अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत समस्यांपेक्षाही तीव्र आणि भयंकर अशी संस्कृतिसंघर्षांची समस्या सध्या सगळीकडे फोफावली आहे आणि या समस्येच्या गर्तेत गटांगळ्या खाणाऱ्या संभ्रमित समाजाचा उद्धार करण्याची जबाबदारी आपलीच आहे, असे समजणाऱ्या संस्कृतिरक्षक आणि समाजसेवक, लोकप्रतिनिधी यांच्या विचारधारा अधिक वेगवान होऊ लागल्या आहेत. अन्नवस्त्रादी समस्या तर गरिबीमुळे देशातील बहुसंख्य समाजाच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात, त्यामुळे या समस्यांना तोंड देत जगणे त्यांच्या सवयीचेही होऊन गेलेले असते, पण अशाच समाजावर सांस्कृतिक आक्रमण होत असल्याची समजूत तीव्र होऊ लागली, की समाजाच्या मानसिकतेवरच थेट घाव बसतो आणि संस्कृतिरक्षणाचे श्लोक या विचारधारांमधून वाहू लागतात.मुंबई महानगरातील कपडय़ांची दुकाने, मॉल आणि पदपथांवरील विक्रेत्यांकडे महिलांच्या वस्त्रांच्या जाहिरातींसाठी दर्शनी भागांवर दिसणारे महिलांचे पुतळे विकृतीला आमंत्रण देतात, असा शोध एका नगरसेविकेला लागला आणि स्त्रीदेहाचे प्रदर्शन घडविणाऱ्या अशा पुतळ्यांवर बंदी आणण्याच्या या नगरसेविकेच्या मागणीला सर्वपक्षीय पाठिंबा देत पालिकेतील यच्चयावत नगरसेवकांनी या स्पर्धेत आपलाही सहभाग नोंदविला.ही मागणी मान्य झालीच, तर यानंतर कोणकोणत्या गोष्टींवर बंदी आणावी लागेल याची मात्र लांबलचक यादी अगोदरच तयार करावी लागेल. देशाचा अनुपम सांस्कृतिक वारसा म्हणून शतकानुशतके जपलेली खजुराहोची अनुपम शिल्पे जगाला भुरळ घालतात. कदाचित ती कायमची झाकून टाकावी लागतील आणि अजिंठा-वेरुळमधील पुरातन चित्रकृतींच्या देहांवर आधुनिक रंगांनी अंगभर वस्त्रप्रावरणांचा साज चढवावा लागेल. अनेक प्राचीन मंदिरांवरील सुंदर शिल्पकृतींचे काय करायचे तेही ठरवावे लागेल. पुतळ्यांमुळे मनावर परिणाम होतो, असा थेट एकमुखी निष्कर्ष या नगरसेवकांनी काढला असेल, तर महापालिका मुख्यालयाच्या परिसरात अनेक राष्ट्रपुरुषांचेही पुतळे आहेत. त्यांच्या कार्याची महती जगाने मान्य केली आहे. हे नगरसेवक तर सातत्याने या पुतळ्यांच्या सहवासातच असतात. या पुतळ्यांच्या सहवासाचा परिणाम पालिकेत दिसला तरी समाजाविषयीच्या उत्तरदायित्वाची भावना अधिक सुजाण होण्यास मदत होईल, पण मुळात मुद्दा मानसिकतेचा नव्हे, तर दृष्टीचा असतो. अन्यथा, दोन-तीन दशकांपूर्वी दूरचित्रवाणी वाहिनीवरून दाखविल्या जाणाऱ्या महाभारत-रामायणासारख्या किंवा आजही दाखविल्या जाणाऱ्या अनेक पौराणिक मालिका पाहण्याआधी टेलिव्हिजनला धूपदीप ओवाळण्याऐवजी, अशा मालिकांमधील देवी-देवतांच्या पेहरावावरील आक्षेपांचेच मोहोळ देशभर उठले असते. त्या मालिकांमधील महिलांकडे पाहताना प्रेक्षकांकडून पेहरावाच्या तक्रारींचा सूर निघाला नाही, कारण या भूमिका वठविणाऱ्या पात्रांकडे पाहण्याची दृष्टी निखळ होती. केवळ सर्वपक्षीय नगरसेवकांनीच नव्हे, तर संस्कृतिरक्षणाचा स्वयंप्रेरित ठेका घेणाऱ्या प्रत्येकानेच दृष्टिबदलाचा चष्मा डोळ्यावर चढवून पाहण्याची वेळ आली आहे.. कदाचित संस्कृतिरक्षणाच्या समजुतीचे संभ्रम दूर होतील!