26 January 2021

News Flash

पानिपतची लाभहानी

पानिपतच्या पराभवाचा मोठा बाऊ करणे चुकीचे आहे. ज्यांच्या हातून पराभव झाला तो सेनानी कुशल आणि सैन्य पराक्रमी होते. हे विसरता कामा नये, की ब्रिटिशांनी

| May 23, 2014 01:07 am

पानिपतच्या पराभवाचा मोठा बाऊ करणे चुकीचे आहे.  ज्यांच्या हातून पराभव झाला तो सेनानी कुशल आणि सैन्य पराक्रमी होते. हे विसरता कामा नये, की ब्रिटिशांनी हिंदुस्थान जिंकून घेतल्यानंतर अफगाणांशी केलेल्या तीन युद्धांमध्ये त्यांना निर्णायक विजय मिळवता आला नाही. अलीकडच्या काळात रशियन सैन्यालाही अखेर अफगाणिस्तानातून माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर अजूनही अमेरिकेने अफगाणांचा पूर्ण बंदोबस्त केला आहे असा दावा व्हाइट हाऊस करू शकत नाही..
खैबरखिंडीतून भारतावर आक्रमण करून आलेल्या आक्रमकाशी संघर्ष करून, त्याला या संघर्षांत हरवून, त्याचा पाठलाग करीत त्याच्या मायदेशी पिटाळून लावले आहे, असे मराठय़ांनी अब्दालीच्या फौजांना अटकेपार हाकलून देईपर्यंत कधी घडले नव्हते. मराठय़ांच्या काही तुकडय़ा सिंधुपार होऊन पेशावपर्यंत पोहोचल्याचा पुरावा कागदोपत्री आढळतो.
पण मराठय़ांचे मनसुबे एवढय़ापुरतेच मर्यादित नव्हते. त्यांच्या डोळ्यांसमोरील हिंदुस्थानात काबूल, कंदाहारचे सुभे होते आणि त्याचा स्पषट उल्लेख त्यांनी केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अखंड हिंदुस्थानची व्याप्ती सिंधू नदीपर्यंत होती आणि मराठे काबूल, कंदाहारवरील हक्क सोडायला तयार नव्हते एवढे सांगितले म्हणजे पुरे!
इकडे १७५८ साली मराठे अफगाण्यांना धूळ चारून हाकलून देत असताना तिकडे बंगालमध्ये प्लासीपाठोपाठ बक्सर घडले आणि त्यामुळे बंगालमधील इंग्रजांची सत्ता अधिकच बळकट झाली. अर्थात इंग्रजांनाही भीती फक्त मराठय़ांचीच होती. कलकत्ता या त्यांच्या मुख्य ठाण्याचे म्हणजेच राजधानीचे मराठय़ांपासून रक्षण व्हावे म्हणून त्यांनी मराठे जिकडून येण्याची शक्यता असे तेथे एक भलामोठा खंदक खणून ठेवला होता. तो खंदक ‘मराठा डिच’ या नावाने ओळखला जाई.
मराठय़ांकडून मार खाल्ल्याचे शल्य अब्दालीच्या जिव्हारी खुपत होते. तो १७६१ मध्ये पुन्हा एकदा सर्वशक्तिनिशी हिंदुस्थानवर चालून आला. दरम्यान, मराठय़ांचे दिल्ली दरबारातील वर्चस्व सहन न होणाऱ्या हिंदू-मुसलमानांचा एक मोठा गट उत्तरेत तयार झाला होता. रजपुतादी हिंदू सत्ताधाऱ्यांना मराठे उपरे वाटत होते. कानामागून येऊन तिखट होऊन व आपल्या राखीव कुरणात वाटेकरी झालेले मराठे त्यांना आवडत नव्हते. कट्टर मुसलमान मराठय़ांकडे काफिर म्हणून पाहात होते. त्यांनी दिल्लीच्या इस्लामी तख्तावर वर्चस्व गाजवणे त्यांना आवडणारे नव्हते. शाह वली उल्लाह या त्यांच्या धार्मिक नेत्याने मराठय़ांना हटवण्यासाठी उत्तरेतील मुसलमान सत्ताधीशांना एकजूट करण्याचे आवाहन धर्माच्या नावाखाली केले. अर्थात, तेवढय़ाने काम होणार नव्हते याची खात्री असल्याने त्याने अब्दालीच्या धर्मभावनेला साद घालून मराठय़ांच्या जोखडातून मुक्त करण्याची प्रार्थना केली. अब्दालीलाही हे हवे होतेच, पण तरीही मराठय़ांशी भिडायला तो नाखूशच होता. पानिपतच्या सुप्रसिद्ध लढाईला तोंड फुटण्यापूर्वी त्याने मराठय़ांशी तह करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मराठय़ांनी पंजाब प्रांतापर्यंत अब्दालीचा अंमल मान्य करायचा एवढीच त्याची अट होती. पण जिथे मराठय़ांचीच काबूल, कंदाहापर्यंत नजर होती तिथे ते ही अट मान्य करणे शक्य नव्हते. पानिपतचे युद्ध अटळ होते ते असे. या युद्धामागची मराठय़ांची भूमिका नीट समजून घेतली जात नाही. उत्तरेकडे कूच करताना सेनापती सदाशिवरावभाऊ याने उत्तरेतील हिंदू-मुसलमान सत्ताधीशांना जी पत्रे धाडली होती त्यातून ही भूमिका व्यक्त झाली आहे. भाऊंच्या आवाहनानुसार अब्दाली हा परकीय शत्रू. त्याचा मुकाबला येथील सर्व हिंदू-मुसलमानांनी एकत्र येऊन करायला हवा. आपल्यातील वाद, संघर्ष हा आपला आपापसातील अंतर्गत मामला आहे. अर्थात, भाऊंच्या आवाहनाला कोणी प्रतिसाद देणार नव्हते. एवढी व्यापक दृष्टी तेव्हा फक्त  मराठय़ांकडेच होती.
मराठय़ांच्या भूमिकेची वैशिष्टय़े
१) काबूल, कंदाहारसह हिंदुस्थान हा एक देश आहे.
२) परकीय शक्तीपासून या देशाचे संरक्षण करण्यासाठी त्यातील सर्व सत्ताधाऱ्यांनी एक व्हायला हवे.
३) देशातील मुख्य मध्यवर्ती सत्ता कोणत्या धर्माची आहे याला महत्त्व नाही. तिने सर्व प्रजाजनांना सारखे वागवणे पुरेसे आहे.
या भूमिकेच्या तिसऱ्या मुद्दय़ाला अनुसरूनच मराठे व बादशाह यांच्यातील करारात मराठय़ांनी हिंदूंच्या व मुसलमानांच्या धर्माचे रक्षण करावे अशा आशयाच्या कलमाचा समावेश आहे. इतिहास असे सांगतो, की मराठय़ांनी ते इमानेइतबारे केले.
थोडक्यात सांगायचे म्हणजे अखंड हिंदुस्थान आणि सर्वधर्मसहभाव या कल्पनांचा पुरस्कार करणारा मराठय़ांचा एकमेव समाज होय. हा पाठपुरावा करताना त्यांनी आपले प्राणही पणाला लावायला मागेपुढे पाहिले नाही. पानिपत उद्भवले ते याच भूमिकेतून.
पानिपतच्या युद्धात मराठय़ांचा पराभव झाला. त्याची कारणमीमांसा करण्याचे हे स्थळ नव्हे. पराभव हा शेवटी पराभवच असतो व म्हणून तो वाईटच असतो, पण पानिपतच्या पराभवाचा मोठा बाऊ करण्यात येतो तो मात्र चुकीचा होय. पहिली गोष्ट अशी की युद्धात मराठय़ांच्या चुका झाल्या हे मान्य करूनही शत्रूच्या विजयात निर्णायक वाटा त्याच्या दैवाचा होता हे लक्षात घ्यायला हवे.
दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या हातून पराभव झाला तो सेनानी कुशल आणि सैन्य पराक्रमी व कडवे होते. हे विसरता कामा नये, की ब्रिटिशांनी हिंदुस्थान जिंकून घेतल्यानंतर अफगाणांशी केलेल्या तीन युद्धांमध्ये त्यांना निर्णायक विजय मिळवता आला नाही. अलीकडच्या काळात रशियन सैन्यालाही अखेर अफगाणिस्तानातून माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर अजूनही अमेरिकेने अफगाणांचा पूर्ण बंदोबस्त केला आहे असा दावा व्हाइट हाऊस करू शकत नाही. अशा जबरदस्त शत्रूकडून मराठय़ांना पराभव पत्करावा लागला हे काही अक्रीत घडले असे नव्हे. मराठय़ांनी त्याच्याशी कडवी झुंज देऊन त्याच्या मनात दहशत निर्माण केली हीच गोष्ट मराठय़ांना भूषणावह आहे.
तिसरा मुद्दा म्हणजे एकदा काढता पाय घ्यायला लागल्याने व दुसऱ्यांदा निसटता विजय मिळाल्याने अब्दालीची वा त्याच्या वारसदारांची हिंदुस्थानावर परत आक्रमण करण्याची हिंमत झाली नाही. वायव्येकडून होणारी आक्रमणे मराठय़ांच्या हस्तक्षेपामुळे कायमची थांबली. सांगायला हरकत नाही की मराठय़ांचा कायमचा बंदोबस्त करायला अफगाणांनी हिंदुस्थानवर पुन्हा चालून यावे अशी निमंत्रणपत्रे त्यानंतरही काबूलला अनेक वेळा गेली. ती लिहिणाऱ्यांमध्ये हिंदू रजपूत संस्थानिकही होते.
मराठय़ांच्या हस्तक्षेपाच्या अभावी उत्तरेकडील सत्ता अफगाणांच्या हाती गेली असती तर त्याचे काय परिणाम झाले आहे याची कल्पना करावी. कडवे आणि कट्टर धर्मवादी अफगाणांमुळे संपूर्ण हिंदुस्थान यथावकाश दहशतवादी कारवायांचे एक महाकेंद्र ठरले असते! आणि अखेरचा पण महत्त्वाचा मुद्दा. मराठय़ांचा करारी बाणा आणि पराक्रम यांची जाणीव असलेल्या अब्दालीला मराठय़ांशी परत मुकाबला करायचा नव्हता. पानिपतच्या पराभवामुळे मराठे आता संपले, कायमचे महाराष्ट्रात गेले म्हणून खूश झालेल्या उत्तरवासीयांना धक्का दिला तो अब्दालीनेच. आम्ही पंजाब आमच्या ताब्यात ठेवून मायदेशी जात आहोत. हिंदुस्थानचा कारभार तुम्हीच पूर्ववत चालवावा असा निरोप अब्दालीने मराठय़ांना पाठवला. त्यानुसार पेशव्यांचे हिंगणे वकील लाहोर मुक्कामी अब्दालीला भेटले. अब्दालीचा वकीलसुद्धा पुणे दरबारात दाखल होऊन त्याने थोरल्या माधवराव पेशव्यांबरोबर वाटाघाटी केल्या. योग्य ते करारमदार झाले. अब्दालीने माधवरावाला मानाचा पोशाख पाठवला. माधवरावांनीही अब्दालीला वस्त्रे व हत्ती पाठवून त्याचा सन्मान केला. पानिपत हा एक दुर्दैवी अपघात समजावा. तुमचे आमचे वैर नाही अशी परस्पर समजूतही झाली.
या संदर्भात इव्हान्स बेल यांचे मत उद्धृत करणे उचित ठरेल. ‘पानिपतची लढाईसुद्धा मराठय़ांना अभिमानास्पद व कीर्तिस्पद अशीच घटना समजली पाहिजे. मराठे ‘हिंदुस्थान सर्व हिंदी लोकांसाठीच’ या ध्येयासाठी लढले.’
प्राचार्य रॉलिन्सन म्हणतात, ‘विशिष्ट परिस्थितीचा विचार करता इतिहासातील एखादा पराजय विजयाइतकाच सन्मानदायक म्हणावा लागतो आणि मराठय़ांच्या सर्व इतिहासात त्यांच्या फौजेने राष्ट्रातील सर्व उत्तम शिलेदारांसह पानिपतच्या घनघोर रणक्षेत्रात आपल्या देशाच्या व धर्माच्या वैऱ्यांशी लढताना जे मरण पत्करले त्याहून जास्त यशदायक मरण इतिहासात क्वचितच नोंदले गेले असेल.’
इतिहासाची पुरेशी समज नसणाऱ्यांनी पानिपतच्या नावाने खूप धुरळा उडवून मराठय़ांची प्रतिमा मलिन तर केलीच, पण एक अनाठायी न्यूनगंडही पोसला. त्यातून लवकरात लवकर मुक्त होण्याची गरज आहे.
*लेखक पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.
*उद्याच्या अंकात मुकुंद संगोराम यांचे ‘स्वरायन’ हे सदर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2014 1:07 am

Web Title: gain and loss from battle of panipat
Next Stories
1 निघाली संधिसाधू यात्रा!
2 आनंदी गुजरात
3 बेस्टचे दुखणे..
Just Now!
X