अर्थव्यवस्थेचा संबंध धार्मिक भावनांशी जोडणे गैर असले, तरी स्वत:ला ‘इसिस’ (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया) म्हणविणाऱ्या कट्टर संघटनेने इस्लामी विश्वाला जागतिक अर्थव्यवस्थेच्या सैतानी सापळ्यातून सोडविण्यासाठी ईश्वराच्या नावाने स्वतंत्र चलनव्यवस्था अमलात आणणार, अशी घोषणा तीन आठवडय़ांपूर्वी केली. तो चर्चेचा विषय ठरला, पण ‘इसिस’च्या या चलनाला जगभर कोठेही विनिमयमूल्यच नसल्यामुळे हा विषय तेथेच संपला. अर्थव्यवस्था आणि धार्मिक श्रद्धांची अशी सांगड घालण्याचा अशा प्रकारचा अट्टहास प्रगत जगात हास्यास्पदच म्हणावा लागेल. इसिसच्या या निर्णयाशी तुलना करणे योग्य नाही, पण भारतातील चलनव्यवस्थेत अलीकडे सुरू असलेल्या ‘मुहूर्तवादा’ची मात्र या निमित्ताने आठवण होणे अपरिहार्य आहे. येत्या काही वर्षांत महासत्तांच्या रांगेत बसण्याची तयारी सुरू झाल्याचा डांगोरा एका बाजूला सुरू असताना, दुसरीकडे अस्मितेच्या राजकारणालाही नवनवे धुमारे फुटताना दिसतात. इतिहास आणि पुराणातील वांगी हाच जणू उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीचा एकमेव आधार असल्याची खात्री पटावी, अशा रीतीने पुराणातील वाग्यांचे पुनरुज्जीवनही सुरू झालेले दिसते. त्यातच, गेल्या काही वर्षांत चलनव्यवस्थेच्या व्यवहारातील नाण्यांनाही भावनांचा आणि श्रद्धेचा मुलामा देऊन त्यांना बाजारमूल्याहूनही मौल्यवान बनविण्याचे प्रयोग संपुआ सरकारच्याही कारकिर्दीत फोफावले होते. सणासुदीचे निमित्त साधून संबंधित देवतांच्या प्रतिमा असलेली नाणी तयार करण्याचा सपाटाच गेल्या काही वर्षांत लागल्याने, चलनव्यवस्थेलाही श्रद्धा आणि भावनांचे बळ मिळाल्याचे दिसू लागले होते. मध्यंतरी वैष्णोदेवीच्या प्रतिमा असलेली पाच व दहा रुपयांची सोनेरी नाणी चलनात अचानकपणे उतरली आणि अनेक अंगांनी धार्मिक भावनाही उफाळून आल्या. हिंदूंचे अपार श्रद्धास्थान असलेल्या या दैवताच्या प्रतिमेमुळेच हे नाणे काही वस्त्यांमध्ये मात्र चलनबाह्य़ ठरल्याच्या तक्रारी वाढू लागल्या. दुसरीकडे, लक्ष्मीचे रूप असलेल्या या देवतेची प्रतिमा असलेले नाणे साठविण्याकडे आणि पूजाघरात ठेवण्याकडेही कल वाढू लागला. गेल्या वर्षी मार्चमध्येच या नाण्याच्या छपाईस सर्वोच्च न्यायालयानेच आक्षेप घेतला होता. निधर्मी राष्ट्र असलेल्या देशात धार्मिक चिन्हांकित नाणे चलनात कसे राहू शकते, असा सवाल न्यायालयाने सरकारला केला होता. नाण्यांच्या छपाईबाबत संबंधित कायद्यामध्ये योग्य सुधारणा करून ठोस धोरण आखण्याची मागणी त्या वेळी न्यायालयात एका याचिकेद्वारे करण्यात आली होती. धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने देवतांचे मुखवटे असलेली नाणी छापणे हा प्रकार चलनव्यवस्थेला फारसा पोषक नाही, उलट अशा नाण्यांचे चलनवलन मंदावते, असा अनुभव या नाण्याने दिल्यानंतर आता अखेर न्यायालयानेच अशा नाण्यांच्या छपाईला लगाम घातला आहे. देवदेवता किंवा धार्मिक नेत्यांच्या प्रतिमा असलेली नाणी छापणे हा प्रकार घटनाबाह्य़ असल्याने त्यावर बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेस अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने न्याय दिला आहे. अशा नाण्यांची छपाई तातडीने बंद करावी, असा आदेशच न्यायालयाने दिला आहे. एका अभ्यासानुसार, चलनात सर्वाधिक वापर असलेल्या एखाद्या कागदी नोटेचे आयुर्मान जेमतेम वर्षभरापुरते असते. याउलट, नाणे मात्र वर्षांनुवर्षे चलनात वापरले जाऊ शकते. नाण्याच्या चलनी मूल्यापेक्षा त्याचे भावनिक मूल्य अधिक असेल तर मात्र अशा नाण्यांचे चलनवलन मंदावते आणि ती नाणी साठविण्याचा कल वाढतो व नाणेटंचाईचा धोकाही संभवतो. नाणे हे ‘गिफ्ट आर्टिकल’ नव्हे, तर चलनव्यवस्थेचे अंग आहे, हे लक्षात घेतलेच पाहिजे.