युवराज सिंग या क्रिकेटपटूच्या कामगिरीवर, जिद्दीवर बरेच जण फिदा आहेत. विश्वचषकात तर त्याने स्पर्धेतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावत साऱ्यांचीच मने जिंकली होती. पण त्यानंतर जेव्हा त्याला कॅन्सर झाल्याचे समजले, तेव्हा सारा देश हेलावून गेला होता. कर्करोग हा बरा न होणारा आजार असल्याची भावना असल्याने युवराजचे नक्कीच काय होणार, हा प्रश्न काही जणांना पडला होता. त्यांची उत्तरे त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘दी टेस्ट ऑफ माय लाइफ’ या पुस्तकात मिळतात. दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीने युवराज जीवनाच्या रणांगणात अपराजित ठरला आहे. त्याची ही गोष्ट नक्कीच प्रेरणादायी आहे.
युवराजने यात सहा भागांमध्ये आपले मनोगत मांडले आहे. ‘लहानपण देगा देवा’ हे आपण सारेच म्हणत असतो. काही केल्या लहानपणीच्या आठवणी पुसल्या जात नाहीत, तेच युवराजच्या बाबतीतही घडल्याचे जाणवते. स्केटिंग आणि टेनिस हे दोन आवडीचे खेळ असतानाही वडलांच्या हट्टापायी त्याला क्रिकेटपटू कसे व्हायला लागले, हे त्याने या भागात मांडले आहे. त्याचबरोबर स्थानिक स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचा प्रवास सांगितला आहे.
दुसऱ्या भागात विश्वचषकादरम्यानच्या घडामोडी त्याने लिहिल्या आहेत. विश्वचषकादरम्यान बंगळुरू येथील दुसऱ्या साखळी सामन्यापूर्वी त्याला पुन्हा एकदा त्रास जाणवत होता. त्याला मान वळवता येत नव्हती, त्याचबरोबर फलंदाजीच्या सरावासाठी सरळ उभे राहणेही त्याला जमत नव्हते. त्यानंतरच्या सामन्यांमध्येही त्याला श्वास घेण्याची समस्या जाणवत होती खरी, पण विश्वचषक जिंकायचा आणि त्यानंतर प्रकृतीकडे लक्ष द्यायचे हे त्याने ठरवले होते आणि हेच त्याच्या जिवावर बेतल्याचे या पुस्तकातून समोर येते.
तिसरा भाग कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले तेव्हाची त्याची, कुटुंबीयांची आणि मित्रांची नेमकी कशी अवस्था होती, याविषयी आहे. त्यानंतरच्या दोन भागांत त्यावरचे उपचार आणि नंतर पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर उभा राहून संघातील पुनरागमन याविषयी लिहिले आहे.
युवराज हा मुळातच लढवय्या वृत्तीचा, त्यामुळेच तो या आजारातून पूर्णपणे बरा झाला, असे आपण म्हणू शकतो. १४ जानेवारी २०११ला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जोहान्सबर्गच्या सामन्याच्या सकाळी युवराजला कफ झाल्याचे जाणवले. त्या वेळी त्याची एक बाजू पूर्ण निकामी झाल्याचे वाटले, त्याचबरोबर श्वासाचा त्रासही जाणवत होता. पण त्याने दुर्लक्ष केले. नंतर तो विश्वचषक, आयपीएलही खेळला. या दोन्ही स्पर्धाच्या वेळी युवराजने चाचण्या करून घेतल्या असत्या तर कदाचित त्याचा आजार जास्त बळावला नसता. कर्करोग असल्याचे निष्पन्न झाल्यावरही तो इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. क्रिकेटच्या वेडापायी तब्येतीकडे केलेले दुर्लक्ष या वेळी त्याला चांगलेच भोवल्याचे जाणवते.
पुस्तकाची सुरुवात युवराजने अप्रतिमरीत्या केली आहे. आपल्या खेळींची अप्रतिम सुरुवात तो करायचा अगदी तशी! पण त्यानंतर युवराजला थेटपणे आपले मनोगत मांडता आलेले नाही, असे वाटू लागते. लहानपण ते आतापर्यंतचा प्रवास मांडताना युवराजने फारच घाई केल्याचे जाणवते. त्याचबरोबर त्याने हातचे राखून लिहिल्यासारखेही वाटते. विश्वचषकातील त्याची कामगिरी, त्या वेळी होणारा त्रास, संघ सहकाऱ्यांचा मिळणारा पाठिंबा, याबाबत लिहिताना युवराज गलबलून जातो. पण हे मांडतानादेखील हा कुठेतरी काहीतरी लपवतो आहे किंवा सगळेच सांगत नसल्याचेही जाणवत राहते.
त्याने कॅन्सरशी केलेले दोन हात, त्यावर मिळवलेला विजय हा या पुस्तकाचा गाभा आहे. हा त्याचा प्रवास प्रेरणादायी नक्कीच आहे. त्याने ज्या तो पद्धतीने मांडला आहे, तो वाचताना अंगावर काटा येतो. कर्करोग असल्याचे समजल्यावर त्याने व्यक्त केलेल्या भावना हृदयाचा ठोका चुकवून जातात. त्यानंतर इंडियानापोलिस, लंडन येथे घेतलेल्या उपचारांची कथाही त्याने अप्रतिम पद्धतीने मांडली आहे. केमोथेरपीनंतर तब्बल १० दिवस त्याला चालता येत नव्हते. मैदानात चित्त्याच्या चपळाईने पळणाऱ्या युवराजला ‘व्हिलचेअर’वर चालताना अश्रू अनावर झाले होते. उपचारानंतर मायदेशात परतण्यासाठी आसुसलेपणा, पुन्हा मैदानात जाण्याची  जिद्द आणि त्याला मिळालेला लोकांचा पाठिंबा हे सारे वाचत असताना युवराज माणूस म्हणून कसा आहे, याचेही दर्शन होते. या उपचारादरम्यान त्याला त्याच्या आईने जी साथ दिली, तीदेखील वाखाणण्याजोगी आहे.
त्याचा हा प्रवास, लढवय्या वृत्ती आपल्याला बरेच काही देऊन जाते.

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
द ओथ ऑफ द वायुपुत्राज् : अमिष त्रिपाठी, पाने : ६००३५० रुपये.
बेस्ट केप्ट सिक्रेट : जेफ्री आर्चर, पाने : ४००३५० रुपये.
द सिक्रेट्स ऑफ अ डार्क : अर्क चक्रबर्ती, पाने : ३६०१९५ रुपये.
तंत्र : अदि, पाने : ३४४१९५ रुपये.
ब्लडलाइन : जेम्स रॉलिन्स, पाने : ४९६३९९ रुपये.

टॉप  ५ नॉन-फिक्शन
हाऊ टु बी वुमन : केटलीन मोरन, पाने : ३२०४५० रुपये.
ऑन हिंदुइझम: वेंडी डॉनिगर, पाने : ६६४९९५ रुपये.
रिल्व्होल्यूशनरी इराण : मिचेल अ‍ॅक्सवर्दी, पाने : ५२८६९९ रुपये.
सिंध – स्टोरीज फ्रॉम अ व्हॅनिश्ड होमलँड : साझ अग्गावाल,
पाने : ३१९६४०० रुपये.
धंदा – हाऊ गुजरातीज् टु बिझनेस : शोभा बोंद्रे, पाने : २९२१९९ रुपये.