‘कोल्हापुरी’ मिसळ, ‘नागपुरी’ संत्री, ‘कांचीपुरम’ साडी यातील स्थान हेसुद्धा एक प्रकारची बौद्धिक संपदा आहे हे आपल्याला माहिती असते का? ‘स्कॉच’ व्हिस्की किंवा जागोजागची वाइन यांनी मात्र ही संपदा राखली.. त्यासाठी ‘भौगोलिक निर्देशांक’ किंवा ‘जीआय टॅग’ मिळवले. अर्थात, जीआय हा ज्या उत्पादनासाठी मिळाला, त्या प्रदेशातून  ते उत्पादन घेणाऱ्या अनेक उत्पादक किंवा विक्रेत्यांना आपापल्या ब्रँडनावाने वापरता येतो!

‘‘नाव सांग सांग सांग ..गाव सांग’’ हे गाणे आपण सगळ्यांनीच ऐकले आहे.. आणि एका मुलाने एका मुलीला छेडण्यासाठी गायलेले हे गाणे आहे इतकाच बोध त्यातून आपण नेहमी घेत आलो आहोत. पण बाजारात विकायला आलेल्या किती तरी गोष्टींना आपण हा प्रश्न विचारत असतो याची कल्पना करता येईल का.. गाण्यात नसे ना का.. पण नक्कीच विचारत असतो. विचार करा की, तुम्ही बाजारात आंबे खरेदी करत िहडता आहात.. तेव्हा आंब्याच्या प्रत्येक ढिगासमोर उभे राहून तुम्ही मनातल्या मनात हे गाणे गात असता की नाही? ‘नाव सांग सांग सांग (तू हापूस आहेस की पायरी की रत्ना की केशर?) ..गाव सांग सांग (रत्नागिरी की देवगड की राजापुरी?) हे प्रश्न नक्कीच असतात आपल्या मनात आणि ते का असतात? तर त्या त्या भागात होणाऱ्या आंब्याची एक विशिष्ट चव, स्वाद, रंग, आकार भिनलेला असतो आपल्या डोक्यात. आणि आंब्यातले हे विशिष्ट गुण तो कुठे पिकवला गेलाय त्यानुसार बदलणार आहेत, हेही आपल्याला नक्कीच ठाऊक असते.. नाही का?
हां, एखाद्या कारखान्यात यंत्रावर बनवली गेलेली वस्तू असेल तर तिचे गुणधर्म जागेप्रमाणे बदलत नाहीत. एखाद्या औषध कंपनीचे गोव्यातल्या कारखान्यात, इंदूरच्या कारखान्यात आणि हैदराबादमधल्या कारखान्यातले औषध अगदी ‘सेम टू सेम’ असणार. पण काही वस्तूंच्या बाबतीत मात्र त्यांचे गुणधर्म त्यांच्या उत्पादनाच्या जागेनुसार नक्कीच बदलणार.
विशेषत: तो शेतीमाल असेल तर (आंबे, द्राक्षे, चिकू, तांदूळ इ.) किंवा हाताने बनविली जाणारी वस्तू किंवा पदार्थ असेल तर (हातमागावर विणली जाणारी वस्त्रे, हाताने बनविली जाणारी खेळणी किंवा इतर वस्तू). कारण शेतात उगवणाऱ्या वस्तूंचे गुण बदलतात त्या त्या भागातली माती, हवामान, पर्जन्यमान यांसारख्या गोष्टींमुळे. तर हाताने बनविल्या जाणाऱ्या वस्तूंचे गुण बदलतात तिथल्या कारागिरांचा अनुभव, परंपरागत कौशल्ये, पिढीजात कला यांसारख्या गोष्टींमुळे. आणि म्हणूनच अशा काही गोष्टींबाबत त्या कुठे बनल्या हे फार महत्त्वाचे असते. आणि आपण कित्येकदा पाहतो की त्या जागेनुसार त्या वस्तूचा भाव आणि दर्जा ठरत असतो. येथे ‘अस्सल कोल्हापुरी मिसळ मिळेल’ किंवा ‘खास पठणच्या विणकरांनी बनवलेली पठणी मिळेल’ अशा पाटय़ा आपण जागोजागी पाहतो. पण ‘कोल्हापुरी’ मिसळ, ‘नागपुरी’ संत्री, ‘कांचीपुरम’ साडी यातील स्थान दाखविणारे जे शब्द आहेत तेसुद्धा एक प्रकारची बौद्धिक संपदा आहे हे आपल्याला माहिती असते का?
या संपदेचे नाव आहे ‘भौगोलिक निर्देशांक’ किंवा ‘kgeographical indicatorsl (GI किंवा जीआय). मुळात वस्तूंमागच्या या स्थानांचा समावेश बौद्धिक संपदांमध्ये करावा की कल्पना पुढे आली निरनिराळ्या ठिकाणी तयार होणाऱ्या मद्याच्या प्रकारांपासून. उदा. वाइन कुठल्या द्राक्षांपासून बनवायची, ती बनवताना कुठले पाणी वापरायचे, त्या पाण्याची चव कशी, ती कुठल्या लाकडाच्या बुधल्यांमध्ये आंबवायला ठेवायची, किती मुरवायची असे एक ना अनेक घटक आहेत जे त्या वाइनची चव ठरवतात आणि हे सगळे घटक वेगवेगळ्या भौगोलिक भागांप्रमाणे बदलतात. उदाहरणार्थ स्कॉटलंडमध्ये बनविले जाणारे मद्य हे ‘स्कॉच’ या नावाने जगप्रसिद्ध आहे. आणि म्हणून जर ते ‘स्कॉच’ म्हणून विकले जाणार असेल तर ते सर्वोत्कृष्ट असणार असा ग्राहकाचा समज होतो. कारण त्याच्या दर्जाला जबाबदार आहेत स्कॉटलंडमधली हवा, तिथले पाणी, तिथल्या द्राक्षांची विशिष्ट चव आणि बनविणाऱ्या कारागिरांचे कौशल्य. म्हणून स्कॉटलंडशिवाय इतर कुठे बनलेले मद्य जर कुणी ‘स्कॉच’ म्हणून विकू लागले तर ती ग्राहकांचीही दिशाभूल होईल आणि स्कॉटलंडमधल्या स्कॉच बनविणाऱ्या कंपन्यांचीसुद्धा. आणि यातूनच वस्तूंचा भौगोलिक उगम सांगणाऱ्या या नावास ‘भौगोलिक निर्देशांक’ म्हणून संरक्षण मिळावे आणि त्यांचाही समावेश बौद्धिक संपदांमध्ये व्हावा हा विचार पुढे आला. सुरुवात खरे तर झाली मद्य आणि मद्यार्कासाठी. मग फ्रान्समधली ‘कोनीआक’, मेक्सिकोची ‘तकीला’, रशियन व्होडका अशी सगळी मद्ये भौगोलिक निर्देशांक देऊन संरक्षित करण्यात आली.
त्यानंतर युरोपमधल्या देशांना इतर खाद्यपदार्थासाठीही जीआय घेणे जरुरीचे वाटू लागले. यातील सर्वात महत्त्वाचे उदाहरण होते फ्रान्समधल्या रॉकफोर्ट या जगप्रसिद्ध ब्लू चीजचे. फ्रान्समधल्या रॉकफोर्ट सुर सुजलोन या भागात हे चीज मेंढीच्या दुधापासून बनवले जाते. आणि या भागातल्या विशिष्ट गुहांमध्ये मग हे चीज आंबवायला ठेवतात. इथल्या मातीत ‘पेनिसिलियम रॉकफोर्ट’ नावाचा एक जिवाणू सापडतो, जो या चीजला आंबवतो. आणि त्यामुळे या चीजला त्याचा विशिष्ट स्वाद प्राप्त होतो. म्हणून जे चीज रॉकफोर्टमधल्या अशा गुहांमध्ये आंबवले गेले असेल तेच फक्त रॉकफोर्ट चीज म्हणून बाजारात विकले जावे, अशी गरज रॉकफोर्टमधल्या चीज उत्पादकांना वाटू लागली आणि ‘रॉकफोर्ट चीज’ हा फ्रान्सचा पहिला जीआय बनला.
म्हणजे थोडक्यात कुठल्याही वस्तूला जीआय टॅग मिळण्यासाठी दोन महत्त्वाचे निकष असतात. एक म्हणजे ती वस्तू एका विशिष्ट भौगोलिक भागात एका विशिष्ट पद्धतीने बनविली गेली असली पाहिजे आणि दुसरे म्हणजे त्या वस्तूचा विशिष्ट दर्जा किंवा गुण हा ती त्या भागात बनल्यामुळे असला पाहिजे. तर आणि तरच त्या वस्तूला जीआय टॅग दिला जातो. आणि जीआय हीसुद्धा एक बौद्धिक संपदा आहे.
अर्थात एखाद्या वस्तूला जेव्हा जीआय टॅग मिळतो तेव्हा ती बनविण्याची पद्धत किंवा प्रक्रिया संरक्षित होत नाही. तर ती बाजारात त्या नावाने विकली जाणे एवढेच फक्त संरक्षित होते. म्हणजे कांजीवरम साडी हा जर जीआय टॅग असेल तर कांजीवरममध्ये ज्या पद्धतीने या साडय़ा विणल्या जातात तशा त्या पुण्यात किंवा नाशिकमध्येही विणता येतातच. ते अजिबात थांबवता येत नाही. मात्र पुण्यात अशा प्रकारे बनलेली साडी बाजारात ‘कांजीवरम साडी’ म्हणून विकता मात्र येत नाही. थोडक्यात, जे काम ट्रेडमार्कचे आहे तशाच प्रकारचे काहीसे काम जीआय टॅगचे आहे.
पण मग ट्रेडमार्क आणि जीआयमध्ये फरक कोणता? तर ट्रेडमार्क हा एक विशिष्ट उत्पादन बनविणाऱ्या उत्पादकाच्या मालकाचा असतो. जीआयवर मात्र कुणा एकाची मालकी नसते, तर त्या भागातले सर्व उत्पादक तो टॅग वापरू शकतात. आणि त्या त्या भागातील अशा उत्पादकांच्या सहकारी संस्थेच्या मालकीचा हा जीआय असतो. उदाहरणार्थ, सोबतच्या चित्रात आयरिश व्हिस्की हा जीआय आहे. आणि तो आर्यलडमधल्या सर्व व्हिस्की उत्पादकांच्या मालकीचा असेल. तर बुश्मिल्स ब्लॅकबुश हा मात्र ट्रेडमार्क असेल आणि तो मात्र एका विशिष्ट उत्पादकाच्या मालकीचा असेल. म्हणजे थोडक्यात एका उत्पादनावर ट्रेडमार्क आणि जीआय हे दोन्ही एकाच वेळी असू शकतील.
परंतु एखादी वस्तू जरी एका विशिष्ट भागात बनत असली तरी जर तिथे बनल्यामुळे तिच्यात असे कुठलेच विशिष्ट गुणधर्म येत नसतील तर मात्र ती जीआय देण्यास लायक ठरत नाही. उदा. रिलायन्स इंडस्ट्रीने ‘जामनगर’ हा जीआय त्यांच्या जामनगर येथे बनणाऱ्या पेट्रोकेमिकल्ससाठी नोंदणीकृत करण्याचा प्रयत्न केला. जरी ही उत्पादने जामनगरमध्ये बनलेली होती तरी त्यांच्यामध्ये असा कुठलाही गुणधर्म नव्हता, ज्यामुळे ती इतर उत्पादनांपेक्षा वेगळी ठरतील. म्हणजे भौगोलिक निर्देशांक देण्यासाठी असलेला पहिला निकष पूर्ण करीत असली तरी ती दुसऱ्या निकषावर बाद होत होती. आणि म्हणूनच हा जीआय देता आला नाही.
भौगोलिक निर्देशांकाच्या बाबतीत आज भारताची परिस्थिती काय आहे, त्याबाबत पुरेशी जनजागृती झाली आहे का हे पाहू यापुढच्या लेखात. पण तोपर्यंत ‘नावात काय आहे,’ या प्रश्नाइतकाच ‘गावात काय आहे,’ हा प्रश्नही महत्त्वाचा आहे हे मात्र लक्षात असू द्या.
*लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.