फ्रान्सचे राजकारण म्हणजे रगेल आणि रंगेल व्यक्तिमत्त्वांचे भांडार. या देशाचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी हे रंगेल; तर आताचे फ्रान्स्वा ओलांद हे नेमके त्याच्या उलट, म्हणजे करडय़ा शिस्तीचे. या अध्यक्ष महाशयांनी फ्रान्सच्या पंतप्रधानपदावर मॅन्युएल व्हॉल्स यांना नियुक्त केले आहे. मॅन्युएल व्हॉल्स फ्रेंच राजकारणाच्या पहिल्या पठडीत मोडणारे.. म्हणजे रगेल! या नवनिर्वाचित पंतप्रधानांचे वर्णन करायचे झाल्यास ‘नखशिखान्त र्टेबाज’ असेच करणे उचित ठरेल.
व्हॉल्स यांचे जन्मस्थान स्पेनमधील बार्सिलोना असले तरी त्यांचे अवघे आयुष्य फ्रान्सच्या भूमीवरच गेलेले आहे, त्यामुळे साहजिकच फ्रेंच संस्कार त्यांच्या रक्तात अगदी पक्के मुरले आहेत. दीड-एक वर्षांपूर्वी फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्हॉल्स पूर्ण तयारीनिशी उतरले होते. मात्र, पहिल्याच फेरीत ते हरले. हरल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही, तर ओलांद यांचे कट्टर समर्थक बनले आणि त्यांचा प्रचार करू लागले. अशा या जळत्या निखाऱ्याकडे ओलांद यांचे लक्ष न जाते तर नवलच होते. त्यांनी व्हॉल्स यांना थेट गृहमंत्रिपदच बहाल करून टाकले. तत्पूर्वी २००१ ते २०१२ एवढा प्रदीर्घ काळ व्हॉल्स पॅरिसनजीकच्या एव्हरी या नगराचे महापौर होते. अतिउजवी विचारसरणी असलेल्या व्हॉल्समधील स्पार्क ओळखला तो तेथील ‘उजव्या विचारसरणीच्या समाजवादी’ पक्षाने. त्यांना थेट राष्ट्रीय राजकारणातच उतरण्याची संधी पक्षाने दिली. मूळच्या आक्रमक स्वभावाने व्हॉल्स यांना अधिकच आत्मविश्वास आला. त्यांनी थेट अध्यक्षपदाच्या शर्यतीतच धाव घेतली. त्यांना पसंतीची मतेही मिळाली, परंतु अध्यक्षपदापर्यंत नेण्याइतपत तेवढी ती पुरेशी नव्हती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी फ्रान्सच्या भूमीवर निर्वासित म्हणून राहणाऱ्या रोमानियन लोकांना उद्देशून अशोभनीय भाषा वापरली होती. रोमानियनाचे हे लोक फ्रान्सच्या भूमीवर राहण्याच्या लायकीचे नसून त्यांनी त्यांच्या मायभूमीत चालते व्हावे, असे व्हॉल्स यांनी म्हटले होते. हे प्रकार त्यांच्या उजवेपणावर शिक्कामोर्तब करणारेच आहेत. फ्रान्समध्ये कुठेही जरा खुट्ट झाले की व्हॉल्स महाशय थेट घटनास्थळीच दाखल व्हायचे. गृहमंत्रिपदी असतानाचा त्यांचा हा खाक्या भल्याभल्यांना चळाचळा कापायला लावायचा.
 त्यामुळेच व्हॉल्स यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याने युरोपीय महासंघाच्या नेत्यांच्या उरात धडकी भरली आहे. एका बुलफायटरप्रमाणेच त्यांचे वर्तन असते असे ‘ला फिगारो’ या उजव्या विचारसरणीच्या फ्रेंच वृत्तपत्राने व्हॉल्स यांचे वर्णन केले आहे. आक्रमक, प्रखर देशभक्त, करडय़ा शिस्तीच्या या ५१ वर्षांच्या नव्या पंतप्रधानाच्या हाती फ्रान्सची धुरा आली आहे खरी, त्यातून फ्रान्सची विस्कटलेली आíथक घडी नीट बसते का ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.