11 December 2019

News Flash

अफाट बफेट

जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता? साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर अमेरिकेचं नाव येतं. अमेरिकेचं अर्थकारण, तेथील श्रीमंत घराणी, उद्योगपती आणि त्यांची

| December 28, 2013 12:39 pm

जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता? साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर अमेरिकेचं नाव येतं. अमेरिकेचं अर्थकारण, तेथील श्रीमंत घराणी, उद्योगपती आणि त्यांची औद्योगिक धोरणं, त्याचा जगावर होणारा परिणाम आदींबाबत जगभरातील मंडळींमध्ये नेहमीच उत्सुकता दिसून येते. अमेरिकेच्या या ‘महासत्ता’पणाला हातभार लावण्याचं काम अनेकांनी केलं. त्यातीलच एक नाव म्हणजे वॉरेन बफेट.
गुंतवणूक क्षेत्रातील जगातील सर्वात मोठंच नाही तर धनवान मंडळींच्या मांदियाळीतीलही अग्रेसर नाव. सामान्य नागरिकापासून राष्ट्राध्यक्षांपर्यंत सर्वावर आपली छाप पाडणाऱ्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या, वॉरेन बफेट यांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेणारी अनेक पुस्तकं गेल्या तीन दशकांत प्रसिद्ध झाली. केवळ बफेट या नावाच्या असण्यानंच अनेक पुस्तकांचा खप वाढला. आता याच पुस्तकांच्या रांगेत आणखी एक पुस्तक विसावलं आहे, ते म्हणजे ‘टॅप डान्सिंग टू वर्क.’
फॉच्र्युन प्रकाशनाच्या वरिष्ठ संपादिका कॅरल जे लुमिस यांनी या पुस्तकाचं संकलन केलं आहे. संकलन अशा अर्थी की लूमिस या पुस्तकात बफेट यांचं चरित्र लिहिण्याच्या फंदात पडलेल्या नाहीत. यामागे एक कारण असून लूमिस त्याचं स्पष्टीकरणही देतात. त्या म्हणतात, ‘ज्याचं आत्मचरित्र लिहायचं आहे, त्याचा लेखक जर चांगला मित्र असेल तर तो त्या व्यक्तीचं चांगलं आत्मचरित्र लिहीलच असं नाही.’ लूमिस यांचे गेली चाळीस र्वष बफेट आणि त्यांच्या पत्नीशी अतिशय घरोब्याचे संबंध आहेत. त्या बफेट यांच्या बर्कशायर हाथवे या कंपनीच्या भागधारकच नाहीत तर त्यांच्या कंपनीचं वार्षकि पत्र तयार करण्याची जबाबदारीही समर्थपणे सांभाळतात. याशिवाय ब्रिज खेळातील बफेट यांच्या त्या सहकारीदेखील आहेत. त्यामुळे बफेट यांच्याविषयी लिहिताना आपण त्यांच्या फार प्रेमात पडणार नाही, याची त्यांनी चांगल्या प्रकारे काळजी घेतली आहे. ‘फॉच्र्युन’ मासिकात बफेट यांच्याविषयी अनेक लेख लिहिले गेले, त्या लेखांच्या मदतीनंच लूमिस यांनी बफेट यांच्या जीवनाचा पट उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बफेट यांच्याबरोबरचा अनेक दशकांचा सहवास आणि त्यांना जवळून अनुभवण्याची मिळालेली संधी या गोष्टींचा फायदा उठवत लेखिकेनं अनेक मुद्दय़ांवर प्रकाश टाकला आहे. परिणामी बफेट यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक असलेल्या वाचकांनाही नव्या गोष्टी सांगत त्यांना निराश केलं नाही.
या पुस्तकासाठी लूमिस यांनी केवळ स्वत:चेच लेख वापरलेले नाहीत तर बफेट यांची भाषणं, भागधारकांची पत्रं, अनेक मुलाखतींमधून बफेट यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. लूमिस यांच्याशिवाय मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स, ली स्मिथ, अँड्रय़ू टोबियास, अँडी सव्‍‌र्हर अशा अनेक लेखकांच्या आणि स्वत: वॉरेन बफेट यांच्या ९०पेक्षा अधिक छोटय़ा-मोठय़ा लेखांच्या माध्यमातून बफेट यांचा उद्योजकीय प्रवास या पुस्तकातून मांडला आहे.
बफेट स्वत:च म्हणतात, ‘जेव्हा तुम्ही बर्कशायर हाथवेकडे पाहाल तेव्हा तुम्हाला कॉर्पोरेट अमेरिकेचा अनुभव येईल.’ आणि ते या पुस्तकातून दाखवण्याचा प्रयत्न लूमिस यांनीही केला आहे. पुस्तकातील लेख हे कालानुरूप आहेत. त्यामुळे अमेरिकेतील अर्थव्यवस्था, गुंतवणुकीचा गुंता आणि बफेट यांचं त्या काळातील चित्रणही उलगडत जातं. १९८८ सालच्या ‘दी इनसाइड स्टोरी ऑफ वॉरेन बफेट’ या लेखातून लूमिस यांनी मोजक्या शब्दांत बफेट आणि त्यांच्या व्यावसायिक तत्त्वज्ञानाचा आढावा मांडला आहे, तर १९७७च्या दशकातील ‘दी विस्डम ऑफ सोलोमन’ या पुस्तकातून बफेट यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठं संकट आणि त्याचा बफेट यांच्यावर झालेला परिणाम उद्धृत केला आहे. गेल्या दशकात अमेरिकेला मंदीचा फटका बसला. त्या वेळी उद्योगाला सावरण्यासाठी बफेट यांनी आयात-निर्यातीच्या धोरणांमध्ये बदल करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. निर्यातदारांना आयात प्रमाणपत्र देण्याची भूमिका विशद केली होती. मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. तरीही अमेरिकेला मंदीतून बाहेर काढण्याच्या आपल्या सूत्राबाबत ते आशावादी होते, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवायचं. लूमिस यांनी अशा लेखांमधून गेल्या चार दशकांत अमेरिकेच्या व्यापारावर प्रभाव टाकणाऱ्या बफेट यांचा व्यापारी प्रवास आणि त्यांचं यश दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
बफेट यांचं व्यावसायिक विश्व उलगडून दाखवताना त्यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी तसंच त्यांच्या दातृत्वाचा झराही उलगडून दाखवला आहे. बफेट यांनी आपल्या संपत्तीमधील अध्र्याहून अधिक भाग सामाजिक कामासाठी दान करून समाजाप्रती असलेली बांधीलकीही जपली. बफेट आणि बिल गेट्स या महारथींच्या मत्रीचा पटही लूमिस यांनी उलगडला आहे. खुद्द गेट्स यांनी बफेट यांच्याबाबत लिहिताना चीनमध्ये घालवलेली सुट्टी आणि बफेट यांचे विनोद यामुळे त्यांच्यातील एका वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळखही झाल्याचं म्हटलं आहे. एखाद्या व्यवसायाकडे खडतर आव्हानं बाजूला सारत वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची त्यांची अजब वृत्तीही आपल्याला भावल्याचं गेट्स यांनी आवर्जून नमूद केलं आहे. एका बलाढय़ व्यक्तिमत्त्वाकडून दुसऱ्या मातब्बराला मिळालेली ही दाद बफेट यांच्या कार्याची प्रचीती देते.
टॅप डान्सिंग टू वर्क- वॉरेन बफेट : कॅरॉल जे लूमिस,
प्रकाशक : पेंग्विन, लंडन,
पाने : ३४५, किंमत : २० डॉलर्स.
हे वॉरेन बफेट यांचं चरित्र नाही तर त्यांचा कार्यनामा आहे, उद्योगातला आणि सामाजिक कामांतलाही.

First Published on December 28, 2013 12:39 pm

Web Title: gigantic warren buffett
Just Now!
X