गोष्ट आहे ८० वर्षांपूर्वीची. उर्दूमध्ये १९३२ साली नऊ कथा आणि एका एकांकिकेचा संग्रह ‘अंगारे’ या नावानं प्रकाशित झाला. भारतीय मुस्लिमांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रतिगामीपणाचा बुरखा फाडणारं हे लेखन सज़्‍जाद ज़्‍ाहीर, अहमद अली, रशीद जहाँ आणि महमूद-उझ-ज़्‍ाफर या पंचविशीच्या आतल्या चार लेखकांनी केलं होतं. यात ज़्‍ाहीर यांच्या पाच कथा, अली यांच्या दोन, जहाँ यांची एक कथा व एक एकांकिका आणि ज़्‍ाफर यांची एक कथा यांचा समावेश होता. नोव्हेंबर १९३२ मध्ये लखनौमधून या संग्रहाचं प्रकाशन करण्यात आले. त्याच्या एक हजार प्रती छापण्यात आल्या. किंमत होती चार आणे. एवढुसं पुस्तक पण ते प्रकाशित झालं आणि उत्तर भारतात हलकल्लोळ माजला. इस्लाम आणि मुसलमानांच्या विरोधात पाश्चात्त्य शिक्षणाने डोकं फिरलेल्या उन्मादी तरुणांचं हे षड्यंत्र आहे, हा इस्लाम आणि मुसलमानांना बदनाम करण्याचा डाव आहे, अशी भूमिका काही समाजकंटकांनी घेतली. धार्मिक संघटनांनी या पुस्तकाच्या विक्रीवर बंदी घालण्याची आणि लेखकांना शिक्षा करण्याची मागणी केली. काही लोकांनी या पुस्तकाच्या लेखकांवर कारवाई करण्यासाठी फंड गोळा केला. फेब्रुवारीमध्ये झालेल्या शिया परिषदेमध्ये लेखिका डॉ. रशीद जहाँ यांच्यावर ठपका ठेवला गेला. एक मुस्लीम स्त्री धर्माच्या आणि मुस्लिमांच्या श्रद्धास्थांनांच्या विरोधात लिहिते ही गोष्ट तत्कालीन समाजाच्या पचनी पडण्यासारखी नव्हती. ‘अंगारेवाली रशीद जहाँ’ असं त्यांचं नावच पडलं.
शेवटी ब्रिटिश सरकारने १५ मार्च ३३ रोजी आय.पी.सी. कलम २९५ए अंतर्गत पुस्तक जप्त करण्याचे आदेश दिले. सरकारी रेकॉर्डसाठी पाच प्रती ठेवून बाकी साऱ्या प्रती जाळून टाकण्यात आल्या. म्हणजे नोव्हेंबर १९३२ मध्ये हा संग्रह प्रकाशित झाला आणि मार्च १९३३ मध्ये -म्हणजे अवघ्या चार महिन्यांनी- त्यावर बंदी आली. याशिवाय पुस्तक लेखकांना सामाजिक बहिष्काराला, धार्मिक-उग्र संघटना यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पण चारही लेखकांनी कुठल्याही प्रकारे माफी मागायला विरोध केला. ते आपल्या मतावर शेवटपर्यंत ठाम राहिले.
या पुस्तकानं उर्दू साहित्यात क्रांती केली. कथालेखनाला नवी दिशा दिली. एवढंच नव्हे तर सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई, कैफ़ी आज़्‍ामी, हसन असकरी यांसारख्या अनेक लेखकांना प्रेरणा दिली. उर्दूमध्ये धार्मिक- सामाजिक रूढींबद्दल आणि स्त्री-पुरुष संबंधांबद्दल मोकळेपणानं लिहिण्याची परंपरा याच पुस्तकानं सुरू केली. या पुस्तकाचा प्रभाव हिंदी कथालेखनावरही पडला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या लेखनाचा प्रसार-प्रचार करण्याच्या हेतूनं एप्रिल १९३६ मध्ये प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली. त्यात या पुस्तकाचे लेखक आघाडीवर होते. त्यांच्या पहिल्या संमेलनाला प्रेमचंद यांना बोलावण्यात आलं..ते आलेही.
थोडक्यात धार्मिक उन्माद आणि कर्मठ सामाजिक रूढींच्या विरोधात ब्र उच्चारण्याची प्रेरणा देणारं हे पुस्तक. पण दुर्दैवानं त्यानंतर या संग्रहाचं बराच काळ उर्दूमध्ये पुनर्प्रकाशन होऊ शकलं नाही आणि त्याचा इतर भाषांमध्येही अनुवाद होऊ शकला नाही. १९९५ साली प्रोग्रेसिव्ह रायटर्स मूव्हमेंटनं त्याचं पुनप्र्रकाशन केलं, तर १९९० मध्ये शकील सिद्दिकी यांनी त्याचा हिंदी अनुवाद केला.
त्यानंतर आता या पुस्तकाचे एकाच वेळी दोन इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाले आहेत. हे दोन्ही अनुवाद थेट उर्दूमधून केले आहेत. पहिला अनुवाद विभा चौहान व खालीद अली यांनी केला असून तो ‘अंगारे- ९ स्टोरीज अ‍ॅण्ड अ प्ले’ या नावाने प्रकाशित झाला आहे, तर दुसरा अनुवाद स्नेहल सिंघवी यांनी केला असून तो ‘अंगारे’ या नावाने प्रकाशित झाला आहे. त्याच्या मुखपृष्ठावर ‘द फर्स्ट- एव्हर इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ द बॅन्ड शॉर्ट-स्टोरी कलेक्शन’ असं छापलं आहे. दोन्हींचे प्रकाशक वेगवेगळे आहेत.
सज़्‍जाद ज़्‍ाहीर यांची मुलगी नादिरा बब्बर यांनी ‘अंगारे- ९ स्टोरीज अ‍ॅण्ड अ प्ले’ला प्रस्तावना लिहिली आहे. तर खालिद अली यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असून त्यात त्यांनी संग्रहातील चारही लेखकांचा परिचय, पुस्तकावरून उठलेलं वादळ, त्याविषयी उर्दू वर्तमानपत्रांमध्ये लिहिले गेलेले लेख आणि अनुवाद करण्यामागची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. हे पुस्तक पेपरबॅक या प्रकारातलं असल्यानं त्याची किंमत माफक म्हणावी अशी आहे.
याउलट स्नेहल सिंघवी यांचा अनुवाद हार्ड बाऊंड असल्यानं तो जरा महाग आहे. त्यांनीही आपल्या मनोगतात या पुस्तकानंतरच्या वादळाचा थोडक्यात इतिहास दिला आहे. याशिवाय मूळ उर्दू पुस्तकाचं मुखपृष्ठ दिलं आहे. अनुवाद करताना त्यांनी मूळ पुस्तकाची शैली सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. परिशिष्टामध्ये तत्कालीन पोलिसांचं तक्रारपत्र, सेक्रेटरीचं पत्र आणि ज़्‍ाफर यांनी इंग्रजी वर्तमानपत्रात लिहिलेला लेख दिला आहे. दोन्हींची मुखपृष्ठं वेगळी आहेत. दोन्ही पुस्तकांच्या अनुवादकांनी मूळ वादाविषयी लिहिलं असलं तरी त्याची पुनरावृत्ती फारशी झालेली नाही.   
प्रश्न निर्माण होतो की,  वाचक म्हणून यापैकी कुठलं पुस्तक घ्यावं? तुम्ही हिंदी-उर्दूशी थोडेफार परिचित असाल तर आणि भारतीय इंग्रजी वाचणं एन्जॉय करू शकत असाल तर  ‘अंगारे- ९ स्टोरीज अ‍ॅण्ड अ प्ले’ हे पुस्तक घ्यायला हरकत नाही. पण तुमचं प्राधान्य चांगला अनुवाद, चांगली इंग्रजी भाषा यांना असेल तर मात्र तुम्ही स्नेहल सिंघवी यांचं -थोडं महाग असलं तरी- पुस्तक घ्यावं.
एकच पुस्तक दोन वेगवेगळ्या लेखकांनी एकाच भाषेत एका वेळी अनुवादित करण्यामागं नेमकं काय कारण असावं? सध्या भारतात पुस्तकांवरील सेन्सॉरशिप वाढते आहे. दिनानाथ बात्रा हे त्यामध्ये सर्वात आघाडीवर असलेलं नाव आहे. पण केवळ ‘बात्रांचाच खतरा’ आहे, असं नाही. आपल्या श्रद्धेय विषयावरील टीकात्मक लेखन स्वीकारण्याची भारतीय समाजाची मानसिकताच संकुचित होत चालली आहे. आणि त्याला हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, असा कुठलाही धर्म वा त्यांतील समाजगट अपवाद नाहीत. या पाश्र्वभूमीवर आपल्या लेखनाचा निडरपणे पुरस्कार करणाऱ्या, त्यावर ठाम राहणाऱ्या आणि कुठल्याही दबावाला बळी न पडणाऱ्या लेखकांचं ‘अंगारे’ हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. उर्दू साहित्यात मैलाचा दगड ठरलेल्या या पुस्तकापासून लेखकांना धैर्याची प्रेरणा मिळो आणि समाजकंटकांना सद्बुद्धी सुचो.
 sam07    
अंगारे  : अनुवाद – स्नेहल सिंघवी, पेंग्विन बुक्स, गुरगाव, पाने : १६७, किंमत : ४९९ रुपये.

१९३२ साली उर्दूमध्ये प्रकाशित झालेल्या ‘अंगारे’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे मुखपृष्ठ

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

अंगारे  : अनुवाद – विभा एस. चौहान, खालीद अल्वी, रूपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली,  पाने : १०५, किंमत: १९५ रुपये.