16 February 2019

News Flash

सूर्यबहादूर थापा

नेपाळचे पंतप्रधानपद पाच वेळा- म्हणजे राजेशाहीच्या काळात तीनदा आणि ‘लोकशाही’ आल्यानंतरही दोनदा- भूषवणारे सूर्यबहादूर थापा यांची निधनवार्ता

| April 17, 2015 01:01 am

नेपाळचे पंतप्रधानपद पाच वेळा- म्हणजे राजेशाहीच्या काळात तीनदा आणि ‘लोकशाही’ आल्यानंतरही दोनदा- भूषवणारे सूर्यबहादूर थापा यांची निधनवार्ता गुरुवारी आल्यानंतर, एक राजकीय नेता म्हणून त्यांची कारकीर्द किती प्रदीर्घ होती याचीही माहिती साहजिकच दिली जाते आहे. १९६३ ते ६४ , पुन्हा १९६५ ते ६९, १९७९ ते ८३ आणि लोकशाही येता येता १९९७ ते ९८, मग हंगामी राज्यघटनेनुसार झालेल्या निवडणुकीनंतरही २००३-०४ असे त्यांच्या पंतप्रधानपदाचे कालखंड आहेत. म्हणजे एकंदर उणीपुरी १३ वर्षे भरतील, इतका काळ. जरा बेरीज-वजाबाकी केल्यास असे दिसेल की, १९२८ साली जन्मलेले आणि १९५८ पासून दरबारी राजकारणात असलेले थापा, सुमारे ५५ पैकी १३च वर्षे पंतप्रधान होते.. मग उरलेली ४२ वर्षे ते राजकारणात काय करीत होते?
याचे सर्वात छोटे उत्तर नेपाळमध्ये १९९५ ते २००० या वादळी काळात भारतीय राजदूत असलेले माजी अधिकारी के. व्ही. राजन यांनी त्यांच्या ‘अ‍ॅम्बॅसेडर्स क्लब’ या पुस्तकातील एका वाक्यात सापडते- ‘ही बिलाँग्ड टु द राँग पार्टी’ – थापा चुकीच्या पक्षात राहिले, असे राजन यांचे म्हणणे. परंतु हा ‘चुकीचा पक्ष’ म्हणजे थापांनीच स्थापलेला गट होता. राजकारणासाठी आवश्यक असे बुद्धी शहाणपण, अनुभव हे सर्व घटक थापांकडे होतेच, पण महत्त्वाकांक्षाही होती. त्यामुळे थापांनी तडजोडी स्वीकारल्याच, पण निराळे राजकीय अस्तित्व मात्र टिकवले. गणेश मान सिंह, गिरिजाप्रसाद कोइराला, के. पी. भट्टराय अशा बुजुर्ग नेत्यांपैकी सर्वाधिक तल्लख, नेमके बोलणारे आणि राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाण असणारे नेते, असे थापा यांचे वर्णन राजन यांच्या पुस्तकात आहे. अशा नेत्यांच्या स्पर्धेत, स्वत:चे राजकीय बेट तगवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या काही भूमिका वादग्रस्तही ठरल्या. मात्र लोकशाहीवर प्रगाढ श्रद्धा, हे त्यांचे वैशिष्टय़ होते. माओवाद्यांच्या उच्छादी निदर्शनांमुळे थापांची अखेरची- म्हणजे २००३ ते २००४ अशी अल्पजीवी कारकीर्द सर्वाधिक अस्थिर ठरली, ती त्यांच्या लोकशाहीवादामुळेच.  राजकारणात थापा यांनी प्रवेश केला, ते साल होते १९५०. नेपाळमध्ये राजेशाही इतकी घट्ट होती की, विद्यार्थी चळवळ वगैरे शब्दही दूरचे होते. त्या काळात थापांनी, विद्यार्थ्यांच्या ‘आधुनिकतावादी’ मागण्यांना वाट करून दिली होती. पुढे  मात्र ते राजाला सल्ला देणाऱ्या मंडळात निवडले गेले आणि तेव्हापासून दरबारी राजकारणात त्यांनी असा काही जम बसवला की, १९६३ मध्ये ते नेपाळनरेशांचे सर्वात विश्वासू सेवक होते.

First Published on April 17, 2015 1:01 am

Web Title: former nepal pm surya bahadur thapa dies