माहिती अधिकाराच्या कक्षेत काय काय येणार याबाबत आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. यानिमित्ताने आपल्या अंगावर जो काही माहितीचा धबधबा आदळेल त्यापासून स्वत:स कसे वाचवायचे या विवंचनेत भारतातील माहित्योत्सुक जनता असल्याचे आम्हास त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत आहे. तरीही, माहितीच्या महापुराने सर्वसामान्यांचे जीवन सुखकरच होणार असल्याची मौज काही औरच म्हणावी लागेल !
आपल्या महान देशातील समस्त राजकीय पक्ष आता माहिती अधिकाराच्या कक्षेखाली येणार असल्याचे जाहीर झाल्यापासून भारतवासीयांच्या हृदयाची वाढलेली धडधड अद्याप कमी झालेली नाही. या अधिकाराच्या कक्षेत काय काय येणार याबाबत आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. त्याचप्रमाणे माहिती कायद्यातील या क्रांतीमुळे दुष्काळाने, आर्थिक संकटाने पीडित गांजलेल्या आपल्या अंगावर जो काही माहितीचा धबधबा आदळेल त्यापासून स्वत:स कसे वाचवायचे या विवंचनेत भारतातील माहित्योत्सुक जनता असल्याचे आम्हास त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसते. याची अंमलबजावणी कशी आणि कोण करणार याबाबत देशातील सुजाण नागरिक उत्सुक आहेत. लालूप्रसाद यादव, मुलायम सिंग, सोनिया गांधी, लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी, उमा भारती आदी मान्यवरांच्या उद्योगांची माहिती आता अधिकृतपणे मागवता येणार असल्यामुळे माहिती अर्जाच्या प्रतींना प्रचंड मागणी असल्याची आमची माहिती आहे. केंद्रीय माहिती आयोगाने सोमवारी हा निकाल दिल्यापासून देशभर चौकाचौकांत सर्वत्र कोणकोणत्या विषयांची माहिती आपण आता मागू शकू याबाबत उत्सुकांचे फड रंगू लागले आहेत.  
    म्हणजे पक्षबांधवांना मार्गदर्शनाचे बोधामृत पाजून कु. राहुल गांधी मध्येच कोठे गायब होतात याची माहिती आता या अधिकारामुळे आपणास मागवता येणार असल्यामुळे समग्र युवक काँग्रेसमध्ये चैतन्याची लाट आली आहे. परंतु काहींच्या मते हा कायदा फक्त कायदेशीरदृष्टय़ा सज्ञान असलेल्यांनाच लागू असेल आणि तसे असेल तर राहुलबाबांना त्यातून वगळावे लागेल, असे त्यांना वाटते. तसे झाल्यास त्याचा चुलतभाऊ चि. वरुण यासदेखील माहिती कायदा लागू करू नये अशी मागणी भाजयुमोतर्फे  निवडणूक आयोगास केली जाणार आहे. हे गांधीबंधू नक्की काय करतात हे आम्हालाच माहिती नसल्याने त्यांची माहिती संबंधित पक्षांकडे केली जाऊ नये असेही काहींचे मत आहे. महिनाभराच्या उपासानंतरही बेंबीच्या देठापासून घोषणा देण्यास ऊर्जा कशी आणावी याची माहिती आता आद्य माहिती अधिकारकार अण्णा हजारे किंवा अरविंद केजरीवाल यांच्याकडून घेता येईल. त्यामुळे भूकबळींची संख्या कमी होण्यास मदतच होईल. याशिवाय काही प्रश्नदेखील आहेत. म्हणजे सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात द्विकुमार सहकाऱ्यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाबाबत पक्षपातळीवर काय चर्चा झाली ते आता माहिती अधिकारांतर्गत मागता येणार काय? पवनकुमार बन्सल वा अश्वनी कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावरही त्यांना मंत्रिमंडळात ठेवावे असा पंतप्रधान सिंग यांचा का आग्रह होता, त्याची माहिती आता आपणास घेता येणार काय? हे सर्व पंजाबी सुपुत्र आणि ज्येष्ठ पंजाब पुत्तर पंतप्रधान मनमोहन सिंग आदींत कौटुंबिक स्नेहसंबंध आहेत. तेव्हा सौ. अश्वनी कुमार आणि सौ. मनमोहन सिंग यांच्यात चंदिगढ वा अमृतसर येथे भेटल्यावर काय चर्चा होते, त्याची माहिती आपणास या कायद्यामुळे आता मिळवता येईल काय? मनमोहनजी आता पहिल्यासारखे प्राठे खात नाहीत, त्यांना पिझ्झाच आवडू लागला आहे, अशी तक्रार गुरशरण कौर यांनी केली असल्यास ते या अधिकारामुळे कळू शकेल काय? द्रमुकचे एम. करुणानिधी कोणत्या भाषेत बोलतात आणि ते बोलल्यावर कोणाला कसला बोध होतो हेही आपणास आता या अधिकारामुळे जाणून घेता येईल असा अर्थ काढल्यास योग्य मानावयाचे काय? किंवा एम. करुणानिधी आणि सोनिया गांधी परस्परांना भेटल्यावर कोणत्या भाषेत बोलतात याची विचारणा या अधिकारामुळे आपणास करता येईल, असे गृहीत धरणे अयोग्य तर नव्हे? भारतीय राजकारणात इतरांना शरपंजरी पाडणारे भीष्माचार्य लालकृष्णजी अडवाणीजी यांच्यात आणि गुजरातचा सिंह नरेंद्र मोदी यांच्या भेटीत काय गूढ घडते त्याचा तपशील आता मागवता येणार काय? या भाजप भीष्माचार्याने नरेंद्र मोदी यांचा पहिला क्रमांक काढून तो मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या गळ्यात का घातला हेही आपणास आता कळेल अशी आशा करण्यास हरकत नाही. मोदींना ‘राजधर्माचे पालन करा’ असे याच पक्षाचे आता वानप्रस्थी असलेले नेते वाजपेयी यांनी सांगितल्यावर मोदींनी त्यांच्या कानात काय उत्तर दिले याचीही माहिती या अधिकारात मागवता येईल काय? आमच्या मते हा अधिकार बहाल झाल्या झाल्या तिस्ता (अन)सेटलवाड यांनी पहिला अर्ज दाखल करून ही माहिती मागवलीदेखील अशी आमची माहिती आहे. तद्नंतर या माहितीच्या आधारे च्यानेलचर्चा होणार असून त्यात दिग्विजय सिंग नक्की काय भूमिका घेतील याचा अंदाज घेण्यासाठी काँग्रेसजनांनी एक समिती स्थापन केल्याचीही माहिती मिळते. त्या समितीची माहिती आता आपणास अधिकृतपणे या माहिती अधिकाराखाली निश्चितच मागवता येईल याची शाश्वती माहिती आयुक्त देतील काय? सुषमा स्वराज आणि सोनिया गांधी संसदेच्या प्रांगणात एकमेकींना भेटल्यावर परस्परांच्या साडय़ांची चर्चा करतात, त्याचीही माहिती आपणास आता मिळण्यास हरक त नाही. मी पंतप्रधान झाले असते तर तू खरोखरच केशवपन केले असतेस का, हा प्रश्न सोनियाजींनी सुषमाजींना विचारलाच असेल तर त्याचे खरे उत्तर या अधिकारामुळे आपण मिळवू शकणार काय? आणि समजा सुषमाजींनी तसे केशवपन केलेच असते तर आद्य केशवपनकर्त्यां उमाजी भारतीजी यांची प्रतिक्रिया काय आली असती याचे उत्तर आपण मागू शकणार का? लालूप्रसाद यादव यांच्या गोठय़ातील गुरांना लालूंच्या चारा घोटाळ्यामुळे आनंद झाला की असूया वाटली याची माहिती आता या अधिकारान्वये नक्कीच मागवता येईल. त्याचप्रमाणे या घोटाळ्यांची चौकशी कशी होऊ द्यायची नाही त्याची दीक्षा लालूंनी बहेन मायावती यांना दिली किंवा काय? तेही आता कळू शकेल. लालूंनी ती समजा दिली नसेल तर काँग्रेसने कशाच्या बदल्यात ही चौकशी टाळली याचीही माहिती आता निर्भीडपणे आपणास मागवता येईल. लालूंचे आडनावबंधू आणि गुरुबंधू उत्तरप्रदेशीय यादवीकार मुलायमसिंग यांनी आपले एकेकाळचे हनुमान अमरसिंग यांच्याशी नक्की कोणत्या कारणाने कट्टी केली, हे जाणून घेणे आता अधिक सुकर होईल. या दोघांच्या वादात जयाप्रदा यांनी नक्की कोणती सरगम गायिली आणि त्या कोणास डफलीवाले.. म्हणाल्या हे समजून घेणे आता शक्य होणार आहे. राष्ट्रवादीकार शरद पवार हे आपले पुतणे मा. अजितदादा पवार यांच्याशी काय मसलत करतात, ते तर आता सहजपणे कळेल. सर्व काही करून आपली प्रतिमा आरआर आबा पाटील कशी स्वच्छ राखतात, त्याची माहिती आता राष्ट्रवादीस द्यावीच लागेल. अजित पवार यांचे फुरफुरणारे घोडे रोखण्याची गरज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अधिक आहे की पवारकाकांना हे आता माहिती अधिकारांतर्गत शोधून काढता येईल. उद्धव ठाकरे लहानपणी घोडा घोडा खेळताना पडून गंभीर जखमी झाल्यामुळे घोडेमैदानाचा त्यांना राग आहे किंवा काय, हेही आता हुडकून काढता येईल. त्याचप्रमाणे पक्ष म्हणवून घेण्यासाठी स्वत:खेरीज अन्य काहीदेखील लागतात हे माहीत आहे काय याबाबत राज ठाकरे यांचे मत जाणून घेता येईल.
    हे सगळे आपणास या माहिती अधिकारामुळे प्राप्त होणार आहे. जनतेच्या हाती निर्णयांच्या रूपाने काहीही पडले नाही तरी चालेल, पण या माहितीच्या महापुराने आपले जीवन सुखकरच होणार आहे. गरज आहे ती आपण त्यात मौज मानण्यास शिकण्याची.