‘मल्याळी चित्रपटांना ‘हिट’- ‘सुपरहिट’चे दिवस दाखविणारे पहिले दिग्दर्शक’ असा लौकिक असणारे जे. शशिकुमार १९७० ते १९९३ या काळात वर्षांला किमान एक ‘हिट’ चित्रपट मल्याळम् भाषेत निर्माण करत होते. या यशामागची कारणे काहीही असोत, त्यांचे सातत्य वाखाणण्याजोगेच होते. या सातत्यामुळेच, तब्बल १४१ मल्याळम् चित्रपटांचे दिग्दर्शन आणि त्यापैकी ८६ चित्रपटांत प्रेम नझीर हा एकच नायक, असा एक विचित्र उच्चांक शशिकुमार यांच्या नावावर आहे. एवढय़ा चित्रपटांमुळे अनेक मल्याळी भाषकांच्या आठवणींचा भाग बनलेला हा दिग्दर्शक गुरुवारी, वयाच्या ८७ व्या वर्षी हे जग सोडून गेला.
केवळ जनप्रिय, ‘मसाला’ चित्रपटच त्यांनी बनवले असे नव्हे; १९६७ साली त्यांनी बनवलेला ‘कावालम चुंडन’ हा चित्रपट आर्ट फिल्म म्हणावा असा होता. केरळच्या नद्या-खाडय़ा-कालव्यांमध्ये भरवल्या जाणाऱ्या नौका-शर्यतींमधील एक नौका हेच जणू या चित्रपटातील मुख्य पात्र! पण तिकीटबारीवर हा चित्रपट सणकून आपटला. या अपयशानंतरची मल्याळम्मध्ये सर्वश्रुत असलेली कथा अशी की, हताश बसलेल्या जे. शशिकुमार यांना प्रेम नझीर यांनीच बाहेर काढले. आधी नाश्ता खाऊ घातला आणि मग जेम्स बॉण्डचा नवा सिनेमा दोघांनी पाहिला. आपणही असा नायक, असा थरारपट का काढू नये असे या दोघांच्या मनाने घेतले आणि यातून ‘लव्ह इन केरला’ (१९६८) हा चित्रपट तयार झाला. हे सारे चित्रपट मद्रासमध्ये तयार होत आणि केरळमध्ये प्रदर्शनासाठी जात. पण ‘लव्ह इन केरला’च्या पहिल्या खेळांदरम्यान, ‘तुम्ही इथे याच’ असा धोशा वितरकांनी लावला.. शशिकुमार गेले, तेव्हा प्रेक्षक तर खूश दिसलेच, पण रिळे फिरवणाराही म्हणाला- असे चित्रपट बनले पाहिजेत!
सन १९६४ पासून शशिकुमार या ना त्या प्रकारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात होते. पहिल्या काही चित्रपटांपैकी ‘पेन्नमक्कळ’ हा चित्रपटही गाजला आणि त्यानंतर स्त्रीप्रधान चित्रपट कसे यशस्वी होतात, हे शशिकुमार यांनी ओळखले. शीला ही त्यांच्या १४ चित्रपटांची नायिका होती. शशिकुमार यांनी बनविलेल्या कौटुंबिक चित्रपटांची एकंदर संख्या मात्र कमीच- म्हणजे १४१ पैकी ४७ आहे. ‘फायटिंगवाले सिनेमे’ ही शशिकुमार यांची ओळख! प्रेम नझीरसारखा बंधुवत् दोस्त नायक.. पण मल्याळम् आणि तामिळमध्ये पुढे गाजलेल्या अनेक अभिनेते-अभिनेत्रींनी प्रथम शशिकुमार यांच्यासाठी काम केले होते. उमेदवारीच्या काळात अगदी मोहनलालदेखील त्यांच्याकडून शिकला होता. यशाचा परिसस्पर्श हातात असलेल्या या दिग्दर्शकाने, अनेक मल्याळम् निर्मात्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचेही काम केले होते.