तेलुगूसह विविध भारतीय प्रादेशिक भाषांमधील सर्वाधिक संख्येने चित्रपटांची निर्मिती केल्याने ‘मूव्ही मोगल’ असे बिरुद सहजपणे मिरविणारे चित्रचक्रमांच्या दुनियेतील विक्रमवीर असेही नामाभिधान निर्माते दग्गूबाती रामानायडू अर्थात डी. रामानायडू यांना देता येईल. करमचेदू या आंध्र प्रदेशमधील छोटय़ाशा खेडय़ात शेतकरी कुटुंबात जन्मलेले डी. रामानायडू स्वभावत:च उद्यमशील व्यक्तिमत्त्व. कुटुंबाच्या मालकीचा भातगिरणीचा व्यवसाय करण्याचे काम त्यांनी सुरू केले खरे, पण त्यात मन रमेना म्हणून त्यांनी थेट शंभू फिल्म्स एजन्सी सुरू केली. ही एजन्सी चालवितानाच चित्रपटनिर्मितीच्या विविध अंगांचे ज्ञान मिळविले. ओघानेच तत्कालीन तेलुगू चित्रपटसृष्टीतील अक्किनेनी नागेश्वर राव ऊर्फ एएनआर आदी दिग्गजांशी त्यांची मैत्री झाली. १९५९ साली एएनआर यांच्या एका चित्रपटात डी. रामानायडू यांनी छोटीशी भूमिका केली. पुढे डी. रामानायडू यांची उद्यमशीलता त्यांना तंबाखू तसेच विटा तयार करण्याच्या व्यवसायात घेऊन गेली.
परंतु, अनुरूपा फिल्म्स बॅनरच्या माध्यमातून पुन्हा ते सिनेमाकडे वळले. ‘अनुरागम’ या चित्रपटाद्वारे १९६३ साली निर्माते बनले. नंतर १९६४ साली त्यांनी सुरेश प्रॉडक्शन्सची स्थापना केली आणि मग मागे वळून पाहिलेच नाही. प्रामुख्याने तेलुगू, तामिळ, हिंदी चित्रपटांबरोबरच उडिया, मराठी, पंजाबी, मल्याळम, कन्नड, आसामी, बंगाली, गुजराती, भोजपुरी अशा अनेक भाषांमधील चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती या विक्रमाबरोबरच त्यांनी ११ अभिनेत्री, २० दिग्दर्शक आणि अनेक विनोदवीर अभिनेते, चरित्र अभिनेते यांना पहिली संधी दिली हाही विक्रमच ठरावा. आपल्या प्रत्येक चित्रपटातून पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकण्याचाही त्यांचा प्रघात होता.
‘सिनेव्हिलेज’, ‘कलर लॅब’ आणि ‘रामानायडू स्टुडिओज’ची हैदराबाद येथे स्थापना केली. ‘सिनेव्हिलेज’मध्ये प्रवेश करताना कथा-पटकथेचे बाड सोबत असेल तर या ‘गावा’तून बाहेर पडताना चित्रपटाची रिळे घेऊनच माणूस येऊ शकतो असे मानले जात होते. हैदराबाद हे तेलुगू चित्रपटनिर्मितीचे केंद्र बनविण्यात ते अग्रस्थानी होते. अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांच्या शंभराव्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा अनोखा विक्रमही डी. रामानायडू यांच्या नावावर आहे. ‘दादासाहेब फाळके पारितोषिक’ हा भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान त्यांनी मिळविला असला तरी दिग्दर्शक बनण्याची त्यांची शेवटची इच्छा मात्र अपूर्णच राहिली.