12 July 2020

News Flash

गांधीमुक्त काँग्रेस?

लोकसभेत काँग्रेसचा दारुण पराभव होऊनदेखील नेत्या-कार्यकर्त्यांच्या मनात काँग्रेस अजून जिवंत आहे. गांधीमुक्त काँग्रेसचा नारा आज तरी पक्षातून कोणी देताना दिसत नसले तरी ही अपरिहार्यता यापुढेही

| July 21, 2014 01:07 am

लोकसभेत काँग्रेसचा दारुण पराभव होऊनदेखील नेत्या-कार्यकर्त्यांच्या मनात काँग्रेस अजून जिवंत आहे. गांधीमुक्त काँग्रेसचा नारा आज तरी पक्षातून कोणी देताना दिसत नसले तरी ही अपरिहार्यता यापुढेही कायम राहील याची खात्री नाही. पक्षाचे नवे नेतृत्व जबाबदारी पेलण्यास समर्थ तर सोडाच आश्वासकदेखील नसल्याच्या भयाण वास्तवाने काँग्रेस केडर अस्वस्थ झाले आहे. या स्थितीत ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारख्या नवनेतृत्वाकडून मोठय़ा अपेक्षा बाळगाव्यात असे आशेचे किरण दिसू लागत आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध रस्त्या-रस्त्यावर उतरणाऱ्या काँग्रेसवर विरोधी पक्षनेतेपदासाठी सत्ताधाऱ्यांसमोर लोटांगण घालण्याची पाळी येण्यात पक्षाच्या नेतृत्वाचे मोठे अपयश आहे. ज्या संघ परिवाराला महात्मा गांधींचे मारेकरी म्हणून हिणवले गेले, बंदी घातली गेली, त्याच संघाच्या मुशीत घडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या खांद्यावर भारतीय मतदारांनी विश्वासाने डोके ठेवल्याने काँग्रेसच्या सोयीस्कर धर्मनिरपेक्ष भूमिका घेणाऱ्या नेत्यांचा तिळपापड झाला नसेल तरच नवल! काँग्रेसची धर्मनिरपेक्षताच मुळी तकलादू पायावर उभी आहे. कारण त्यात निव्वळ राजकीय स्वार्थ आहे. पराभवानंतरच्या तीन महिन्यांनंतरही काँग्रेसमध्ये अजून मनन-चिंतन झालेले नाही. राजकीय नेतृत्वाच्या अपरिपक्वतेचा दुसरा पुरावा तो कुठला? त्यात हल्ली एखाद्याचे महत्त्व कमी करायचे असेल तर त्याला धर्माध (आरएसएसवाला!), प्रतिगामी म्हणण्याची नवी फॅशन काँग्रेसमध्ये आली आहे. त्यामुळे काँग्रेसचा दुटप्पीपणा तर दिसतोच त्याबरोबर अगतिकतादेखील ठसठशीतपणे समोर येते.
काँग्रेसचे नेतृत्व सर्वाधिक काळ नेहरू-गांधी कुटुंबीयांकडे राहिले. कधी ते आपोआप आले, कधी परिस्थितीने दिले, तर कधी ओरबाडून घेतले गेले. परिस्थितीवश सोनिया गांधी यांच्या हाती नेतृत्व आले. त्यांनी ते राहुल गांधी यांच्याकडे देण्याचा जाणीवपूर्वक (!) प्रयत्न केला. त्यात त्या यशस्वी झाल्या. पण जनतेने राहुल गांधी यांना नाकारले. नेत्या-कार्यकर्त्यांच्या मनात काँग्रेस अजून जिवंत आहे. पण नवे नेतृत्व जबाबदारी पेलण्यास समर्थ तर सोडाच आश्वासकदेखील नसल्याच्या भयाण वास्तवाने काँग्रेस केडर अस्वस्थ झाले आहे. जवाहरलाल नेहरू, इंदिरा, राजीव-संजय, सोनिया गांधी यांच्याकडे आश्वस्त भावनेने पाहणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या २१व्या शतकातील पिढीला राहुल गांधी यांची कीव वाटू लागली आहे. नेतृत्वपरिवर्तनाची हाक अजून कुणीही दिली नसली तरी चलबिचल सुरू झाली आहे, हे मात्र निश्चित.
काँग्रेस हा सत्तेशिवाय जगू न शकणारा पक्ष आहे. वाईटानंतर चांगले दिवस काँग्रेस नेतृत्वाने झगडून आणले. विद्यमान नेतृत्व झगडण्यास तयार नसणे हीच खरी कार्यकर्त्यांची अस्वस्थता आहे. सतत सत्तेत राहिल्याने विरोधात येणारी शिथिलता काँग्रेसच्या ४४ खासदारांमध्येही दिसते. रस्त्या-रस्त्यांवर उतरून लढाई करावी, आंदोलन करावे हा ना राहुल यांचा स्वभाव आहे ना सोनिया गांधी यांचा. त्यांच्या नेतृत्वामधील उणिवा लोकसभेत स्पष्टपणे जाणवू लागल्या आहेत. ४४ खासदारांनी कुणाकडे आशेने पाहावे, हा प्रश्न काँग्रेस नेत्यांच्या मनात सध्या खदखदत आहे. या काँग्रेस खासदारांना ज्योतिरादित्य शिंदे या नेत्याकडे पाहून अधून-मधून दिलासा मिळतो. नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान ‘काँग्रेसमुक्त भारता’ची घोषणा दिली होती. पराभवानंतर कर्मठ काँग्रेस कार्यकर्ते ‘गांधीमुक्त काँग्रेस’ची शक्यता खासगीत का होईना पडताळून पाहत आहेत. मोदी लाटेत काँग्रेसची मोठमोठाली झाडे उन्मळून पडली. त्यात टिकून राहिले ते ज्योतिरादित्य शिंदे. काँग्रेसचे सभागृहनेते मल्लिकार्जुन खरगे असले तरी शिंदे यांनी प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले. संसदीय परंपरेचे भान राखून सभागृहात उत्तम हिंदी बोलता येणे हा दुर्लभ गुण शिंदे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकावेच लागले. अर्थसंकल्पावरील चर्चेस शिंदे यांनी सुरुवात केली. आकडेवारीच्या जोरावर शिंदे यांनी विरोधी पक्षाच्या खासदाराला साजेसे भाषण केले. त्यांच्या भाषणात मध्य प्रदेश भाजपचे काही खासदार सतत व्यत्यय आणत होते. त्यांना वारंवार समज देऊनही ते शांत न झाल्याने ज्योतिरादित्य शिंदे आक्रमक झाले. ‘..मला बोलू द्या. नाही तर मध्य प्रदेशमध्ये होणारा भ्रष्टाचार इथे चव्हाटय़ावर आणेन. माझ्यावर तोंड उघडण्याची वेळ आणू नका. नाही तर वाईट परिणाम भोगावे लागतील.’ पक्षाचे पानिपत झालेले असतानाही सुनावण्याची धमक शिंदे यांच्यात आहे. सत्ताधाऱ्यांनीदेखील हे शांतपणे ऐकून घेतले. यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांचे महत्त्व वाढले आहे.
रेल्वे अर्थसंकल्पानंतर राहुल शेजारी बसलेल्या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ‘युवा’ खासदाराला बुलेट ट्रेन भारताला कशी परवडणारी नाही, सरकारने कशी कमी तरतूद केली आहे, तांत्रिकदृष्टय़ा त्यात कोणत्या अडचणी आहेत.. आदी मुद्दय़ांवर स्वत:ची तज्ज्ञ मते सांगत होते. तासभर ते या खासदाराशी कामकाज सुरू असताना बोलत होते. राहुल गांधींचे व्यक्तिगुणविशेष पटवून देण्यासाठी या खासदार महाशयांनी अनेकांना हा प्रसंग सांगितला. राहुल गांधी गंभीर राजकारणी आहेत; तर त्यांनी या मुद्दय़ावर सभागृहात तोंड का उघडले नाही? सत्ताधाऱ्यांची धोरणात्मक कोंडी करण्याचा त्यांनी का प्रयत्न केला नाही, अशा अनेकानेक प्रश्नांचे मोहोळ उठले आहे. राहुल गांधी यांना अनेक बडे नेते ‘अनप्रेडिक्टेबल’ म्हणतात. स्पष्ट भाषेत सांगायचे तर लहरी! राहुल गांधी यांच्या लहरीपणामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनादेखील स्वत:च्या खुर्चीविषयी शाश्वती नव्हती. सोनिया गांधी यांनी अभय दिल्यावरही चव्हाण यांचे मुख्यमंत्रिपद मुंबई-दिल्ली हेलकावे खात होते. कारण राहुल गांधी यांचा निर्णय व्हायचा होता. तोपर्यंत चव्हाणांना स्वत:च्या मुख्यमंत्रिपदाची शाश्वती नव्हती. पराभवाचा शीण घालवण्यासाठी परदेशात गेलेले राहुल गांधी परतल्यानंतर चव्हाण यांच्याविषयी निर्णय झाला व पृथ्वीराजबाबा यांचा जीव भांडय़ात पडला.
सभागृहातदेखील राहुल गांधी यांचा लहरीपणा दिसतो. ज्योतिरादित्य शिंदे, मल्लिकार्जुन खरगे या नेत्यांमुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये थोडाफार का होईना समन्वय साधला जातो. अर्थसंकल्प सादर करताना अस्वस्थ वाटू लागल्याने खाली बसलेल्या अरुण जेटली यांच्याजवळ जाऊन विचारपूस करण्याचा राजकीय उमदेपणा ज्योतिरादित्य शिंदे यांनीच दाखवला. हा उमदेपणा राहुल वा सोनिया गांधी यांनी दाखवायला हवा होता, ही प्रतिक्रिया एका काँग्रेस खासदाराच्या तोंडून खासगीत उमटली.
कधी काळी घराघरांत रुजलेला काँग्रेस पक्ष ‘इंग्लिश क्लास एलिटिझम’मध्ये अडकला आहे. उत्तम इंग्रजी येत असूनही ज्योतिरादित्य शिंदे यांनी जाणीवपूर्वक अर्थसंकल्पावर हिंदीतून भाषण केले. कारण सत्ताधाऱ्यांनी ‘हिंदी बचाओ, हिंदी बढाओ’ची हाक दिली आहे. हिंदूीबहुल राज्यांमधून नव्या नेतृत्वाचा शोध काँग्रेसमध्ये सुरू झाला आहे.
 शिंदे यांच्या भाषणाला विरोधी सदस्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. शिंदे यांच्या कार्यालयात भेटायला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. संसदेच्या आवारात का होईना, एक नवे सत्ताकेंद्र उदयास आल्याची ही चाहूल आहे. नेत्यांना देव मानणारे कार्यकर्ते जोपर्यंत आहेत, तोपर्यंत गांधीमुक्त काँग्रेसचा विचार कुणाच्याही मनाला शिवणार नाही. पण श्रद्धास्थाने उद्ध्वस्त व्हायला लागली की अस्वस्थता वाढते. ही अस्वस्थता केवळ सत्ताधाऱ्यांना उखडून फेकते. काँग्रेसविरोधात मतदारांच्या मनात हीच अस्वस्थता होती. विद्यमान नेतृत्वाविषयी अशीच अस्वस्थ चलबिचल काँग्रेस नेत्या-कार्यकर्त्यांच्या मनात  आहे.
राजकारणात लागणारी महत्त्वाकांक्षा राहुल गांधी यांच्याकडे आहे अथवा नाही, हाच मोठा पेच आहे. त्यात काँग्रेसकडे प्रभावी युवा नेतृत्व नाही. विरोधी पक्षनेतेपद देण्याची विनंती करण्यासाठी खरगे यांच्यासमवेत ज्योतिरादित्य शिंदे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे गेले होते. मध्य प्रदेशपुरते का होईना काँग्रेस नेते-कार्यकर्त्यांनी यास शुभसंकेत मानला. जमिनीशी नाते नसलेल्या नेत्यांची काँग्रेसमध्ये रेलचेल आहे. प्रदेशस्तरावरचे नेते मोठे होणार नाहीत, याची पुरेपूर काळजी गांधी कुटुंबीयांनी व त्यांच्या खजिनदारांनी घेतली. संपुआच्या काळात राहुल गांधी स्वपक्षाच्या खासदारांनादेखील भेटत नव्हते. त्यांचे प्रश्न सोडवणे तर दूरच. आताही संसदीय भूमिका ठरवण्याची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदे, मल्लिकार्जुन खरगे, अपवादात्मक स्थितीत शशी थरूर, कमलनाथ यांच्याकडे आली आहे. असे असले तरी गांधी कुटुंबीयांविषयी काँग्रेसला पर्याय नसल्याची भावना तीव्र आहे. कारण गांधी कुटुंबातील सदस्याच्या सभेशिवाय आपण निवडणुकीत जिंकू शकत नाही, या भ्रमातून काँग्रेस नेते बाहेर पडण्यास तयार नाहीत. गांधीमुक्त काँग्रेसचे अनेक प्रयोग प्रदेशस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर झालेत. पण बंडखोर नेते जितके प्रभावी होते; तितकेच कसलेले नेतृत्व गांधी कुटुंबाकडे होते. त्यामुळे पक्षावरचा प्रभाव टिकवण्यात त्यांना यश आले. पण भविष्यात गांधीमुक्त काँग्रेससाठी पक्षांतर्गत परिस्थिती व केडरची मानसिकता निर्माण होणारच नाही, असे मानणे भाबडेपणा ठरेल.
भाजपसाठी हा विजय जसा ऐतिहासिक आहे, तसा काँग्रेससाठी ऐतिहासिक पराभव आहे. ‘इतना भी गुमान न कर अपनी जीत पर ऐ ‘बेखबर’, शहर में तुम्हारी जीत से ज्यादा चर्चे हमारी हार के है.!’ हीच काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. बहुधा त्यामुळेच संसदेत ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडूनच काँग्रेसला चांगल्या कामगिरीची आशा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2014 1:07 am

Web Title: gandhi free congress
Next Stories
1 भाजपमधील नवे नेतृत्वपर्व
2 कार्यपद्धतीची जुळवाजुळव!
3 धास्तावलेले सत्ताधारी, सुस्त विरोधक!
Just Now!
X