गुजरातचे खरे मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक व वयोवृद्ध काँग्रेस नेते याच्यापेक्षा अधिक शेतकरी हिताचा कैवारी अशीच सनत मेहता यांची ओळख होती. विद्यार्थिदशेत संघटनेचे नेतृत्व, स्वातंत्र्यसंग्रामातील सहभागानंतर ते शेतक ऱ्यांची आंदोलने ते कामगार संघटनांतील योगदान अशा निरनिराळ्या उपक्रमांनी ते कायम लोकांशी निगडित राहिले. धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी- समाजवादी अशी त्यांची ओळख होती. तंत्रज्ञानाने माणसाचे जीवन सुधारता येते, अशी त्यांची धारणा होती. पंचायत राजव्यवस्थेवर त्यांचा कमालीचा विश्वास होता.
त्यांचा जन्म भावनगर जिल्ह्य़ातील जेसार खेडय़ात १८ एप्रिल १९२५ रोजी झाला. ते स्वातंत्र्यलढय़ातही सहभागी होते. तुरुंगवासही भोगला. शेतकऱ्यांचे नेते असल्याने त्यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्योगधार्जिण्या धोरणांना विरोध केला, ‘व्हायब्रंट गुजरात’ला त्यांनी ‘खेडय़ातच खरा गुजरात आहे,’ अशा आशयाची घोषणा देऊन उत्तर दिले होते.  १९७२-७४ व १९८०-८५ या काळात ते माधवसिंह सोळंकी मंत्रिमंडळात त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद भूषवले. अलंग येथील जहाजतोडणी कारखाना स्थापन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. सरदार सरोवर प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागला, ते सरदार सरोवर नर्मदा निगम लि.चे अध्यक्ष होते, पण या प्रकल्पाचे श्रेय त्यांना कुणी दिले नाही हे दुर्दैव. श्रमिक विकास संस्थेच्या वतीने मिठागरांमध्ये काम केल्याने कर्करोग होणाऱ्या कामगारांना सुरक्षा साधने मिळावीत म्हणून आंदोलन केले. २००१ मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. निरमाच्या महुआ येथील प्रकल्पाविरोधात जे आंदोलन झाले त्यात डॉ. कनुभाई कलासरिया यांच्यामागे मेहतांचे पाठबळ होते. विशेष म्हणजे, त्यांनी भारतीय किसान संघाच्या एका गटाचे नेतृत्व करताना शेतक ऱ्यांचे मॉल्स व त्यांच्या कंपन्या यांना जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. शेतक ऱ्यांसाठी त्यांनी काही वेळा विचारसरणी बाजूला ठेवली.  छुवाल येथे ४४ खेडय़ांतील सुपीक जमीन मारुती कंपनीने घेतली तेव्हा त्यांनी कापूस उत्पादकांसाठी लढा दिला. बाजूने ट्रॅक्टर्सनी गराडा घातला असताना त्यांनी एक पाऊलही मागे घेतले नाही. कपास किसान हितरक्षक समिती त्यांनी स्थापन केली होती. अर्थमंत्री असताना त्यांनी सार्वजनिक वितरणप्रणालीत गरिबांना कमी दरात खाद्यतेल देऊन तेल व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडली होती. त्यांनी राजकारणापलीकडे जाऊन मित्र जोडले, अलीकडेच झालेल्या त्यांच्या निधनाने गांधींच्या निर्भय गुजरातमधील एका राजकारण्यापेक्षाही सामाजिक क्षेत्रातील एका लढवय्याला शेतकरी पोरके झाले.