसिंग’ हा संघ याआधीच आर्थिक संकटात सापडला होता. म्हणूनच गेल्या मोसमात एकही गुण हिस्पानियाला किंवा कार्तिकेयनला पटकावता आला नाही. अखेर हिस्पानिया संघाने आर्थिक दिवाळखोरीचे कारण दाखवत फॉम्र्युला-वनच्या या मोसमातून माघार घेतली आहे. त्यामुळे कार्तिकेयनचे फॉम्र्युला-वनमधील भवितव्य अंधारमय झाले आहे. भारतीय चाहत्यांसाठी ही दु:खद बाब असली तरी फॉम्र्युला-वनच्या या मोसमाचा आनंद लुटण्यासाठी आपण सज्ज होऊ या!