केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) यंदा प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या, २९ वर्षे वयाच्या गौरव अगरवालची आतापर्यंतची कहाणी अनेक तरुणांना प्रेरणा देणारी आहे. लहानपणापासून बऱ्यापैकी हुशार, वाचनाची आवड असलेला गौरव बारावीनंतर कानपूरच्या आयआयटीत गेला. तिथे कॉम्प्युटर सायन्स विषयात बी. टेक. झाला. मात्र याच अभ्यासक्रमात त्याने मध्यंतरी एक गटांगळीही खाल्ली होती.. हे अपयश मोठे नव्हते, पण त्यामुळे बी.टेक. पदवीसाठी एक वर्ष अधिक जाणार हे अटळ झाले. एवढय़ाने तो भरपूर काही शिकला आणि उमेद धरायची ती मेहनतपूर्वक मिळवलेल्या सर्वोच्च यशाचीच, असा चंग त्याने बांधला.
कानपूरच्या आयआयटीतून तो व्यवस्थापनाच्या शिक्षणासाठी लखनऊच्या आयआयएममध्ये गेला. त्याला पदविकाच करता येणार होती. ती त्याने मिळवली, तिथे सुवर्णपदक पटकावून! त्यानंतर नोकरीही बरी मिळाली. ‘सिटीग्रुप’सारख्या मोठय़ा संस्थेत, हाँगकाँग शाखेत. २००८ ते २०११ अशी दोन वर्षे गौरव परदेशात होता.
पण प्रेरणादायी कहाणी सुरू होते ती इथूनच. भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हायचे, या ध्येयाने पछाडलेला गौरव नोकरी सोडून आला. इतिहास आणि अर्थशास्त्र घेऊन २०१२ची परीक्षा उत्तीर्ण झाला, यासाठी दिल्लीच्या एका वर्गाची मदत झाली खरी, पण क्रमांक मात्र २४४ वा आला. तेवढय़ावरही भारतीय पोलीस सेवेसाठी त्याची निवड झाली आणि हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकॅडमीत त्याचे प्रशिक्षणही सध्या सुरू आहे. मात्र ही निवड झाल्यानंतर त्याने ठरवले, पुन्हा परीक्षेला बसायचे. इतिहास हा आपला विषय नसल्याने गेल्या वेळी पीछेहाट झाली, पण यंदा फक्त अर्थशास्त्र घ्यायचे. घरीच १२ तास दररोज अभ्यास. शिवाय, दुसऱ्या वेळी मुलाखतीच्या तयारीवर अधिक भर. हे सारे होत असताना मुलाखतीपूर्वीच- ४ जून रोजी गौरव चतुर्भुज झाला! त्याची पत्नी प्रीती डॉक्टर आहे.
ही कहाणी कुणाही मध्यमवर्गीय पालकांना आनंद देणारी आणि काही धडेसुद्धा शिकवणारी आहे. हाँगकाँगमध्ये बहुराष्ट्रीय बँकिंग संस्थेची चांगली नोकरी सोडून हा मुलगा वयाच्या २७ व्या वर्षी घरी परत येतो, दिल्लीत सहा महिने शिकवणी वर्गाना जातो आणि आयएएस अधिकारी होण्याच्या ईष्र्येने परीक्षा देतो. तिथे एकदा हवा तो क्रमांक न मिळाल्याने तीच परीक्षा पुन्हा देतो.. या सर्वामध्ये त्याच्या पालकांची- वडील सुरेशचंद्र आणि आई सुमन यांची घालमेल झाली असेलही. पण सध्या तरी गौरवला सर्वात मोठे पारितोषिक त्याच्या आईने दिले आहे..  ‘आमचा ‘गौरव’च तो!’ एवढय़ाच प्रेमळ शब्दांचे!