आधुनिक जगात आपण स्वत:ला निसर्गापासून दूर समजू लागलो, मग आंतरिक तळमळीने निसर्ग वाचवण्याच्या चळवळीत वगैरे जाणे दूरच राहिले. पर्यावरणवादाचेही ‘एनजीओ’करण झालेल्या या काळात जोनाथन फ्रेंजन हा लेखक कळकळीने निसर्गाकडे जातो, रॉबिन्सन क्रूसोप्रमाणे एकटा राहतो.. त्याच्या या कृतींमागे काहीएक विचार आहे, अशी खात्री त्याच्या लेख/भाषणांचा हा संग्रह वाचकांना देतो..

जोनाथन फ्रेंजन हा प्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकार. ‘प्रसिद्ध’ असे मुद्दाम सांगायचे कारण की, ‘टाइम’ साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर झळकलेल्या मोजक्या नऊ लेखकांपकी तो एक आहे. हारुकी मुराकामीसारखे कादंबरीकार दोन कादंबऱ्यांमध्ये कथा लिहितात आणि स्वत:चे धावण्यासारखे छंद जोपासतात. तर sam05फ्रेंजनसारखा कादंबरीकार दोन कादंबऱ्यांमध्ये निबंध लिहितो, पुस्तकांची परीक्षणे करतो आणि पक्षीनिरीक्षणासारखे छंद जोपासतो. इतकेच नव्हे तर लाखो पक्ष्यांची जिथे हत्या होते अशा दुर्गम भागांत जाऊन हत्या करणाऱ्यांची समजूत काढायचा प्रयत्न करतो.
गेल्या १५-१६ वर्षांतला निबंध परीक्षणे आणि भाषणे यांचा हा संग्रह आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच केन्यून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना उद्देशून केलेले भाषण आहे. लेखक आणि माणूस म्हणून आपली जगाकडे पाहायची भूमिका काय आहे याचे चिंतन त्यात आहे, पण विद्यार्थ्यांना भोवतालच्या जगाबद्दल सजग करण्याची इच्छाही त्या भाषणातून दिसते आहे. काही वर्षांपूर्वी स्टीव्ह जॉब्सने स्टॅन्फर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केलेले भाषण गाजले होते. त्या भाषणात जॉब्स यांनी भोवतालच्या जगात यशस्वी होण्याचा मंत्र दिला होता. तर जॉब्ससारखी माणसे जी उत्पादने बनवतात त्यामुळे माणसाचे कोणते नुकसान होत आहे, कसे नुकसान होत आहे, त्याच्या मनावर नेमका कोणता परिणाम होत आहे याचे विवेचन फ्रेंजन केन्यूनमध्ये करतात. ते सांगतात ही सारी ग्राहक उत्पादने तुम्हाला अत्यंत आवडावीत अशा पद्धतीनेच बनवलेली असतात किंबहुना त्यांची व्याख्याच अशी आहे. ती तुम्हाला आवडावीत अशीच ती असली पाहिजेत. केवळ उपयुक्त निर्मिती म्हणून निर्माण झालेल्या आणि स्वयंभू अस्तित्व असलेल्या इतर गोष्टींप्रमाणे ती नाहीत. म्हणजे उदा. म्हणजे जेट इंजिन, प्रयोगशाळेतील उपकरणे, साहित्य आणि कला याप्रमाणे त्या नाहीत.
पुढे तो सांगतो, ‘केवळ मानवी तपशिलाच्या दृष्टीने तुम्ही जर इतरांना आवडावे अशीच पराकाष्ठा करणारा माणूस पाहिला तर त्याच्यात तुम्हाला काय दिसेल. तुम्हाला तत्त्वनिष्ठेची चाड नसलेला आणि कोणत्याही स्वकेंद्राचा अभाव असलेला माणूस दिसेल. आणखी पुढे थोडे वैद्यकीय अंगाने पाहिले तर दिसेल की आत्मप्रेमात बुडालेला माणूस ज्याला त्याची किंवा त्याच्या प्रतिमेची कोणतीही चीरफाड चालणार नाही. इतरांना आवडणार नाही अशी कोणतीही गोष्ट परवडणार नाही. परिणामी असा माणूस पूर्णत: इतरांपासून तुटून स्वत:च्या कोषात जाईल किंवा इतरांना आपण आवडावे म्हणून आपले स्वत्त्व गमावले- ‘इंटेग्रिटी’ गेली तरी चालेल, अशी वर्तणूक करेल. जर तुम्ही केवळ सतत इतरांनी तुम्हाला पसंत करण्याचे जाळे पसरवत राहिलात आणि त्यात यशस्वी झालात तर तुम्ही त्याच माणसांचा द्वेष करू लागाल, कारण ते तुमच्या जाळ्यात अडकण्याइतके स्वस्त आहेत. त्यांचे अस्तित्व केवळ तुम्हाला स्वत:बद्दल छान वाटावे इतकेच आहे. अशा माणसांनी दिलेल्या कौतुकाने तुम्हाला किती काळ आनंद वाटेल? एक क्षण असा येईल की तुम्ही निराश व्हाल किंवा व्यसनाच्या गत्रेत जाल.’
 पक्षीनिरीक्षणासाठी लेक्षक पृथ्वी पालथी घालतो (अर्थात यशस्वी अमेरिकन लेखकाला ते परवडूही शकते.). चिलीच्या किनाऱ्यापासून ५०० मलांवर असलेल्या एका दुर्गम बेटावर पक्षीनिरीक्षणासाठी जाताना त्याचे अनुभव वाचताना रॉबिन्सन क्रूसो वाचत असल्यासारखे वाटते. या बेटाचे नाव आहे अलेजाने सेलकर्क आणि ते ज्वालामुखीपासून बनलेले आहे. सांतियागोपासून छोटय़ा विमानातून तिथे जावे लागते. नंतर जवळपासच्या एकमेव गावाला जाण्यासाठी छोटय़ा होडीतून प्रवास करावा लागतो. कधी कधी दिवसेंदिवस थांबावे लागते. पूर्ण एकाकीपणाचा अनुभव देणारा या अनुभवाला सामोरे जाणारा लेखक आपल्या दुसऱ्या लेखक मित्राची रक्षा घेऊन जातो. हा मित्र म्हणजे अमेरिकन कादंबरीकार डेव्हिड फॉस्टर वॉलेस. याच डेव्हिडच्या मृत्यूनंतर अंत्येष्टीच्या (फ्यूनरल) वेळी केलेले भाषणही पुस्तकात आहे. कादंबरीकाराला-लेखकाला नात्यातील तीव्रतेची आवड असते. पण ज्यांना सगळ्याच गोष्टी नियंत्रित करायच्या असतात त्यांना नात्यातील तीव्रता आणि संवेदनशीलता अनुभवणे कठीण जाते. याच पेचातून डेव्हिड जात होता. आणि एक दिवस तो त्यातून बाहेर आला. अनेक वर्षे मानसिक उपचार घेणाऱ्या डेव्हिडने त्या भयावर मात केली आणि त्यातून त्याचा अंत झाला. पण लेखक म्हणून संघर्षांला सामोरे जाणाऱ्या त्याच्या निर्णयाचा हा परिपाक होता. म्हणून त्याचा अंत स्वीकारायला हवा हे फ्रेंजन नेमकेपणाने सांगतो. ‘इन्फिनिट जेस्ट’सारखी महाकादंबरी लिहिणाऱ्या डेव्हिड फॉस्टर वॉलेसचा छोटासा का होईना त्याचा चाहतावर्ग जगभर पसरला आहे. त्याला या लेखाने दिलासा मिळेल.  पुस्तकात प्रेमपत्रांवरही छोटासा लेख आहे. तसाच ‘मॅन हू लव्हड् चिल्ड्रन’सारख्या कादंबरीवरही. पण सायप्रस या देशात दरवर्षी होणाऱ्या लाखो पक्ष्यांच्या कत्तलीबद्दल त्याने लिहिलेला लेख सर्वोत्तम मानावा लागेल. युरोपीय संघामधल्या या देशात दरवर्षी जवळपास कोटय़वधी पक्षी येतात आणि त्यापैकी दहा लाखांहून अधिक पक्ष्यांची कत्तल होते. घराजवळच्या छोटय़ा फळबागेत साधे िपजरे लावून त्यात पक्षी अडकवले जातात. अशा प्रकारे दरवर्षी दहा ते पंधरा लाख पक्ष्यांची विक्री होते. एक पक्षी पाच युरोला विकला जातो. तिथे हॉटेलमध्ये पक्ष्यांना मारून शिजवलेले अन्नपदार्थ मिळतात. मेजवानीत पक्षी वापरले जातात आणि पक्ष्यांचे लोणचे भेट देणे शुभ मानले जाते. त्यांना वाचवण्याच्या मोहिमेवर लेखक शस्त्रधारी कमांडोबरोबर स्वत: जातो आणि त्या भागाची पाहणी करतो. हे सारे तो का करतो? तो म्हणतो :  एकेकाळी या साऱ्यापासून दूर राहणे मला आवश्यक वाटत होते. आज या साऱ्यात सहभागी होऊन कृती करणे मला आवश्यक वाटते. पूर्वी मी वेदना टाळत होतो. आता मी तिला सामोरे जातो कारण वेदना दुखावते.. पण वेदनेने काही आपण मरत नाही.
‘फर्दर अवे’
*लेखक- जोनाथन फ्रेंजन
*प्रकाशक- फोर्थ इस्टेट लंडन
*पृष्ठसंख्या- ३२४, ’किंमत ३९९ रु.

-शशिकांत सावंत