News Flash

शुभ्र कवितेचा सन्मान

ज्याच्यासाठी शब्द हेच सर्वस्व आणि त्यातून व्यक्त करता येणारे भाव हेच जगणे, त्याला कवितेचाच आधार मिळणार, हे अगदी स्वाभाविक वाटणारे गणित गुलजार यांनी मनस्वीपणे सोडवण्याचा

| April 14, 2014 01:06 am

ज्याच्यासाठी शब्द हेच सर्वस्व आणि त्यातून व्यक्त करता येणारे भाव हेच जगणे, त्याला कवितेचाच आधार मिळणार, हे अगदी स्वाभाविक वाटणारे गणित गुलजार यांनी मनस्वीपणे सोडवण्याचा प्रयत्न केला. शब्दांनो मागुते या.. अशी साद घालत या कवीने साऱ्या भारताला कवितेच्या प्रेमात ओढले आणि अगदी सामान्यातल्या सामान्यासाठीही कविता हे प्रकरण सोप्पे होऊन गेले. निसर्ग आणि जगण्याच्या नाना परी यांचे जे अनोखे आणि देखणे दर्शन त्यांच्या कवितेतून येते, त्याने ती वाचणाऱ्याला आपण काही तरी वेगळे आणि अद्भुत मिळवल्याचे समाधान मिळते, याचे कारण गुलजार यांनी शब्दांशी कधी झुंज दिली नाही. शब्दांना अतिशय निगुतीने सांभाळत, त्यांना नट्टापट्टा करत, त्यांनी मनवणी करत, त्यांचे जे लाड केले, ते आरस्पानी कविताच होते. सारे जगणेच कविता होणारी माणसे या पृथ्वीवरची नसतात. ती आपल्या आसपास असतात ती कवितेच्याच रूपात आणि ती आपल्यापर्यंत पोहोचतात, त्याच कवितेतून. गुलजार यांना हे वेळीच कळले आणि त्यांना जीवनभर तेच करता आले, हे त्यांच्यापेक्षा इतरांचेच भाग्य. पोटापाण्यासाठी मुंबईत येऊन चित्रपटासारख्या कचकडय़ाच्या दुनियेत पाऊल ठेवण्याचे धाष्टर्य़ कवीने करावे हीही कमाल वाटणारी गोष्ट होती. तेव्हा त्यांना तरी कुठे माहीत होते, की चकचकीत दुनियेला तरल प्रतिमांबरोबरच शब्दांनीही समृद्ध करता येऊ शकेल? पण गेल्या पन्नास वर्षांत चित्रपटांच्या अफाट दुनियेत गुलजार कसे चटकन लक्षात येतात. याचे कारण चित्रपटाची कथा लिहिणे असो, की त्याचे दिग्दर्शन, त्यांनी कवितेच्या मूलभूत मानसिकतेला कधीच तडा जाऊ दिला नाही. त्यामुळे त्यांचे वेगळेपण दिग्दर्शक आणि कथालेखक म्हणूनही अधोरेखित झाले. प्रतिमांमधूनही उत्कट कविता व्यक्त  करण्याची तरलता या कलावंताकडे आहे, याचे हे पडदाभर पुरावेच. चित्रपटांच्या दुनियेत शब्दांच्या खेळात सगळ्यांनाजिंकणाऱ्या अनेक दिग्गजांनी भर घातली. गुलजार हे गेल्या पन्नास वर्षांतले असे एक ठळक उदाहरण, की ज्याने चित्रपट माध्यमालाही चार अंगुळे उंच नेले. सगळे जग ज्या कवीच्या नजरेने टिपायचे, ती सतत टवटवीत आणि मुक्त असली पाहिजे, हा त्यांच्या जगण्याचाच आग्रह असावा. त्यामुळे झगमगाटातही निर्लेप राहण्याने मिळणारे समाधान त्यांना मिळू शकले. माणसाला अंतर्यामीचे सांगण्यासाठी व्यक्त होण्याची निकड भासते, तेव्हा तो कोणत्या ना कोणत्या कलाप्रकारांची संगत धरतो. गुलजार यांनी शब्दांना जवळ केले. खरी गोष्ट अशी की, शब्दांनीच गुलजार यांना ‘गुलजार’ केले. लहान मुलांसाठीच्या कथा हे गुलजार यांचे आणखी एक अप्रतिम बलस्थान. त्या अवखळ वयातल्यांच्या मनात चाललेली खळबळ ते ज्या पद्धतीने टिपतात, त्याने मोठय़ांनाही काही नवे सापडल्याचा अनुभव मिळतो. ज्या मिर्झा गालिबने जगातल्या तमाम शब्दप्रेमींना जगण्याचे आणि शब्दांना हलके होऊन तरंगण्याचे बळ दिले, तो समजावून सांगण्यासाठी गुलजार यांनी पुढे येणे हा केवळ योगायोग नाही. दूरचित्रवाणीवरील गालिबवरील मालिका असो की त्याचे चरित्र असो, गुलजार यांना गालिबने घातलेली मोहिनी अशी भव्यपणे उलगडत जाते की गालिबलाही समाधान वाटावे! रोजच्या धकाधकीच्या जगण्यात कविता कुठली वाचायची, असा प्रश्न  पडलेल्या कोटय़वधींकडे तर जगण्याचेही त्राण नसतात. पण गुलजारांच्या कवितेने त्यांना कशासाठी जगायचे याचे भान दिले आणि चित्रपटातील गीतांपलीकडे जाऊन त्यांच्या कवितेपर्यंत ओढत नेले. कवीला अशा लौकिकाच्या दुनियेत राहण्यात रस नसतो असे म्हणतात, पण गुलजार यांनी तर लौकिकालाच पारलौकिक करून दाखवले. दादासाहेब फाळके पुरस्कार हे त्याचेच प्रतीक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 1:06 am

Web Title: felicitation of pure poetry gulzar selected for dadasaheb phalke award
Next Stories
1 माजवादी आणि माजलेले
2 पालिकेतील विषवल्ली..
3 कोठून उगवतात हे ‘शाई’स्तेखान?
Just Now!
X