यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार फ्रेंच कादंबरीकार पॅट्रिक मोदियानो यांना जाहीर झाला आहे. ‘स्मृतीचा पुनशरेध घेणारा लेखक’ म्हणून स्वीडिश अकादमीने  गौरवलेल्या या कादंबरीकाराविषयी..
मराठी मातृभाषा असलेल्या आणि अगदी फ्रेंच नव्हे, पण इंग्रजी साहित्य तरी वाचणाऱ्यांनी पॅट्रिक मोदियानोच्या कादंबऱ्या का वाचायच्या, असा प्रश्न आता पडेल. त्यांना साहित्याचं ‘नोबेल पारितोषिक’ मिळालं आहे म्हणून, हे या प्रश्नाचं उत्तर बिनचूक आहे, पण ते फारच अपुरं आहे. लेखक केवळ नामवंत आहे म्हणून वाचायचा असतो का? नाही. नसतो. पण पुरस्कार हे निमित्त नक्की असतं. ओऱ्हान पामुकदेखील नोबेल मिळेपर्यंत मराठीभाषक इंग्रजी वाचकांना अपरिचित होते, पण अखेर त्यांचं एक तरी पुस्तक (‘माय नेम इज रेड’) आता मराठीत येतंय.. हे कदाचित मोदियानो यांच्याबद्दलही होईल. सध्या मोदियानो महाराष्ट्रासाठी परकेच आहेत. इंटरनेटवर ‘अमेझॉन’ आपल्याला सांगतं की, त्यांच्या इंग्रजी भाषांतरित पुस्तकांखेरीज त्यांच्या लिखाणाचा अभ्यास करणारी पुस्तकंही उपलब्ध आहेत. शिकागो विद्यापीठानं मोदियानोच्या कादंबऱ्या उत्तराधुनिक कशा ठरतात, याची चर्चा करणारं अकेन कावाकामी या अभ्यासकाचं ‘अ सेल्फ कॉन्शस आर्ट’ हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित केलं होतं. यापैकी कुठलीच पुस्तकं आपल्या जवळच्या पुस्तक दुकानात नसतात. (भारतीय वेबसाइटवरही गुरुवारी नव्हती.) आपल्याकडे असतं फक्त कुतूहल- उत्कंठाच कदाचित आणि तो कुतूहलाचा डोंगर खोदण्यासाठी कुदळ-फावडय़ांऐवजी काही चमचे.. पुन्हा गुगलच्याच मदतीनं मिळालेले. हे चमचे म्हणजे, मोदियानो किंवा त्यांच्या फ्रेंचमध्येच उपलब्ध असलेल्या काही मुलाखती.
 मोदियानो यांची ‘कारकीर्दीची मुलाखत’ म्हणतात तशा विस्ताराची, तशा गांभीर्याची एकही मुलाखत फ्रेंचमध्येही (इंटरनेटवरून तरी) उपलब्ध नाही. आहेत त्या प्रासंगिक मुलाखती. ‘ल ह्र्ब द नुइ’ (ग्रास नाइट) या पुस्तकाची पूर्वप्रसिद्धी सुरू असताना घेण्यात आलेल्या २०१२ सालच्या दोन मुलाखती, याच त्यातल्या त्यात नव्या मुलाखती. अर्थात, हा वाचकप्रिय फ्रेंच लेखक (किंवा फ्रेंच-वाचकप्रिय लेखक) एरवी मुलाखती देतच नाही हे ध्यानात ठेवून दोन्ही मुलाखतींत प्रश्न विचारले गेलेले दिसतात. त्यामुळे या दोन मुलाखतींची, लेखक समजून घेण्यासाठी मदत होते. इंग्रजीत न्यू यॉर्कर, गार्डियन, न्यूयॉर्क टाइम्स आदींनी मोदियानोंबद्दल माहिती देण्यात आघाडी घेतली असली तरी, या फ्रेंच मुलाखतींचं महत्त्व त्यापुढे कमी होत नाही.
सन १९६९ पासून आजतागायत अव्याहत लेखन करणारे मोदियानो, दोन्ही मुलाखतींत स्वत:च्या पहिल्या कादंबरीआधीच्या संघर्षकाळाबद्दल बोलले आहेत. ‘‘स्वत:बद्दल मी बरंच लिहून ठेवलं होतं, पण ते सारं हरवलं. बरंच झालं हे एका अर्थी, कारण मी बालपणापासून अत्याचार कसे पाहिले, याबद्दल फारच कडवटपणानं लिहिलं होतं. आता ते हरवलंयच म्हटल्यावर मी कादंबरी लिहायला घेतली. त्यातही हेच अनुभव झिरपले,’’ असं मोदियानो ‘ल इनरॉक्स’ या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात. दुसऱ्या- ‘ल फिगारो’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हाच विषय निघतो तेव्हा ‘हरवलं कसं ते बाड?’ असाही प्रश्न निघतो. फ्रान्समध्ये १९६५ ते १९६८ ही र्वष उत्पातीच होती आणि मोदियानोसुद्धा बेघरच होते. ते ज्या खाणावळीत राहात, तिथं त्यांनी हे बाड ठेवायला दिलं.. मग ते कुणाकडून हरवलं माहीत नाही. असाच तपशिलाचा भाग मोदियानो यांचा ‘बेपत्ता’ होऊन (बहुधा) मृत झालेला एक भाऊ, आई वगैरेंबद्दलच्या उत्तरात आहे. त्या भावाची कथा मोदियानींच्या अनेक कादंबऱ्यांत/ लघुकादंबऱ्यांत या ना त्या प्रकारे येते. मुलाखतीतून, ‘आत्मकथन हरवलं, हे बरंच झालं’ हे वाक्य लक्षात राहातं.
‘‘मी तरुण असताना बऱ्याच वृद्ध लोकांशी बोलत होतो. त्यांच्यासह पॅरिसमध्ये फिरतही होतो’’ हे वाक्य असंच महत्त्वाचं. जिथं मोदियानो राहात, तिथलीच ही मंडळी. बहुतेक सारे फ्रान्समधले ज्यू. यापैकी अनेक जण अल्जीरियाचा (फ्रेंचविरोधी) स्वातंत्र्यलढा चिरडण्यासाठी तिथं जाऊन आले होते. पोलीस वा सैनिक म्हणून येणाऱ्या जबाबदाऱ्या न घेता, अनेक फ्रेंच १९६५ पर्यंत अल्जीरियन ‘गनिमां’ना ठार करू शकत होते. यापैकी मोदियानोंना भेटले ते आता वृद्ध झालेले लोक.. स्वत:चं सिंहावलोकन करू शकणारे. ‘स्मरणरंजन’ हा शब्द मोदियानो पूर्णपणे नाकारतात. ‘स्मृती जागवणं’ हे काम माझ्या कादंबऱ्या करत नाहीत, असंही ठासून सांगतात! त्याऐवजी, ‘मी काय विसरलं जातंय याकडे लक्ष देतो’ हे त्यांचं वाक्य केवळ चमकदार म्हणून सोडून देता येत नाही. पहिल्याच कादंबरीत हिटलर, नाझी सैनिक आणि फ्रेंच ‘लोकशाही’तले हुकूमशहा द गॉल यांना एकत्र आणणारे मोदियानी, ‘‘मी माझ्या पलीकडली गोष्ट शोधू लागलो,’’ असं मुलाखतीत म्हणतात.. अत्याचारांचा आणि अप्रिय घटनाक्रमाचा मानवी मनावर काय परिणाम होतो हेच अनेक कादंबऱ्यांतून शोधत असतात आणि ‘‘मी नेहमी एकच गोष्ट सांगतो आहे,’’ असंही कबूल करतात.
ही ‘एकच गोष्ट’ एका बाजूला, लोक काय विसरू पाहताहेत याचा शोध घेते. दुसरीकडे अप्रिय आठवणींच्या खपल्या काढतेच, पण हे असं घडलं होतं- तेव्हा त्याचा अर्थ यानं इतकाच लावला होता हे दाखवून इतिहासाच्या ‘सरसकटीकरणा’ला साहित्यातून मिळणारं आव्हान कायम ठेवते आणि ही अशी घालमेल कुणाची तरी झाली होती याचं मानवी भान देते. ‘‘मी एकदा लिहून थांबतो. त्याचं पुस्तक होतं. मग लक्षात येतं काही तरी चुकलंच.. ते लिहून झालेलं कसं मागे फिरवणार?  म्हणून मग मी आणखी एकदा लिहितो,’’ असं उत्तर देणारे मोदियानो, ‘‘मी लिहितो, लिहीतच राहातो, शोधत राहातो. हे सारं दाट धुक्यातून गाडी हाकण्यासारखं वाटतं मलाच. दिसत नसेलही काही, पण गाडी पुढे नेलीच पाहिजे’’ किंवा ‘‘कादंबरीचा एक परिच्छेद, एक अंश, एक खंड संपतो. दुसरा सुरू होणार असतो. तेव्हाची स्थिती एक झुला सोडून दुसऱ्याकडे झेपावणाऱ्या सर्कसवीरासारखीच असते.’’ हेही सांगतात.
‘‘पॅरिस शहरात आताशा, आठवणी जाग्या करण्याचं बळच उरलेलं नाही’’ अशा अर्थाचं एक वाक्य मोदियानी यांच्या तोंडून येतं, तेव्हा ते ‘‘सगळीकडे दुकानंच झालीत आता’’ असं वारंवार सांगत राहातात. त्यांना तरुणपणी जिथं भरपूर वृद्ध मंडळी भेटली होती, तिथं ते पुन्हा गेले. तिथं आता एक आलिशान इमारत झाली आहे. पर्यटक इथं राहणं पसंत करतात. हे पाहून मोदियानोंना तुटल्यासारखं वाटतं. जुनं जे काही आहे ते जाणारच, पण माणसं उरतात ना..  ही माणसं जो काळ ‘आता नाही’ किंवा ‘जुना झाला’ अशी खूणगाठ बांधतात, तोच त्यांच्यासोबत असतो. कितीही नाकारला तरी.
म्हणजे माणसं, त्यांना- त्यांना जगायला शिकवणाऱ्या काळापुरतीच मर्यादित असतात का? समजा असली, तर मग ‘एकच गोष्ट पुन:पुन्हा’ सांगणाऱ्या मोदियानोंसारखीच माणसंही जगत असतात का? दर वेळी त्याच पद्धतीनं जगण्यासाठी नव्या कल्पना लढवत राहतात का? हे प्रश्न पाडून मुलाखती संपतात.