01 October 2020

News Flash

इंग्रजी शाळा बंद करणेच योग्य

‘इंग्रजी शाळा बंदच कराव्यात!’ हे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे मत (२९ नोव्हें.) अत्यंत सयुक्तिक आहे.

| December 1, 2014 02:44 am

‘इंग्रजी शाळा बंदच कराव्यात!’ हे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे मत (२९ नोव्हें.) अत्यंत सयुक्तिक आहे. इंग्रजी शाळांना सरकारने थारा देऊन त्यांना अनुदान आणि इतर सुविधांचा चारा खिलवल्यामुळेच भारत देशाचे खरे सौंदर्य दिसेनासे होऊन देशातील शिक्षणाची दुरवस्था झालेली आहे.
इंग्रजी माध्यम डोळ्यांपुढे ठेवून परीक्षांचा आखीवरेखीव साचा (पेपर पॅटर्न) तयार केला जातो, ज्या साच्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांमधून यंत्रमय, आक्रमक, िहसक समाज निर्माण होत आहे. याकडे डोळेझाक करून संस्थाचालक, सरकारी अधिकारी व शिक्षणातील इतर सर्व घटक मात्र बेजबाबदारपणे,  शिक्षणाचा रथ हाकत आहेत. परिणामी, विद्यार्थी हे केवळ परीक्षार्थी झाले आहेत; प्रेमभाव, बंधुभाव, सहृदयता नष्ट होऊन शाळा-शाळांतून महत्त्वाकांक्षी स्पर्धकांचा गळेघोटू समाज निर्माण होत आहे; हे देशातील साहित्य, संस्कृती पूर्णपणे लयाला गेल्याचे लक्षण आहे.
भारतातील इंग्रजी शाळा बंद करून जर मातृभाषेतूनच शिक्षण सुरू केले, तर परीक्षाभिमुख शिक्षणाला फाटा देऊन विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडविणे शक्य होईल. यांतून सुसंस्कृत, नीतिमान, सुजाण नागरिक तयार होतील. ते चिरकाल टिकून राहण्यासाठी भारतीय भाषांमधून शिक्षण घडणे महत्त्वाचे आहे. आता तातडीचा उपाय म्हणजे, देशातील सर्व शाळांचे इंग्रजी माध्यम बंद करून मातृभाषेतून शिक्षण सुरू करणे.

दुतोंडी नेमाडपंथी
भालचंद्र नेमाडे हे अत्यंत भोंदू गृहस्थ आहेत. एके काळी ज्या लेखकांवर त्यांनी टीका केली त्यांच्याच नावाची भक्कम बक्षिसे घेताना त्यांना काहीही संकोच वाटला नाही हे वास्तव आहे. आता तर त्यांनी कमाल केली आहे. ज्या इंग्रजी भाषेचे त्यांनी भारतात आणि इंग्लंडमध्ये अध्यापन केले तीच इंग्रजी यापुढे शिकवू नये, असला शहाजोग सल्ला नेमाडे देत आहेत. प्रसिद्धीत राहायचे तंत्र नेमाडे यांनी आत्मसात केले आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. मराठीसाठी खिशातला एक पसाही खर्च करायचा नाही आणि मातृभाषेवरच दुगाण्या झाडायच्या, हीच मराठीची सेवा असल्या दुतोंडी मंडळींकडून अपेक्षित आहे. नेमाडे आणि कंपूला अनुल्लेखाने मारणे, हीच भूमिका परिणामकारक ठरणार आहे.
– दिलीप चावरे, अंधेरी, मुंबई  

चेतन कौतुकास पात्र
चेतन भगतच्या साहित्यावरील लेख (बुकमार्क, २९ नोव्हें.) वाचले. भारतातसुद्धा लेखनकला ही उपजीविकेचे साधन ठरू शकते हे सिद्ध करण्यात त्याला यश आले आहे. आजच्या तरुणाईला त्यांच्याच भाषेत साद घालून वाचनाची गोडी लावणाऱ्या या लेखकाचे यश मान्य केलेच पाहिजे. त्याने आपल्या प्रत्येक कादंबरीचे कथानक चित्रपटाचे माध्यम डोळ्यांसमोर ठेवूनच बेतलेले आहे. चेतन भगतचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कित्येकांनी आपल्या कॉर्पोरेट जगतातील गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांना रामराम ठोकून लेखक बनण्याचे स्वप्न साकार केले आहे. या परिवर्तनाचे श्रेय निर्वविादपणे त्याच्याकडे जाते आणि म्हणून तो कौतुकास पात्र आहे.
– केतन र. मेहेर, विरार (पूर्व)

समाज आता कसा वागतो याचा आत्मविश्वास असणे गरजेचे
‘सांस्कृतिक राष्ट्रवादाची दुधारी तलवार’ हा मििलद मुरुगकर यांचा लेख (लोकसत्ता, २८ नोव्हेंबर) विचारांना चालना देणारा आहे.
आपले पूर्वज फारच महान होते, ही श्रद्धा आणि आता आपले ज्ञान तोकडे आहे याची खंत यामधील हा संघर्ष आहे. आपली अस्मिता जपण्यासाठी पूर्वजांचे कर्तृत्व हाच एकमेव आधार आज घ्यावासा भासणे हीच समस्या आहे. भारतात पूर्वी काही काळी काही क्षेत्रांत तत्कालीन इतर जगाच्या तुलनेत प्रगती झाली हे वादातीत आहे; परंतु पूर्वजांना आजच्या जगाच्या तुलनेतही जास्त ज्ञान होते असे मांडण्याचा अट्टहास चुकीचा आहे. तसेच जुन्या कथांमधील वर्णने आणि आधुनिक व्यवहार यात साधम्र्य दाखविता / भासविता आले म्हणून दोन्हीही एकच आहेत असे म्हणता येत नाही. अरेबियन नाइट्स, फेअरी टेल्स, पंचतंत्र किंवा इसापनीती यातही अनेक वर्णने असतात, त्यातील काही वर्णने आजच्या व्यवहाराशी जुळतात म्हणून आज होणारे व्यवहार त्या लेखकांनी प्रत्यक्ष पाहिले होते असे म्हणता येत नाही.
अगदी ‘शून्या’चा शोध भारतात लागला असला तरीही प्रत्येक आकडय़ात त्याच्या किमतीएवढे (लघु किंवा काट) कोन सामावलेले आहेत अशी आकडय़ांची आंतरराष्ट्रीय संकेतांना जी वैचारिक बठक आहे, तशी देवनागरी आकडय़ांत दिसत नाही.
‘गणपती ही विद्य्ोची देवता’ यावर विश्वास ठेवावा अशा गणपतीच्या नावे अचाट बुद्धिक्षमतेच्या काही कथा मला सर्वसाधारण वाचनात दिसल्या नाहीत. आईभोवती तीन प्रदक्षिणा घालणे यावरून तेनालीराम किंवा बिरबलासारख्या करामती जरूर सांगितल्या जातात. महाभारत उतरवून घेणे हे शॉर्ट-हॅन्डमधील फक्त कौशल्य झाले. माझा समाज पूर्वी कसा होता, हे महत्त्वाचे नाही. माझा समाज आता कसा वागतो / वागणार आहे याचा आत्मविश्वास असणे गरजेचे आहे.
– राजीव जोशी, नेरळ
 
असे गुन्हे अजामीनपात्र ठरवावेत
‘भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकावर अपहरणाचा गुन्हा दाखल’ ही बातमी (लोकसत्ता, २९ नोव्हें.) वाचली. रिक्षावाल्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होण्यास तेच कसे कारणीभूत आहेत हे  त्यातून सिद्ध झाले .  रिक्षा व्यवसाय  ज्यांना जना-मनाची सोडाच, पण पोलिसांचीही भीती राहिलेली नाही अशा बदनाम लोकांच्या हातात गेला आहे की काय अशी साधार भीती वाटते !   
ज्यांनी वाहतुकीवर आणि अशा उद्दाम वाहनचालकांवर नियंत्रण ठेवायचे ते आरटीओ खाते बदनाम आहे. अशा गुंड रिक्षाचालकांवर त्यांचा काही अंकुश राहिलेला नाही. चार महिन्यांपूर्वी  ठाण्यात अशीच एक घटना एका  मुलीच्या जिवावर बेतली होती, पण सुदैवाने ती मुलगी बचावली. तेव्हा ठाण्याच्या  रिक्षा युनियनच्या नेत्यांनी वृत्तवाहिन्यांवर आम्हाला याचे किती  दु:ख झाले आहे हे अगदी कसलेल्या अभिनेत्यालाही लाजवतील अशा नाटकी आविर्भावात सांगितले होते. आज ठाण्यात रिक्षाचालकांची कशी मग्रुरी चालते ते वेगळे सांगायला नको. असो.
कुर्ला येथील या रिक्षावाल्याला पोलिसांनी पकडले, पण न्यायालयाने  त्याला जामिनावर सोडले. हे असे गुन्हे अजामीनपात्र ठरवावेत आणि अशा रिक्षावाल्यांना  कारावासाची शिक्षा करावी. म्हणजे असली गर कृत्ये करण्यास कुणी पुढे धजावणार नाही.
 – अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण

राज्यात सरकार बदलले, हे दाखवून द्या!
रासायनिक विषबाधेमुळे उल्हासनगर येथे १२५ लोक अत्यवस्थ झाल्याची बातमी (३० नोव्हेंबर) वाचली. वापी येथील कारखाने त्यांचा रासायनिक कचरा उल्हासनगर येथे आणून नदीत ओततात, असेही अन्य एका बातमीत म्हटले आहे. भोपाळमध्ये झालेल्या वायुकांडाची ही छोटी आवृत्ती आहे. भोपाळमध्ये इतके मोठे हत्याकांड घडूनही युनियन कार्बाइड कंपनीचा मालक काँग्रेसच्या राज्यात राजरोसपणे देश सोडून पळून जाऊ शकला होता. अशा प्रसंगांमधून या देशात कायदे हे पाळण्याकरिता नसून ते मोडण्याची परवानगी देऊन त्या बदल्यात काही मोबदला मिळवणे हाच फक्त हेतू असतो, असा समज सर्व समाजात पक्का रुजत जातो.
 लोकलज्जेखातर आता त्या ट्रकचा मालक, चालक अशा छोटय़ा प्याद्यांवर काही तरी थातूरमातूर कारवाई होते, की मुळावर जबरदस्त घाव घालून एक उदाहरण घालून दिले जाते याकडे आता जनतेचे लक्ष असेल. त्वरित सखोल चौकशी करून संबंधित कारखान्याचा मालक, या प्रकारात सामील असलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, स्थानिक पोलीस अधिकारी अशा सर्वावर काही ठोस कारवाई झालेली दिसली, तर आता सरकार बदलले आहे (पार्टी विथ अ डिफरन्स) हे दिसून येईल. नाही तर परत एखाद्या चकचकीत रस्त्यावर नाकावर मास्क आणि हातात झाडू अशा अवस्थेत फोटो काढून घेऊन ‘स्वच्छ भारत अभियान’ साजरे करायला सर्व मोकळे आहेतच!
– प्रसाद दीक्षित, ठाणे  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 2:44 am

Web Title: good to shut english medium school
Next Stories
1 राष्ट्रपुरुषांवरील टीका तरी शालीन भाषेत व्हावी..
2 शेती आणि शेतकरी यांच्या समस्यांचे गांभीर्य ओळखा
3 न्यायालयाने आदेश दिला, पण सीबीआयवर वचक बसला?
Just Now!
X