दसरा संपला की मनामनाबरोबरच वातावरणालाही दिवाळीचे वेध लागतात आणि घरादारापासून बाजारपेठांपर्यंत सारे काही सजू लागते. सारे काही नवे नवे, टवटवीत भासू लागते आणि घराबाहेर पणत्यांच्या रांगा लखलखू लागल्या, की तेजाची ती न्यारी दुनिया पाहून त्या प्रसिद्ध जुन्या ओळी ओठावर रेंगाळू लागतात, ‘ही जुनी दिवाळी नव्या दमाने आली, ही नवी टवटवी जुन्या जगाच्या गाली!’ ..या ओळी जन्मल्या, तेव्हाचं जुनं जग कदाचित आपल्यापुरतं, कुटुंबापुरतं, मित्रपरिवारापुरतं, गावापुरतंच लहानसं होतं. समाजातील प्रथा, परंपरांना प्रतिष्ठा देण्यासाठी कधीकाळी जेव्हा दिवाळीचा सण सुरू झाला, तेव्हाचं जग तर त्याहीपेक्षा लहानसं होतं, कारण त्या काळी तर, भविष्यात कधी आपल्याला अवघं जग एका मुठीत सामावून घेणं शक्य होईल, याची कल्पनादेखील जन्माला आलेली नव्हती. पुढे माहितीतल्या जगाच्या कक्षा विस्तारू लागल्या आणि खऱ्या जगाच्या कक्षांची जाणीव होऊ लागली, तेव्हा आपोआपच, नव्या दमाने दाखल होणाऱ्या जुन्या दिवाळीची टवटवी जुन्या जगाबरोबरच नव्या जगाच्या गालावरही उमटू लागली आणि दिवाळी हा फक्त आपल्यापुरता, कुटुंबापुरता, मित्रपरिवारापुरता आणि गावापुरता सण उरला नाही. वर्षांनुवर्षे पारंपरिक पद्धतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या दीपोत्सवाचा अर्थ केवळ प्रथा- परंपरांपुरता सीमित राहिला नाही, कारण दिवाळीने सणाच्या पलीकडे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यात स्थान मिळविले आणि बघता बघता आपली दिवाळी हा जागतिक उत्साहाचा एक उत्सव होऊन गेला.  आता दिवाळीचे दिवस सुरू झाले, की जगभरातील जुन्या-नव्या बाजारपेठांच्या गालावर नवी टवटवी उमलू लागते आणि साऱ्या बाजाराचे लक्ष या दीपोत्सवावर केंद्रित होते. जगभरात कोठेही तयार होणाऱ्या, इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून हस्तकलापर्यंत जे जे काही उत्तम उत्पादन असेल, ते ते भारताच्या बाजारात दाखल होण्यासाठी जणू उतावीळ होते आणि जुन्या भारतीय बाजारपेठांच्या गालावरही नवी टवटवी उमलते. बदलत्या जगाच्या या नव्या उत्साहाला पारंपरिक दिवाळीनेही नव्या दमाने स्वीकारले आणि जागतिकीकरणाने दिवाळीलाही नवी झळाळी आली. केवळ सणाच्या चौकटीत बसून न राहता, दिवाळीचा उत्सव चहूअंगांनी बहरू लागला. या बहराला सांस्कृतिकतेची सजावट लाभली, तसेच राजकारणाचे रंगदेखील या सणावर चढू लागले. म्हणूनच, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे व्हाइट हाऊसदेखील दिवाळीच्या पहिल्या पहाटे पणत्यांनी उजळून जाऊ लागले. केवळ दिव्यांची रोषणाई छान दिसते म्हणून तेलाच्या पणत्या तेवविण्याइतके व्हाइट हाऊस अव्यवहारी नाही. दिवाळीच्या पहाटेला भारतीय पद्धतीच्या लाडू, करंज्या आणि चकल्यांची मेजवानी आयोजित करण्यामागील राजकीय शहाणपणाचे गमकही एव्हाना साऱ्यांना उमगून गेले आहे. पाच वर्षांपूर्वी, राष्ट्राध्यक्षपदाच्या कोवळ्या दिवसांतच बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांनी मुंबईची झगमगाटी दिवाळी याचि डोळा अनुभवली होती, तेव्हाच या सणाचे अमेरिकीकरण करण्यामागचे व्यावहारिक चातुर्य त्यांच्या मनाला चाटून गेले असेल. गेली पाच वर्षे अमेरिकेत व्हाइट हाऊसमध्ये साजऱ्या होणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने त्या देशातील भारतीयांसोबत संवाद साधला जातो, त्यावरून अमेरिकेतील भारतीयांचे राजकीय स्थानही अधोरेखित होऊ लागले आहे. दिवाळी हा हातात हात घालून विजयाकडे वाटचाल करण्याची उमेद देणारे एक निमित्त आहे, असे बराक ओबामा यांनाही वाटते. अमेरिकेतील भारतीय ही राजकीय पाठबळ देणारी ताकद आहे, हे तर स्पष्टच झाले आहे. म्हणूनच, अमेरिकेतील दिवाळीची झळाळी आणखीनच लखलख होऊन जाते..