समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी गेली ३० वष्रे अखंड आणि अविरत झटणारे, त्यासाठी महिन्यातील २२-२२ दिवस एस. टी. ने प्रवास करून महाराष्ट्र पिंजून काढणारे नरेंद्र दाभोलकर यांची, पुणे येथे मंगळवारी सकाळी फिरायला गेले असताना पाठीमागून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
दाभोलकर यांचा अंधश्रद्धेविरुद्धचा लढा शांती आणि अहिंसा या गांधीजींच्या तत्त्वानुसार चालणारा होता. आजवर त्यांच्यावर काळे फासणे, मारहाण करणे, चपलांचा हार घालणे असे अनेक प्रसंग आले, पण त्यांनी कधीही हात उगारला नव्हता. काही संघटनांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली तेव्हा देऊ केलेले पोलिसी संरक्षण अथवा पिस्तूल त्यांनी नम्रपणे नाकारले होते; ते त्यांच्या अहिंसेच्या मार्गावर असलेल्या अविचल श्रद्धेपोटीच. नरेंद्र दाभोलकर सरसकट सर्वच श्रद्धांच्या विरोधात कधीच नव्हते. चांगले कार्य करायला उद्युक्त करणाऱ्या श्रद्धांना त्यांचा विरोध नव्हता, परंतु अज्ञान, गर-समजुती यावर आधारित अंधश्रद्धा याविरुद्ध त्यांचा लढा होता. हे अज्ञान, या गरसमजुती समाजातील मोठय़ा वर्गाच्या शोषणाचा पाया आहे अशी त्यांची धारणा होती. अंधश्रद्धाविरहित, विवेकाने चालणारा समाज हा अधिक आनंदी, तणावमुक्त आणि शोषणरहित असेल असे त्यांना वाटे आणि हा ध्यास घेऊन त्यांनी ‘अं नि स’ च्या मार्गातून अतुलनीय असे काम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही उभे केले.
व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यात क्वचित बघायला मिळणारी सचोटी त्यांच्यात होती. त्यांनी कोणताही सरकारी नियम कधी मोडला नाही. स्वतचे वजन वापरून आडवळणाने कोणतेही सार्वजनिक कामही करून घेतले नाही. त्यांचा लढा हा सतत सनदशीर आणि शांततामय होता. असे असताना नि:शस्त्र आणि बेसावध दाभोलकरांवर पाठीमागून गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली, ही अतिशय निर्लज्ज आणि भ्याड कृती आहे. त्याचा त्रिवार नव्हे, तर सदाच निषेध व्हावयास हवा. स्वातंत्र्य लढय़ात ब्रिटिशांच्या गोळ्यांचा सामना आपण विचारांनी केला. त्यात एके काळी महाराष्ट्र अग्रेसर होता आणि आज आपल्यातील अशा एकाचा, की ज्याने आपल्या मराठी बांधवांचे अज्ञान आणि त्यावर आधारित शोषण दूर करण्याच्या आयुष्यभर प्रयत्न केला. त्याच्या विचारांचा सामना बंदुकीच्या गोळ्यांनी केला, हे महाराष्ट्राला लांच्छन आहे. आपण गेल्या ६५ वर्षांत समाज म्हणून प्रगती करायच्या ऐवजी केलेली ही अधोगती आहे.  यावर आपण सर्वानीच अंतर्मुख होण्याची गरज आहे.
बंदुकीच्या गोळ्यांनी विचार मरत नाहीत हे जरी खरे असले तरी नरेंद्र दाभोलकरांसारखा नि:स्पृह नेत्याचा असा अंत होतो, तेव्हा ज्याचा आदर्श ठेवावा अशी आपल्यातील चालतीबोलती व्यक्ती हिरावली गेली हे दुख मोठेच असते. समाजात कित्येक विचारवंत असतात, कित्येक व्यक्तींना समाजातील दुर्बल घटकाविषयी कळकळ असते. कित्येक जण समाजासाठी कोणत्याही त्यागास तयार असतात, पण हे सारेच गुण नरेंद्र दाभोलकर यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. कोणत्याही किमतीला विकले जाणारे अम्लान, अभ्रष्ट असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. आजवरच्या आपल्या विचाराने आणि आचरणाने या पुढेही कित्येकांना त्यांनी स्फूर्ती दिली असती आणि त्यासाठी त्यांचे समाजात असणेदेखील पुरले असते, पण आपल्यातीलच एकाने त्यांचा असा अंत केला आहे. नरेंद्र दाभोलकरांचे सर्व विचार आपणाला पटोत ना पटोत, पण विरोधात बोलणाऱ्यांचा त्यांची िहसा करून आवाज बंद करण्याच्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करणे यासाठी आपण सरकारवर दबाव टाकला पाहिजेच. परंतु त्याही आधी आपण सर्वानीच समाजातील अशा घटकांना एकाकी पाडले पाहिजे.  विचार आणि उच्चार स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे. नरेंद्र दाभोलकरांची जेव्हा हत्या होते, तेव्हा हे आपले सर्वाचे मूलभूत स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न असतो. तो ओळखून अशा प्रवृतींचा नुसता निषेध नव्हे, तर त्यांना एकाकी पडणे हे आपल्याच हितासाठी आपण केले पाहिजे. समाजाचे हित कशात आहे, हे दाभोलकर यांना समजले होते. समजले नव्हते ते आपणाला. न पेक्षा अशा प्रवृत्तींना बळ कुठून मिळाले असते?           
डॉ. अजय ब्रह्मनाळकर, औरंगाबाद

जनआक्रोशाची भूलवाट..
दाभोलकरांना आपल्या विचाराची किंमत प्राणाची आहुती देऊन चुकवावी लागली. त्यांना विरोध करणाऱ्या शक्तींना विवेकाचेच वावडे असल्याने त्यांनी हे आततायी पाऊल उचललेले दिसते. अशा अनेक प्रसंगात जनआक्रोश हा स्वाभाविक असतो पण बऱ्याचदा या जनक्षोभाचे लक्ष्य चुकल्याने मारेकऱ्यांना फाशी द्या येथपासून ते त्यांच्या मागील शक्तींवरही कारवाई करा अशा वरवरच्या व ताबडतोबीने शक्य असणाऱ्या मागण्या केल्या जातात. त्यात तसे गर आहे असेही नाही. परंतु त्यामुळे घटनेची कारणमीमांसाही पूर्ण होते असे म्हणता येणार नाही. अशा मागण्या पूर्ण करणे या व्यवस्थेला काही वेळा शक्य वा सुलभ असले तरी एखाद्याचे प्राण घेणे एवढे सोपे का व कशामुळे झाले यापर्यंत विषय न आल्याने ज्यांच्यावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जनतेची सुरक्षा करण्याची जबाबदारी आहे त्या व्यवस्थेची परिस्थिती आज काय आहे व त्याला कोण घटक कारणीभूत आहेत येथवरही कधी चर्चा येत नाही. सरकारला आव्हान देणाऱ्या या शक्ती कायदा व सुरक्षिततेची तमा न बाळगता कशा प्रबळ होतात हे पाहू जाता त्याचे श्रेय आजच्या राजकीय व्यवस्थेकडे जाते हे भीषण वास्तव स्वीकारून त्या दिशेने कारवाई होणे आवश्यक आहे.
आज राजकारणात लोकप्रतिनींधीच्या बुरख्याआड वावरणारे गुंड, निवडून येणे शक्य नसल्यास अभय वा आधार देऊ शकणाऱ्या पक्षात कार्यरत असणाऱ्यांचा उदोउदो वाढला आहे. राजकारण म्हणजे गुंडगिरी असा समज होण्याइतपत हा प्रकार गेला आहे. त्यामुळे एकाद्या कॉलनीत गाडय़ा फोडल्या वा पेटवल्या, स्त्रियांना लुटले, असहाय तरुणींवर बलात्कार केले तरी आपले कोणी वाकडे करू शकत नाही असा आत्मविश्वास आल्याने सर्वसामान्य माणूस प्रचंड दहशतीखाली वावरतो आहे. ही दहशत गुंडाच्या पथ्यावरच पडल्याने शहरात प्रत्येक वॉर्डात भाऊ, अण्णा, दादा व त्यांचे चेले भाजी विक्रेते, इस्त्रीवाले, हातगाडीवाले यासारख्याकडून खंडणी गोळा करीत आपले साम्राज्य प्रस्थापित करीत असतात. नगरसेवकाचा ठेकेदारांकडून तर आमदारांचा उद्योगांकडून अशा चढत्या भाजणीत त्यांचा कारभार चालतो. पोलिसांना हे सारे माहीत असते. कुठल्या गुंडाला पकडल्यावर त्याला सोडण्यासाठी कोणाचा फोन येईल व त्याला तसे सोडण्यापूर्वी आपला काही कार्यभाग साधता येतो का याचाच पोलिस विचार करतात. काही प्रसंगात तर पोलिसही या गुंडांच्या ताकदीने भयगंडाखाली वावरत असतात. हे वास्तव आणिकच भीषण आहे. समाजात सर्वच क्षमतेची माणसे उपलब्ध असतात. काही हजारात मारण्याची सुपारी घेणारेही आपल्या सामाजिक वास्तवाला धरूनच आढळतात. प्रश्न हा आहे की हे वाईट आहे असे कोणाला वाटतच नाही व काहीही केले तरी आपल्याला काही शासन होणार नाही असा आत्मविश्वास येणे ही सर्वात काळजी करण्यासारखी गंभीर बाब आहे.
आज पुणेच नव्हे तर सारी शहरे कडेलोटाच्या पायरीवर पोहोचलेली आहेत. तेथील सर्वसामान्यांचे जीवन अत्यंत असुरक्षित असल्याची अनेक प्रकरणे जाहीर होऊनही संबंधितांवर काही कारवाई झालेली नाही. गृह कशाशी खातात याचा पत्ता नसलेल्याकडून ‘कोणाची गय केली जाणार नाही’च्या वल्गना ऐकाव्या लागतात, ‘पोलिसांना आदेश दिले आहेत’ असे बोबडे बोल ऐकावे लागतात, ते किती दिवस चालू द्यायचे हे सर्वसामान्य माणूस कधी ठरवणार ?
डॉ. गिरधर पाटील, नाशिक

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
What Sanjay Raut Said?
“देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली वाळवी, त्यामुळेच..”; संजय राऊत संतापले
electricity
कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर.. ‘या’ आहेत मागण्या…
AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…

‘सनातनी’त्व झुगारण्याची ठोस कृती अपेक्षित       
हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्यांवर ‘मनुवादी’, ‘सनातनी’ (पुराणमतवादी) असल्याचा ठपका ठेवला जातो. परंतु प्रत्यक्षात बऱ्याच जणांच्या ‘हिंदुत्वा’चा ‘उलेमा-अनुनय-विरोध’ एवढाच अर्थ असतो. हिंदू परपंरा जरी उदारमतवादी असली तरी अल्प-प्रमाणात का होईना, हिंदूंमध्ये, ‘पुनरुज्जीवनवादी’ व अमानवी कुप्रथांना मूलतत्त्वे(!) समजणारे धर्माध, आजही सक्रिय आहेत. म्हणूनच हिंदू-पक्षांनी/संघटनानी ‘आम्ही सनातनीत्व झुगारलेय’ असे सिद्ध करण्याची वेळ आली आहे.
लोकांत काल्पनिक घबराट पसरवणारे, मग तिच्यावर जादूई, हिंस्र व बीभत्स उपाय सांगण्याचा धंदा करणारे, जे मांत्रिक, भगत व बुवा/बापू आहेत, त्यांचीही लॉबी असेल असे कधीच वाटले नव्हते. तसेच हिंदू पुनरुज्जीवनवादी धर्माध हे नगण्य अल्पमतात असतील असेही वाटत होते. पण डॉ नरेंद्र दाभोलकर यांची राजकीय-हत्या केली गेल्याने, हे दोन्ही अंदाज म्हणजे मूर्ख बेसावधपणा होता, असे सिद्धच झाले आहे. आम्ही हिंदू हे मुळातच सेक्युलर! त्यामुळे आम्हाला मुद्दाम सेक्युलर म्हणवून घ्यायची गरजच काय? असे म्हणणारे हिंदुत्ववादीही या घटनेमुळे तोंडावर आपटले आहेत.
दोन्ही काँग्रेस या फक्त बुळ्या आहेत इतकेच वाटत होते. पण त्या हिंदू-उलेमा-अनुनय करणाऱ्या निघतील असे मात्र वाटले नव्हते व हाही बेसावधपणा ठरला आहे. येथे बुद्धिप्रामाण्य यासारखे भलेमोठे शब्द खर्ची पाडायची जरूर नाही. सहिष्णुता हे काँग्रेसचे मुख्य तत्त्व आहे.
..त्याचा अर्थ काँग्रेसने सहिष्णू राहणे इतकाच नसून, आपल्या राज्यात असहिष्णूंना प्रतिबंध करणे हा आहे.
भांडारकर इन्स्टिटय़ूट हल्ला प्रकरणानंतर लगेच कराडच्या साहित्य संमेलनात शरद पवारांनी, ‘संशोधकांनी संशोधन करतानासुद्धा जनभावना लक्षात घेऊन संशोधन केले पाहिजे’ असे भन्नाट विधान करून, असहिष्णूंना पाठीशी घातले होते. खरे तर ‘जाती’च्या जमातवादाला आश्रय देणारे, धार्मिक पुनरुज्जीवनवादही चालू देऊ शकतात हे तर्कत लक्षात यायला हवे होते. पण त्यांचा ‘जाती’जमातवाद हा ‘अब्राह्मणी’ असल्यामुळे, त्यांच्याकडून निदानपक्षी, जादूटोणा-अघोरी प्रथा विधेयक तरी मंजूर होईल अशी आशा होती. पण त्यांनी पाठीशी घातलेल्या जातीवादी संघटनांचा विरोध, हा ‘ब्राह्मणी’ विचारसरणीला व समाजपद्धतीला नसून, ब्राह्मण-कुलोत्पन्नांच्या यशाचा मत्सर इतकाच आहे की काय, असा प्रश्न पडतो.
या प्रसंगातून व वरील चुकांमधून आम्ही बिगर-हिंदुत्ववादी काय घ्यायचे ते धडे घेऊच. उदाहरणार्थ- कोणताच ग्रस्ततागंड न जोपासणे, कनिष्ठ-जाती-अस्मिताबाजीसुद्धा टाकून देणे वगरे.
पण िहदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या सेना-भाजप आदींनी ‘आमच्यात भगव्या-जिहादाला थारा नाही’, याची हमी राष्ट्राला दिली पाहिजे. ज्याप्रमाणे सनदशीर डावे, आम्ही नक्षलवादाला थारा देत नाही, असे, प्रसंगी हौतात्म्य पत्करून, दाखवून देतात त्याप्रमाणे हिंदुत्ववाद्यांनाही आपला शुद्ध हेतू सिद्ध करावा लागेल.
 त्यांनी, ‘आम्ही सनातनीत्व झुगारतो आहोत’ असे नुसते ठराव करणे पुरेसे नाही (निदान तेवढे तरी करायलाच हवे) तर, भगवा फडकवून, भगव्याखाली मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम करून, आपली बाजू स्वच्छ केली पाहिजे. अन्यथा ‘मंदिरमार्ग सोडून विकासमार्ग धरला’ यावर कोण विश्वास ठेवणार?
राजीव साने, पुणे

हे राज्य माफियांचेच, यावर शिक्कामोर्तब
‘पारतंत्र्य हा गळ्याला बसलेला फास आहे; तर अंधश्रद्धा, सामाजिक दोष हा पोटातील रोग आहे. आधी गळफास सोडवा व मग पोटातल्या रोगावर औषधे शोधायला लागा. गळफासाकडे दुर्लक्ष करून पोटातल्या रोगांना महत्त्व द्याल तर पोटात औषध जायच्या आधीच प्राण निघून जातील.’
..  हे स्पष्टपणे सांगणाऱ्या  लोकमान्यांच्या दुर्दम्य संघर्षांने, सर्वस्वाचा होम करून स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतलेल्या क्रांतिकारांच्या, स्वातंत्र्यसैनिकांच्या शिकस्तीने पारतंत्र्याचा गळफास निघाला, पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल ६६ वर्षे झाली तरी अंधश्रद्धांसारखे पोटातील रोग मात्र बरे झाले नाहीत.. उलट बरेचसे रोग विकोपाला गेले आहेत, असे वाटण्याजोगी परिस्थिती आज एकविसाव्या शतकात, तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याकडे सर्वत्र आढळते.
वाढत्या धार्मिकतेचे, त्यातून उद्भवलेल्या अंधश्रद्धांचे विविध आविष्कार आज सगळीकडे दिसतात. आज अवतीभोवती बुवा, महाराज, बापू, ज्योतिषी, वास्तुतज्ज्ञ यांची पदोपदी गरज भासणारे लोक आहेत. जुन्या देवस्थानांबरोबर ‘नवसाला पावणारे’ नवीन गणपती आणि हाकेला धावणाऱ्या देवी गल्लीबोळांतील उत्सवांत उदयाला येत आहेत. प्रतिशिर्डी, प्रतिबालाजी भाविकांच्या सोयीसाठी (?) वसवले जात आहेत.  हे उत्सव सार्वजनिक रस्ते आंदण दिल्यासारखे खुशाल अडवत आहेत पण त्याविरुद्ध चकार शब्द काढायची सर्वसामान्य नागरिकांची शामत नाही.
कारण येथे माफियांचे राज्य आहे. प्रवाहाविरुद्ध पोहून समाजातील अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे हे जीवन ध्येय मानलेल्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची हत्या पुण्यासारख्या शहरात व्हावी, या घटनेने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
रजनी अशोक देवधर, ठाणे.

महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणणे, हीच खरी अंधश्रद्धा
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, हा दांभिकपणा जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येवर भाष्य करणे, प्रतिक्रिया देणे निर्थक ठरते.
दाभोलकरांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या अन्त्यसंस्कारानंतर एका वाहिनीला दिलेली प्रतिक्रिया मात्र सरकारच्या (बंद?) डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे. त्यांनी सांगितले, ‘मला सरकारकडून फारशी काही आशा नाही’.
याचा अर्थ असा की मारेकऱ्यांना पकडून काही शिक्षा होईल वा भविष्यात अंधश्रद्धानिर्मूलन विधेयक संमत होईल याविषयी आशादायी चित्र नाही. अर्थातच जनसामान्यांचीदेखील हीच भावना आहे आणि यापूर्वीच्या अनुभवातून ती निर्माण झालेली आहे. माहिती अधिकारी कार्यकत्रे सतीश शेट्टी यांच्या हत्येचे उदाहरण यासाठी पुरेसे बोलके आहे.
भारतीय लोकशाही व्यवस्थेतील राजकीय पक्षांचे सरळ सरळ ‘धार्मिक ध्रुवीकरण’ झालेले दिसते. त्यामुळे धर्मनिरपेक्षता ही केवळ तोंडी लावण्यापुरतीच आहे, हे वास्तव आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे अशी सातत्याने दवंडी पिटली जाते, यात प्रसारमाध्यमांचादेखील सिंहाचा वाटा आहे. प्रत्यक्षात ज्या राज्यात अंधश्रद्धेविरोधातील विधयक सातत्याने डावलले जाते, जातपंचायतीच्या निर्णयांवर समाजाला नाचवले जाते, स्त्री-भ्रूणहत्या थांबत नाहीत, त्या राज्याला पुरोगामी म्हणून संबोधणे हीच खरी अंधश्रद्धा आहे.. पुरोगामित्वाच्या परिभाषेत हे सर्व बसते का?
 याचा ऊहापोह होणे गरजेचे वाटते. अन्यथा हे केवळ मृगजळ / दिशाभूलच ठरते. डॉ. दाभोलकरांची हत्या होण्यासारखा, दुष्टप्रवृत्तीने अिहसात्मक – सत्प्रवृत्त – विवेकी विचारांचा गळा घोटण्याचा प्रकार घडू शकतो, तो यामुळेच.
सुधीर ल. दाणी , बेलापूर (नवी मुंबई)

दाभोलकर यांच्या पश्चात..
‘कुठलाही विचार खोडून काढायचा असेल तर त्याला प्रतिविचार हेच उत्तर असते. कोणाचीही हत्या केल्याने कुठलाही विचार दाबला गेल्याचा जगात इतिहास नाही. उलटपक्षी एखाद्या विचारासाठी बलिदान झाल्याने तो विचार अधिक तेजस्वी बनतो आणि जास्त काळ टिकतो.’  हे कुमार सप्तर्षी यांनी ‘आत्मसंरक्षणाची गरज’ या लेखातून (लोकसत्ता, २१ ऑगस्ट) व्यक्त केलेले विचार सर्वसाधारण विचार करणाऱ्यांचेही आहेत. परंतु दुर्दैवाने माथेफिरूच्या डोक्यात हा इतिहास शिरू शकलेला नाही म्हणूनच ‘काळ निर्दय’ झाल्याचे पाहावे लागते !
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ डॉ. दाभोलकरांनी स्वत:च्या मुठीत न ठेवण्याचा नि:स्पृहपणा दाखवला. सहकाऱ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा कटाक्ष त्यांनी सुरुवातीपासून पाळला. त्यामुळे, त्यांच्या हत्येमुळे चळवळीला व समाजमनाला जबर धक्का बसलेला असला तरी ती (चळवळ) यापुढेही जनजागृती करीत राहील यात तिळमात्र शंका नाही.
डॉ. दाभोलकर हे सामंजस्य, वैचारिक देवाणघेवाण, विचार पटवून देण्यासाठी तळमळ यावर अधिक भर देणारे होते. घाई, उतावळेपणा त्यांचा स्वभाव नव्हता. ज्या वेळी आपण चळवळीचे सुकाणू नव्या रक्ताच्या नेतृत्वाकडे सोपवण्याचा विचार करतो. वरील घटकांचा विचार केला जाणे क्रमप्राप्त ठरते.
मुरली पाठक, विलेपाल्रे (पूर्व)

धसका घेऊन ‘शिक्षा’
एखाद्या माणसाच्या अंगात देव येणे, तो घुमणे, अंगारे धुपारे करणे, इत्यादी ‘पारंपरिक’ प्रकारांपासून ते अठरापगड समाजातील दु:खाने पीडित, तणावग्रस्त लोकांना तथाकथित ‘आध्यात्मिक’ उपाय सुचवून त्याचा भाग म्हणून त्यांना मानसिक गुलामगिरीत ठेवणे, त्यांच्याकडून पसे उकळणे, अशा प्रकारची चळवणूक अद्यापही सुरूच आहे. मोठय़ा प्रमाणावर लोक अशा मार्गाचा अवलंब करतात व अकारण पसे खर्च करतात. हे एक प्रकारचे शोषण आहे. या शोषणाविरोधात नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याचा त्यांच्या विरोधकांनी चांगलाच धसका घेतला व त्यांचा अडसर कायमचा दूर करण्यासाठी त्यांची हत्या झाली. प्रवाहाविरोधात काम करणाऱ्यांना अशीच ‘शिक्षा’ मिळते.
विश्वास किसन पेहेरे, अहमदनगर</strong>

असे किती जाणार?
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ही बातमी ऐकली आणि विचार आला आज आपले विचार आणि आचरण कोणत्या दिशेने आहे? वैचारिक मतभेद  असू शकतात; त्याचा विरोध मात्र अविचारी मार्गाने केला जातो.. हीच का आपली प्रगती? सरकारची अनास्था हेसुद्धा या हत्येचे एक कारण आहे. सरकारने जे निर्णय योग्य आहेत ते जनतेसमोर स्वत मांडायला नकोत का? असे किती नरेंद्र जाणार..? आता लोकांनीच विचार करायला हवा.
भाग्येश जावळे

‘बंद’ का?
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या तत्त्वांना काही कार्यकर्त्यांनी लगेच हरताळ फासायला सुरुवात केली आहे. ज्यांनी जन्मभर दांभिक उपचारांना विरोध केला त्यांना आपल्या पाíथवावर पडणाऱ्या हारांना विरोध करता आला नाही. पुण्यात ‘सर्वपक्षीय’ बंदचं केलेलं आवाहन म्हणजे दाभोलकर यांच्या आयुष्यभर जपलेल्या तत्त्वांना मूठमाती देण्यासारखे आहे.
– सागर पाटील, कोल्हापूर</strong>

मोदींच्या प्रयत्नांना अपशकुन हास्यास्पद
विचारांना विचारानेच उत्तर दिले पाहिजे हे खरे आहे; परंतु नरेंद्र दाभोलकरांच्या संदर्भात लिहिताना नरेंद्र मोदींना त्या लेखात ओढण्याची गरज कुमार सप्तर्षी यांना का वाटली, हा प्रश्न मला पडला आहे.
 सप्तर्षी म्हणतात, ‘नरेंद्र मोदी आल्यापासून काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा चालू झाली आहे’ यात सप्तर्षीचे काय नुकसान झाले हे कळत नाही. काँग्रेसमुळेच  जात्यंध मंडळींच्या प्रतिगामी विचारांना खतपाणी घातले जात आहे, याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मुल्लामौलवींच्या दबावापुढे दबून शहाबानो प्रकरणात (सन १९८६) घटनादुरुस्तीपर्यंत काँग्रेसची मजल गेली आणि म्हणून ज्या काँग्रेसने ही विषवल्ली जोपासली त्या काँग्रेसपासून देशाला मुक्त करण्यासाठी मोदी सरसावले आहेत तर त्यांच्या पाठीमागे उभे राहण्यात गर काही नाही हा मुद्दा सर्वसामान्य नागरिकाच्या डोक्यात शिरत असताना कुमार सप्तर्षीसारख्यांनी मोदींच्या प्रयत्नांना अपशकुन करू नये. ते घडय़ाळाचे काटे उलटे फिरवण्यासारखे हास्यास्पद होईल.
 – श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)