कलियुग केव्हा सुरू झाले, याबाबत पुराणादी ग्रंथांमध्ये एकवाक्यता नाही. कलियुग महाभयंकर असणार असे श्रद्धावंतांना वाटते. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या कालखंडावर नजर टाकली तरी चांगले कायदे असणे, अनेक क्षेत्रांतील प्रगती, साथीचे रोग नाहीसे होणे, अनेक व्याधींवर औषधे उपलब्ध असणे, सरासरी आयुर्मानात वाढ होणे ही पावले मानवी सुखाच्या दिशेने नाहीत का? मग कुठे आहे ते कलियुग?

हिंदूंच्या स्मृतिपुराणादी ग्रंथांमध्ये कालगणनेसाठी ‘युग’ या कल्पनेचा वापर केलेला दिसून येतो. त्यात कृत, त्रेता, द्वापर आणि कली या क्रमाने चार युगांची चार नावे दिलेली आहेत. युग या शब्दाचा अर्थ ‘अनेक सहस्रावधी वर्षांचा दीर्घ काळ’ असा असून या चार युगांतील काळाचे परस्पर प्रमाण ४:३:२:१ असे आहे. (४+३+२+१=१०). ही चार युगे मिळून एक ‘चतुर्युग’ किंवा ‘देवयुग’ बनते, ज्यात ४३ लाख २० हजार एवढी मानवी वर्षे असतात. म्हणजे एका कलियुगात, चतुर्युगाच्या एक दशांश म्हणजे ४ लाख ३२ हजार वर्षे असतात; द्वापर युगात त्याच्या दुप्पट, त्रेता युगात तिप्पट आणि कृत किंवा सत्य युगात त्याच्या चौपट मानवी वर्षे असतात.
याशिवाय ‘मन्वंतर’ आणि ‘कल्प’ अशा दोन कल्पनाही स्मृती-पुराणांमध्ये आहेत. एक मन्वंतर म्हणजे ७१ चतुर्युगे आणि एक कल्प म्हणजे १४ मन्वंतरे होत. तर एक कल्प म्हणजे (७१x१४=९९४) सुमारे एक हजार चतुर्युगे होतात. यालाच ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणतात आणि तेवढीच त्याची एक रात्र असते. अशा ३६० अहोरात्रींचे त्याचे एक वर्ष व अशा १०० वर्षांचे त्याचे आयुष्य आहे असे साधारणत: मानले जाते आणि त्याने त्याच्या आयुष्याची ५० वर्षे पूर्ण केलेली आहेत, असेही मानले जाते. हा हिशेब असा झाला की, ब्रह्मदेवाच्या आयुष्यभरात एकूण ७ कोटी २० लाख चतुर्युगे (म्हणजे प्रत्येकी तेवढीच कृत, त्रेता, द्वापर व कलियुगे) होणार आहेत आणि त्यांपैकी एकाच म्हणजे सध्या चालू असलेल्या कलियुगाबद्दल हा लेख आहे. वर म्हटल्याप्रमाणे या कलियुगातही ४ लाख ३२ हजार वर्षे आहेत असे व याच्या अगोदरचे द्वापर युग संपून व सध्याचे कलियुग सुरू होऊन सुमारे फक्त पाच हजार वर्षेच झालेली आहेत असे मानले जाते. म्हणजे सध्या चालू असलेले कलियुग संपायला आता (फक्त ?) ४ लाख २७ हजार वर्षे उरलेली आहेत व त्यानंतर पुढचे कृतयुग सुरू होईल.
हल्ली जिकडे-तिकडे अशांतता, दुर्दैव, दुराचार, अत्याचार इत्यादींचे जे थैमान चालू आहे असे वृत्तपत्रीय बातम्यांवरून दिसून येते तो, सध्या कलियुग चालू असण्याचा परिणाम आहे असे मानून हिंदू माणूस स्वत:चे समाधान करून घेतो. पण मग पुढे उरलेल्या ४ लाख २७ हजार वर्षांत अजून काय भयंकर घडायचे आहे, अशी भीती श्रद्धावंतांना वाटते. युग कल्पनेबाबतच्या समजुती अशा की, चतुर्युगातील पहिल्या कृत किंवा सत्ययुगात, जो सर्वात आदर्श काळ समजला जातो त्यात सर्व लोक, रोग व दु:ख यापासून मुक्त असे प्रत्येकी ४०० वर्षे जीवन जगत असत व प्रत्येक व्यक्ती तिचे आयुष्यातील कर्तव्य पूर्णपणे पार पाडीत असे. पुढे प्रत्येक युगात नीती, आरोग्य व आयुष्याचा एक चतुर्थाश ऱ्हास होतो व शेवटी कलियुगात तर अत्यंत निराशाजनक, खेदजनक, पतित व भीतिदायक असेच जीवन असते. कृतयुगात धर्म संपूर्णपणे अस्तित्वात असतो व तो चार पायांवर उभा असतो आणि पुढे प्रत्येक युगात त्याचा एकेक पाय कमी होऊन, कलियुगात धर्माचा एकच पाय शिल्लक राहतो आणि अधर्म तीन चतुर्थाश भाग व्यापतो अशी वर्णने आहेत. पुराणांमधील भविष्यानुसार या कलियुगाच्या अवाढव्य कालावधीनंतर, भगवान विष्णू ‘कल्किन’ रूपाने अवतार धारण करून, धर्माची पुन्हा स्थापना करील आणि मग पुढील कृतयुगाचा प्रारंभ होईल. याबाबतच्या निरनिराळ्या स्मृतिपुराणांतील आख्यायिका एकसारख्या नसून परस्परभिन्न आहेत. असणारच. कारण त्या पुराणकाररचित भन्नाट कल्पना आहेत.
याबाबत ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ या भारतरत्न म. म. काणेकृत म. रा. सा. सं. म. प्रकाशित मराठीतील सारांशरूप ग्रंथाच्या पूर्वार्धातील प्रकरण ९३ मध्ये खालीलप्रमाणे माहिती आढळते. ‘प्राचीन वेदकाळात आणि उपनिषदांसारख्या वेदग्रंथांच्या रचनेच्या काळापर्यंतदेखील कृत, त्रेता, द्वापर व कली हे शब्द, सृष्टीच्या निरनिराळ्या कालखंडांना अनुलक्षून वापरण्यात येत नसत.’ ‘एकूणच ‘युग आणि कल्प’ या कल्पनांचा उद्भव ख्रिस्तपूर्व चौथ्या अथवा तिसऱ्या शतकात झाला असावा आणि त्या कल्पना (फक्त) ख्रिस्ती सनाच्या आरंभीच्या शतकांमध्ये पूर्णपणे प्रस्थापित होईपर्यंत त्यात अनेक फेरबदल होत गेले असले पाहिजेत.’ याचा अर्थ असा होतो की, या युगकल्पना वेदरचित्या ऋषिमुनींनी सांगितलेल्या नसून त्या गोष्टीबहाद्दर स्मृतिपुराणकारांनी रचलेल्या कल्पना आहेत.
सध्याचे कलियुग केव्हा सुरू झाले असे मानावे याबाबतही पुराणादी ग्रंथांमध्ये एकवाक्यता नाही. कुणाच्या मते ज्या वेळी भारतीय युद्ध सुरू झाले, त्या वेळी कलियुगाचा प्रारंभ झाला तर कुणाच्या मते श्रीकृष्णाने आपला अवतार संपवून स्वर्गलोकी गमन केले त्या वेळी कलियुग सुरू झाले. ते राहो.
महाभारत काळात (व बहुधा त्याहीपूर्वी) द्यूत (म्हणजे एक प्रकारचा जुगार) फासे टाकून खेळला जात असे. त्या फाशांमध्ये कृत, त्रेता, द्वापर व कली अशी चार प्रकारची दाने असत. कृत हे दान सर्वात अधिक लाभदायक व कली हे सर्वात जास्त हानिकारक दान होते. शक्यता अशी आहे की, पुढील काळात स्थापित झालेल्या चार युगांच्या कल्पनेच्या मुळाशी या द्युतांतील फाशांची ही लाभ-हानीकारक दाने असावीत आणि तसे असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही.
परंतु आधी लाभदायक, सुखदायी ‘कृतयुग’ आणि नंतर शेवटी अत्यंत दु:खदायी ‘कलियुग’ येते असा क्रम मानल्यामुळे, मानवाची काळानुसार ‘प्रगती’ न होता ‘अधोगती’ होते अशी समजूत जनमनात दृढ होते. याबाबतचे सुधारकाग्रणी गो. ग. आगरकर यांचे मत आपण अगोदरच्या एका लेखात पाहिलेच आहे. ते असे की, ‘मनुष्य केव्हा तरी परिपूर्ण अशा सत्ययुगात सुखी होता आणि आता तो दुर्दैवी कलियुगात दु:खी आहे’ हा हिंदू धर्मातील विश्वास त्यांना अमान्य होता आणि याउलट माणसाचा प्रवास हा रानटी-निमरानटी अवस्थेतून हळूहळू सुधारणांकडे होत आहे हा पश्चिमी प्रबोधनांतील विश्वास त्यांना मान्य होता. ते राहो. पण याबाबतीत आपल्याला स्वत:लाच काय निरीक्षणे करता येतात ते पाहू या.
काही हिंदू लोक ‘आमच्याकडे प्राचीन काळी विमाने होती, सुबत्ता, व्यवस्था होती; पर्जन्यास्त्र, नारायणास्त्र, ब्रह्मास्त्र अशी अस्त्रे होती,’ असे दावे करतात. ते सर्व दावे काल्पनिक आहेत असे नक्कीच दाखवून देता येते. तेव्हा असे दावे तुलनेला घेण्याऐवजी आपण वास्तव जीवनातील काही दंडक (मोजमापे) घेऊ या. पहिले उदाहरण स्त्री-पुरुष वैवाहिक जीवन व त्यातील नीतिनियम हे घेऊ या. कुणी काही म्हटले तरी एक स्त्री, एक पुरुष व त्यांची मुले असे कुटुंब व आजची कौटुंबिक नीतिमत्ता ही कलियुगात निर्माण झालेली सुस्थिती आहे. महाभारतकाळी अशी कुटुंबपद्धती असल्याचे दिसत नाही. प्रत्येक पुरुषाला एकाहून जास्त बायका व प्रत्येक स्त्रीला एकाहून जास्त नवरे, तसेच प्रासंगिक नवरा-बायको, ‘नियोग’ पद्धतीला समाजमान्यता आणि मंत्राने पुत्रप्राप्ती असे प्रकार महाभारतात सर्रास आहेत हे सर्वश्रुत आहे. दुसरे उदाहरण ‘कोणत्याही बलवंताने कुणाही निर्बलाला दडपावे’ असा नियम जो कलियुगापूर्वीच्या काळातील सामान्य नियम होता तो कलियुगात अन्याय्य व अनैतिक ठरविला गेला आहे. धर्माच्या, बळाच्या किंवा कशाच्याही नावाने सबळांनी दुर्बळांना छळणे हा कलियुगातील लोकशाही राज्यघटनांनी केलेल्या लिखित कायदे अनुसरणाऱ्या शासनात दंडनीय गुन्हा आहे. तसेच भौतिक शास्त्रांची प्रगती व त्यामुळे मिळणारी भौतिक सुखे त्याचप्रमाणे नीतिमत्ता, मानवता अशा प्रत्येक क्षेत्रात मानवाने कलियुगात प्रगती केलेली आहे. गुलामगिरीला नकार, छोटय़ा राष्ट्रांना छळांना नकार, स्त्रियांचे हक्क, मुलांचे हक्क अशा अनेक बाबतीत जागृती हीही कलियुगातच झालेली आहे. सवरेदय, अंत्योदय, वंचितांविषयी कणव अशा आधुनिक कल्पना माणसामाणसांमध्ये भ्रातृभाव निर्माण करीत आहेत. निदान तसा प्रयत्न करीत आहेत. मग कलियुगातील ही वाटचाल काय अधर्माच्या दिशेला आहे काय? भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सहा-सात दशकांवर नजर टाकली तरी, साथीचे रोग नाहीसे होणे, अनेक व्याधींवर औषधे उपलब्ध असणे, सरासरी आयुर्मानात वाढ होणे ही पावले मानवी सुखाच्या दिशेने नाहीत का? मग कुठे आहे ते कलियुग?
युगकल्पना खरी आहे असे मानणाऱ्या लोकांना वाटते की फार पूर्वी कृत म्हणजे सत्य युगात माणूस फार सुखी, धार्मिक, दीर्घायुषी वगैरे होता. तेव्हा राजे होते, प्रजा होत्या, शेती, व्यापारउदीम, कायदे होते वगैरे. पण वर दिलेली कालगणना लक्षात घेता, कृतयुगाचा काळ हा निदान २० लाख वर्षांपूर्वीचा काळ होता असे ठरते. तर विज्ञान आपल्याला सांगते की, मानवजात या पृथ्वीवर फक्त १०-१२ लाख वर्षांपूर्वी उत्क्रांत झालेली आहे. म्हणजे २० लाख वर्षांपूर्वीच्या त्या काळात माणूस अर्धमर्कट (ऑस्ट्रेलोपिथेकस) अवस्थेत नागडय़ाने झाडावर माकडासारखा लपून रानटी पशूंपासून स्वत:चे कसेबसे संरक्षण करीत होता. मग असा तो माणूस (?) काय सत्ययुगात होता काय? सारांश, युगकल्पना ही पुराणकारांची थाप आहे व आपण ती विसरून जाणेच आपल्या हिताचे आहे.

indian model of secularism
संविधानभान : धर्मनिरपेक्षता : समज व गैरसमज
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…