राहुलोदयाच्या घोषणेने समस्त काँग्रेसजन निर्धास्त झाले असतील. एकदा का गांधी घराण्याच्या कोणावर तरी भार सोपवला की त्याची कार्यसिद्धी करण्यास काँग्रेसजनांचा श्री समर्थ असतोच. काँग्रेसजनांना काहीही करावे लागत नाही..  चिंता आणि चिंतनही!
राजस्थानातील हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत काँग्रेसजनांना ऊब वाटेल अशी घटना अखेर एकदाची घडली. राहुल राजीव गांधी यांच्याकडे पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी अधिकृतपणे देण्यात आली. त्यामुळे आपला आता उद्धार होणार याची खात्री वाटून चिंतन शिबिरास जमलेल्या समस्त काँग्रेसजनांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जयपूर येथे चिंतन शिबिरासाठी जमलेल्या काँग्रेसजनांची उत्तम सरबराई करण्यात येत आहे. पक्षासमोरील वाढत्या चिंताजनक आव्हानांस तोंड कसे द्यावे यावर या शिबिरात चिंतन होत असून सकाळच्या न्याहारीपासूनच त्याची सुरुवात होते. यात केवळ न्याहारीसाठी ८० पदार्थ आहेत तर भोजनात शंभराहून अधिक. वातावरणात चांगलीच थंडी आणि अशी व्यवस्था. त्यामुळे बऱ्याच काँग्रेसजनांना अपचनाने ग्रासले असून त्यामुळे या सामूहिक चिंतनात सहभागी न होता आपापल्या हॉटेलांतील बिछान्यात पडूनच अनेकांनी चिंतन करणे पसंत केले. हे सगळे सुस्तावलेले काँग्रेसजन एका घटनेने मात्र उत्साहित होत फटाक्यांच्या आतषबाजीत रंगून गेले. ही घटना होती अर्थातच राहुल गांधी यांच्या नियुक्तीची. गेली आठ वर्षे राहुल गांधी करावे की न करावे या गोंधळात होते. त्यांच्यावर पक्षाची महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार, अशा प्रकारच्या बातम्या वारंवार यायच्या. त्या बातम्या नाकारण्याचा कंटाळा म्हणून तरी राहुल गांधी काही जबाबदारी घेण्यास हो म्हणतील अशी आशा  काँग्रेसजनांना होती. त्यांनी ती जबाबदारी घ्यावी म्हणून अनेक काँग्रेसजन आपापले निधर्मी देव पाण्यात घालून बसले होते. त्या सगळ्यांच्या सेक्युलर प्रार्थना अखेर जयपुरात फळल्या. राहुलबाबा अखेर पक्षाचे उपाध्यक्षपद घेण्यास हो म्हणाले. राहुल गांधी यांनी आमचे नेतृत्व करण्याची वेळ आता आली आहे, अशा आशयाचा ठराव संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी मांडला आणि पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी त्यास अनुमोदन दिले. मॅडम आम्ही तुमचे कायमच ऐकतो.. पण आमचे तुम्ही एकदा तरी ऐका आणि राहुलला उपाध्यक्षपद घेऊ द्या अशी गळ या द्विवेदी यांनी सोनिया गांधी यांना घातली आणि मी तुमच्याशी सहमत आहे असे एक वाक्य समोर लिहिलेले नसतानाही उच्चारून सोनिया गांधी यांनी राहुलोदयावर शिक्कामोर्तब केले. समस्त काँग्रेसजनांचा जीव भांडय़ात पडला. आता काँग्रेसजनांना चिंता आणि चिंतन दोन्हीही करण्याची गरज नाही.
आपण गेली आठ वर्षे संघटनेसाठी काम करीत असून हा पक्ष फार महान आहे, असे उद्गार राहुलबाबांनी आपल्या निवडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना काढले. राहुल गांधी जे म्हणत आहेत त्यात तीळमात्र शंका नाही. या आठ वर्षांत राहुल गांधी यांनी ज्या ज्या मोहिमा हाती घेतल्या त्यात त्यांना सपाटून मार खावा लागला. बिहार असो की उत्तर प्रदेश. राहुल गांधी जेथे जेथे प्रयत्न करायला गेले त्या सर्व ठिकाणी काँग्रेसचे संख्याबळ होते त्या पेक्षा कमी झाले. उत्तर प्रदेशात काँग्रेस खालावली, गुजरातेत नेस्तनाबूत झाली आणि बिहारात तर तिची दखल घेण्यासाठी सूक्ष्मदर्शिकेचीच मदत घ्यावी लागेल, अशी परिस्थिती आहे. इतक्या पराभवानंतर अन्य कोणा पक्षात नेतृत्वाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. अपवाद अर्थातच फक्त काँग्रेसचा. इतका दणकून मार खाल्ल्यानंतरही नेत्यावर विश्वास ठेवणारा पक्ष फक्त काँग्रेसच असू शकतो. त्यामुळे त्या अर्थाने काँग्रेस महान आहे यात काहीही शंका नाही. आता त्याच महान परंपरेस धरून पुढील निवडणुकांचे सारथ्य राहुल गांधी यांच्याकडे दिले जाणार की नाही यावरून या पक्षात खासगीत चर्चा होईल. खासगीत अशासाठी की आगामी निवडणुकीत काँग्रेसला विजयाची संधी असेल तर राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व येईल. तसे होण्याची शक्यता नसेल तर राहुल गांधी यांची पुंगी काँग्रेसजन वाजवणारच नाहीत. ती मोडून खाण्याची संधी विरोधकांना मिळू नये, हा त्यामागचा विचार. आपण आता पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी जोमाने प्रयत्न करणार असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले. युवक काँग्रेसची धुरा हाती घेतल्यावरही त्यांनी असाच पक्षास नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. पक्षाचे लोकशाहीकरण करण्याची गरज त्या वेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती आणि त्यानंतर पक्षात मोठय़ा प्रमाणावर नव्याने नियुक्त्या केल्या होत्या. त्या वेळी राहुल गांधी यांनी देशभर प्रवास केला आणि तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले होते. या तरुणांना नक्की संधी मिळेल असे त्यांचे आश्वासन होते. तेव्हा या आश्वासनांचे प्रतिबिंब त्यांनी ज्या काही नियुक्त्या केल्या, त्यात दिसणे अपेक्षित होते. परंतु त्याही वेळी राहुल गांधी यांनी नवनेतृत्वाची संधी ज्यांना ज्यांना दिली ती सर्व मंडळी काँग्रेसमधील प्रस्थापित नेत्यांची पोरेबाळेच निघाली. आता या चाळिशी पार केलेल्या पोराबाळांना घेऊन पक्षात नवी उभारी भरण्याचा त्यांचा संकल्प असावा. त्यामुळे काँग्रेसजन अर्थातच खुशीत असतील. एकदा का गांधी घराण्याच्या कोणी कोणताही संकल्प केला की तो तडीस नेण्यास काँग्रेसजनांचा श्री समर्थ असतोच. काँग्रेसजनांना काहीही करावे लागत नाही. त्यामुळेही राहुल गांधी यांच्या पदोन्नतीने या मंडळींना हायसे वाटले असणार.
याच शिबिरात बोलताना राहुलच्या मातोश्री सोनिया गांधी यांनी पक्ष मध्यमवर्गापासून दूर जात असल्याबद्दल खेद व्यक्त केला. सोनिया गांधी यांनी भ्रष्टाचाराच्या वाढत्या प्रकरणांवरही तीव्र चिंता व्यक्त केली. वास्तविक तो कमी करण्याची संधी आणि अधिकार सोनिया गांधी यांच्याच हाती आहे. ते त्यांनी वापरावेत. त्याची सुरुवात त्यांनी आगामी निवडणुकीपासून करावी. या निवडणुकीत आपल्या पक्षाला कोणत्या उद्योगपतीने किती देणग्या दिल्या, कोणा नेत्याने कोणत्या राज्यातून किती पैसे कसे उभे केले, हे पैसे उभे करण्याच्या क्षमतेवर कोणास किती अधिक काळ सत्तेवर राहण्याची संधी दिली गेली आदी तपशील त्यांनी काँग्रेसच्या वतीने जाहीर करून भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थानिर्मितीस सुरुवात करावी. या लढय़ात महत्त्वाची भूमिका बजावणारे पंतप्रधान मनमोहन सिंग हे त्यांच्यासमवेत नाहीतरी आहेतच. स्वत: पांढरे शुभ्र राहून आपल्या सहकाऱ्यांना हव्या त्या क्षेत्रात हात आणि तोंड काळे करू देण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे. तेव्हा या दोघांनी मिळून स्वच्छता मोहीम हाती घ्यावी. जनता त्यांना नक्की साथ देईल. इंटरनेट आदी माध्यमांतून काँग्रेसची सतत बदनामीच सुरू असते याबद्दल नापसंती व्यक्त करीत सोनिया गांधी यांनी आपल्या पक्ष सहकाऱ्यांना या माध्यमांशी मैत्री करण्याचा सल्ला दिला. हे चांगले झाले. त्यामुळे यापुढे ट्विटर वापरल्याबद्दल शशी थरूर यांना मंत्रिपद गमवावे लागणार नाही. या बैठकीत सोनिया गांधी यांनी भारताच्या बदलत्या प्रेरणांबद्दल बराच ऊहापोह केला. हा देश आता कसा तरुणांचा होत आहे आणि त्याची भाषा कशी बदलत आहे याचे सविस्तर विवेचन सोनिया गांधी यांच्या उद्घाटनाच्या भाषणात होते. अचानक या बदलांची जाणीव काँग्रेसाध्यक्षांना झाली या बद्दल अनेकांना आश्चर्य वाटले असेल. गेल्याच महिन्यात दिल्लीत जे काही घडले त्यानंतर आठवडाभर तरी प्रक्षुब्ध जनतेच्या भावनांची दखल घेण्याची गरज त्या वेळी काँग्रेसजनांना वाटली नाही. इंडिया गेट वा अन्य ठिकाणी निदर्शने करणाऱ्यांना सामोरे जावे असे एकाही काँग्रेसनेत्यास वाटले नाही. त्या वेळी राहुल गांधी काय करीत होते याचा जाब विचारावा असे सोनिया गांधी यांना वाटले नाही.
परंतु हे सगळे शहाणपण आताच सुचले याचे कारण सोनिया गांधी यांना राहुल गांधी यांच्या पदोन्नतीसाठी वातावरणनिर्मिती करायची होती. त्याप्रमाणे नेपथ्य आणि प्रकाशयोजना झाल्यावर राहुल गांधी यांचे रंगमंचावर नायकाच्या भूमिकेत आगमन झाले आहे. तरीही हा प्रयोग फसला तर काँग्रेसजन मनातल्या मनात तरी मान्य करतील, गांधी आडवा येतो.