ज्या कन्सोलच्या मदतीने गेमिंग व्यवसाय आज अब्जावधींची उलाढाल करत आहे, ते आज बनविणाऱ्या अनेकांनाही पहिला कन्सोल कोणी बनवला याची कल्पना नसावी. वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाल्यावर रॉल्फ बेअर हे नाव समोर आले आणि यांनीच गेमिंग कन्सोलची निर्मिती केल्याचे नवपिढीला समजले. माहितीची मर्यादित  साधने उपलब्ध असताना, अनेक तांत्रिक मागासलेपणावर मात करत त्यांनी पहिला गेमिंग कन्सोल बनविला.
 रॉल्फ यांचा जन्म ८ मार्च १९२२ रोजी जर्मनीत एका यहुदी कुटुंबात झाला. अकराव्या वर्षी रॉल्फ यांना शाळेतून काढून टाकण्यात आले, तेव्हा त्यांनी     यहुदी शाळेत प्रवेश घेतला. हिटलरी जर्मनीतून १९३८ मध्ये त्यांचे कुटुंब अमेरिकेत स्थलांतरित झाले. न्यूयॉर्कच्या फॅक्टरीत आठवडय़ाला बारा डॉलरची नोकरी करत असताना बसवर ‘इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील संधी’ अशी जाहिरात दिसली! १९४० मध्ये राष्ट्रीय रेडिओ संस्थेतून रेडिओ सेवा पदवीधर झाल्यावर, १९४३ मध्ये त्यांनी अमेरिकन सैन्य दलात, गुप्तवार्ता खात्यात नोकरी स्वीकारली. १९४६ मध्ये नोकरी सोडून, १९४९ मध्ये त्यांनी टेलिव्हिजन अभियंता म्हणून पदवी मिळवली व ते व्ॉप्लर या कंपनीत मुख्य अभियंता म्हणून रुजू झाले. यानंतर  दोन वर्षांच्या आत त्यांनी एका स्थानिक कंपनीत नोकरी धरली. तेथे त्यांनी आयबीएम कंपनीसाठी ‘पॉवरलाइन कॅरिअर सिग्नलिंग इक्विपमेंट’ विकसित केले. यानंतर पुन्हा त्यांनी नोकरी सोडली व ट्रांझिस्ट्रोन या कंपनीत ते दाखल झाले. पुढे या कंपनीचे ते उपाध्यक्षही झाले. पुढे संरक्षणसाहित्य कंपनीत नोकरी करताना त्यांना या गेमिंग कन्सोलची कल्पना सुचली. कंपनीने त्यांना या विकासासाठी २५०० डॉलर आणि दोन कर्मचारी देऊ केले. १९६६ मध्ये सुरू झालेल्या कामातून तीन वर्षांनी ‘ब्राऊन बॉक्स’ हा जगातील पहिला गेमिंग कन्सोल विकसित झाला. मेहनतपूर्वक पेटंट मिळवले, पण हा कन्सोल कंपन्या घेईचनात. अखेर १९७१ मध्ये मॅग्नोवॉक्स या कंपनीने हा गेम खरेदी केला व त्याचे ‘मॅग्नोवॉक्स ओडिसी’ असे नामांतर करून १९७२ मध्ये बाजारात आणला. यामध्ये टेबल टेनिससारखे बारा खेळ देण्यात आले होते. बाजारात आणल्यानंतर तब्बल तीन लाख कन्सोल्स विकले गेले.
यानंतर यामध्ये खूप बदल होत गेले. अनेक कंपन्यांनी बाह्यरूपात बदल करून नवीन कन्सोल्स बाजारात आणले. त्यांच्या या कामासाठी त्यांना विविध मानसन्मान मिळाले. पण यातील २००६ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या हस्ते देण्यात आलेल्या ‘नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी’ या सर्वोच्च गौरवाबद्दल ते आनंदी होते.