News Flash

कोणी पुसेना.. पोसेना कोणाला!

चार वा पाच स्पर्धक संघांच्या या निवडणूक नामक शर्यतीत उतरलेले धावपटू आणि त्यांचे संघ यांच्यात औषधापुरताही ताळमेळ राहिलेला नाही.

| September 30, 2014 12:10 pm

चार वा पाच स्पर्धक संघांच्या या निवडणूक नामक शर्यतीत उतरलेले धावपटू आणि त्यांचे संघ यांच्यात औषधापुरताही ताळमेळ राहिलेला नाही. पुढील दोन आठवडे या गोंधळी रामायणाचे नवनवीन अध्याय राज्यात लिहिले जातील आणि गरीब बिचारी जनता असहायपणे या खेळाकडे पाहत राहील..
तीर्थस्थानी भरणाऱ्या गोंधळी कुंभमेळ्यात पालकांपासून हरवलेल्या बालकाची जी अवस्था होते तशी अवस्था दर पाच वर्षांनी भरणाऱ्या लोकशाहीच्या कुंभमेळ्यात महाराष्ट्रातील मतदाराची झाली असल्यास आश्चर्य वाटावयास नको. निवडणुकांच्या हंगामात गोंधळ आणि गडबड अपेक्षितच आहे. परंतु सध्या जे काही सुरू आहे त्याने आतापर्यंतच्या सर्व अनागोंदीस मागे टाकले असून हा महाराष्ट्राचा विक्रमच म्हणावयास हवा. जे काही सुरू आहे ते पाहून मतदारांच्या मनात कालचा गोंधळ बरा होता हा वाक्प्रचार त्याच्या पूर्वार्धासह चमकून जाणे साहजिक . हा गोंधळ कमी म्हणून की काय राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून राज्य करण्याची आपली हौस तेवढय़ातल्या तेवढय़ात भागवली आणि विद्यमान गुंता वाढवण्याची व्यवस्था केली. आता पुढील दोन आठवडे या गोंधळी रामायणाचे नवनवीन अध्याय राज्यात लिहिले जातील आणि गरीब बिचारी जनता असहायपणे या खेळाकडे पाहत राहील.
या गोंधळ रामायणाचे पहिले दोन अध्याय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडी आणि भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती यांना वाहण्यात आले आहेत. ही आघाडी होणार की नाही, झाली तर काँग्रेस किती जागा लढवणार, राष्ट्रवादीच्या वाटय़ास किती जागा येणार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र प्रचार करणार काय, केलाच तर पाटबंधारे आदी महत्त्वाच्या मुद्दय़ांवर हे दोघे जनतेसमोर काय बोलणार.. अशा अनेक प्रश्नांचा भुंगा मतदारांची विचारशक्ती कुरतडत होता. खरे तर मुदलात ही आघाडी हाच मोठा गोंधळ होता. मांसान्नाचा व्यापार करणारा आणि गोपालक यांनी जसे एकत्र येणे हा विरोधाभास असेल तसाच किंबहुना त्याहूनही अधिक विरोधाभास अजित पवार, सुनील तटकरे आदी मान्यवरांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणे हा होता. एकाचे कंत्राटदाराशिवाय पान हलत नाही आणि दुसरा कंत्राटदार दिसला की अजिबात हलत नाही. तेव्हा हा विषमविषमा संयोग पुढेही चालू राहणार काय, या प्रश्नाने मतदारांस चक्रावून टाकले होते. अशक्यास शक्य करण्याची कला असे राजकारणास म्हटले जाते. या कलेचा आविष्कार गेली तीन वर्षे महाराष्ट्रात दैनंदिन पातळीवर पाहावयास मिळत होता. या आविष्काराचे सादरीकरण असेच पुढे चालू राहणार का, हा मुद्दा होता. त्याचे सरळ उत्तर न देता जेवढा माजवता येईल तेवढा गोंधळ माजवून या दोन सत्ताधारी पक्षांनी दिले. खरे तर त्यांना त्यांच्यापुरते या प्रश्नाचे उत्तर कधीच देत आले असते. पण ते त्यांनी दिले नाही. का? कारण त्यांना सेना आणि भाजप या २५ वर्षे संसार केलेल्या जोडप्याचे काय होते, यात रस होता. असे का? या प्रश्नाचे एक उत्तर सत्ता या मोहिनीत आहे, असे म्हणावयास हवे. १५ वर्षे काँग्रेसबरोबर या सत्तेस भोगून झाल्यानंतर आता तिचे चिपाड झाले आहे, तीत काही राहिलेले नाही हे समजण्याचे चातुर्य राष्ट्रवादीकडे असल्यामुळे त्यांनी काँग्रेसशी काडीमोड घेतला असे राजकारणात बोलले जाते. खरे खोटे तो नरेंद्र आणि त्याला वश झालेली सत्ता या दोघांकडेच आहे. याचा अर्थ असा की पुढील विधानसभा निवडणुकांनंतर समजा सत्ताशक्तीने आपले माप भाजपच्या पदरात टाकले तर आपणही अशा वेळी भाजपच्या अंगणात असलेले बरे असा विचार राष्ट्रवादीने केला नसेलच असे नाही. खेरीज या पृथ्वीराजाबरोबर राहावे तर तो पाटबंधारे खात्यातील व्यवहारांची चौकशी करायचा ही भीतीही राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची होती, असे म्हणतात. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कळपात सत्ता मिळणार नाही याची ठाम खात्री असल्यामुळे मतभेद. तर सेना-भाजपच्या प्रांगणात ती मिळण्याची शक्यता असल्यामुळे मतभेद. त्यामुळे निवडणुकीनंतर या सत्तासुनेने आधी मातोश्रीचे माप ओलांडून आमच्या अंगणात प्रवेश करावा असा शिवसेनेचा आग्रह. तर मुळात ही सत्ता येणार आहे ती नरेंद्र मोदी यांच्या दिव्य व्यक्तिमत्त्वास भाळून त्यामुळे तिला मातोश्रीची गरजच काय, असा भाजपचा दावा. हे काही अर्थातच शिवसेनेस मंजूर नव्हते. युवासेनेचा तरणाबांड गडी चि. आदित्य याच्या तारुण्यावर भाळून ती येणार आहे, असे त्या पक्षाचे म्हणणे. यातून काही मार्ग निघेना. अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीप्रमाणेच या दोघांनीही काडीमोड घ्यायचा निर्णय घेतला आणि परिणामी चारही पक्ष स्वतंत्रपणे या सत्तेच्या मागे लागणार हे स्पष्ट झाले. त्यानंतर इंग्रजीत ज्याप्रमाणे ऑल हेल ब्रोक लूज ही म्हण आहे, तशी परिस्थिती महाराष्ट्राच्या अंगणात निर्माण झाली असून या शर्यतीत आता सर्वानीच उतरावयाचे ठरवलेले असल्याने एकच धुरळा उडालेला आहे. अशा सत्ता शर्यतीत कोणी, कसे आणि काय आयुधे घेऊन धावावे याचे काही संकेत असतात. पण ते या शर्यतीत फारच धुळीला मिळाले. याचे कारण प्रत्येकास वाटत होते या शर्यतीत दोनच संघ असतील. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-सेना. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अर्धा संघ धरला तर ही स्पर्धा फार फार तर अडीच जणांची होईल असा होरा होता. पण तसे न होता एकदम पाच स्पर्धकांची झाल्यामुळे कोणी कोणाबरोबर धावावे याचेही कसलेच नियोजन कोणाला करता आले नाही. एरवी अशा शर्यतीत धावू इच्छिणारे उमेदवार आपापल्या जवळच्या संघांना आम्हाला घेणार का.. अशी विचारणा करतात. परंतु या वेळी प्रत्येकालाच धावावयाचे असल्याने हे असले प्रश्न विचारण्याच्या फंदातही कोणी पडले नाही. त्यामुळे शर्यतीत धावण्याचा गणवेश एकाकडून तर पायताणे दुसऱ्याचीच आणि डोक्यावरती टोपी आणखी भलत्याचीच असे चित्र सर्रास दिसत असून प्रत्येक स्पर्धक म्हणजे एकेक ध्यानच अशी परिस्थिती तयार झाली आहे. या अशा वातावरणामुळे स्पर्धक संघांचीही पंचाईतच झाली. कारण या संघांना आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत म्हणून जास्तीत जास्त धावपटूंची गरज होती. पण तितके तर त्यांच्या संघात नव्हते. म्हणून अनेकांनी जो कोणी धावायला तयार आहे त्या प्रत्येकाला आपला मानायला सुरुवात केली. त्यामुळे झाले असे की काही धावपटूंना हवे होते ते संघ मिळाले नाहीत आणि काही संघांना हवे ते धावपटू मिळाले नाहीत. म्हणून मग प्रत्येकाने जो कोणी धावतोय त्याला आपला म्हणायला सुरुवात केली आणि प्रत्येक धावपटूने जो कोणी आपले म्हणावयास तयार आहे त्या संघाशी घरोबा करण्यास प्रारंभ केला.
याचा परिणाम असा झालेला आहे की या निवडणूक नामक शर्यतीत उतरलेले धावपटू आणि त्यांचे संघ यांच्यात औषधापुरताही ताळमेळ राहिलेला नाही. या पारंपरिक संघांच्या जोडीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम आदी अनेक लिंबूटिंबू हेदेखील धावत सुटले आहेत. वस्तुत: त्यांना आपल्या ताकदीचा अंदाज आहे. परंतु तरीही तगडय़ा धावपटूंमधला कोणी बसलाच तर आपण असलेले बरे असा विचार त्यांनी केला आहे तर आपला उमेदवार या पाच पायांच्या शर्यतीत पडलाच तर हे लिंबूटिंबू तरी असावेत असा विचार या राजकीय पक्षांच्या संघांनी केला आहे. तेव्हा अशा तऱ्हेने महाराष्ट्र विधानसभेची ही शर्यत धुळवड नामक सणास साधम्र्य वाटेल अशी झाली असून या गलबल्यात नक्की कोण कोणास पुसणार.. आणि पोसणारही.. आहे हे कोणालाच कळेनासे झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 12:10 pm

Web Title: five political party contesting maharashtra assembly poll separately
Next Stories
1 अम्मा बिगडी जाये..
2 एक लाट तोडी त्यांना..
3 काजळमाया
Just Now!
X