पोलादपुरुष लक्ष्मीनारायण मित्तल यांनी त्यांचा ब्रिटनमधला राजेशाही महाल विकण्यास काढला आहे. तोही पडत्या किमतीला. यावर सध्या त्यांच्यावर लक्ष्मी रुसलेली आहे, असे पांचट विनोद करणे हे या घटनेचे तृतीयपर्णी पत्रकारितेला सुलभ असे सामान्यीकरण झाले. या घटनेचा त्याहून गंभीर संदेश असा आहे, की मंदीच्या फटक्याने जगभरातील पोलाद निर्मिती व्यवसाय डगमगू लागलेला आहे. टाटा स्टील या बहुराष्ट्रीय कंपनीचा चौथ्या तिमाहीचा अर्थनिकाल हेच सांगत आहे. टाटा स्टीलला या काळात तब्बल सहा हजार ५२९ कोटींचा तोटा झालेला आहे, तर मित्तल यांच्या आस्रेलर-मित्तल या कंपनीला यंदाच्या    पहिल्या तीन महिन्यांत ३४५ दशलक्ष डॉलरचा तोटा सहन करावा लागलेला आहे. हे सगळे होत आहे ते युरोपात रेंगाळलेल्या आर्थिक मंदीने हे तर स्पष्टच   आहे. आस्रेलर-मित्तलचे मोठे गिऱ्हाईक म्हणजे बांधकाम आणि वाहननिर्मिती उद्योग. एकीकडे या उद्योगांचा वेग मंदावला आहे. चीन हा पोलादाचा    एक मोठा आयातदार देश. तेथून मागणी घटली आहे. येत्या दोन-तीन वर्षांत त्यात बदल होईल, असा मित्तल यांचा अंदाज आहे. पण सध्या तरी त्याचा फटका आस्रेलर-मित्तलला बसतो आहे. या कंपनीने      मागेच पोलंड आणि रुमानियातील आपल्या चार भट्टय़ा बंद ठेवल्या आहेत. गतवर्षांपासून फ्रान्समधील दोन भट्टय़ा बंद करण्यावरून वाद सुरू आहे. तो आता अशा पातळीवर गेला आहे, की तेथे ‘किल मित्तल’ नावाचा व्हिडीओ खेळ तयार करण्यात आला आहे आणि तो भलताच लोकप्रिय झाल्याच्या बातम्या आहेत. हे जे काही चालले आहे ते केवळ पोलाद उद्योग आणि मित्तल यांच्यापुरतेच मर्यादित नाही. ते उद्या कोणत्याही उद्योगाबाबत होऊ शकते, हे समजून घेतले पाहिजे. कारखाना आणि कामगार यांतील संबंधांकडे पाहण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनांच्या पलीकडे जाऊन त्याकडे पाहिले पाहिजे. फ्रान्समधील आस्रेलर-मित्तलच्या कारखान्यात २७०० जण काम करतात. तेथील दोन भट्टय़ा बंद केल्याने ६२९ जणांच्या रोजगारावर गदा येणार होती. त्याला फ्रान्स्वां ओलांद सरकारचा विरोध आहे. तेथील एका मंत्र्याने तर मित्तल यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप करून आस्रेलर-मित्तल कंपनीच हद्दपार करण्याच्या वल्गना केल्या होत्या. ६२९ जणांसाठी उरलेल्या २७०० जणांनाही बेरोजगार करायचे हे समाजवादी हेकटपणातूनच उगवू शकते. यावर कारखाना कामगारांसाठी की कामगार कारखान्यासाठी हा सनातन वाद ज्यांना घालायचा त्यांनी तो खुशाल घालावा, परंतु आज आपण अर्थव्यवस्थेच्या अशा भन्नाट वळणावर आहोत की ज्याची कल्पना कधी मार्क्‍ससारख्या द्रष्टय़ानेही केली नसेल अन् जे आयन रँडच्या स्वप्नातही आले नसेल. आज उद्योगांवर अशी पाळी आलेली आहे, की त्यांना तगण्यासाठी स्वत:च मार्क्‍स आणि रँड बगलेत घेऊन उभे राहावे लागत आहे. प्रसंगोपात्त मार्क्‍सचा आधार घ्यावा की रँडचा हे ठरविण्याचे स्वातंत्र्य त्यांना हवे आहे. सामाजिक-आर्थिक व्यवस्थेला हानी न पोहोचता ते कसे दिले जावे, हाच खरा आजचा प्रश्न आहे. तो आपल्याकडे कधी कुडनकुलमच्या निमित्ताने दिसतो, तर कधी सेझच्या निमित्ताने, तर कधी कंत्राटी कामगारांच्या रोजगार-सुरक्षेच्या निमित्ताने. आज मित्तल यांच्यावर घर विकण्याची पाळी आली आणि त्याला उजाळा मिळाला, इतकेच.