काही महिन्यांपूर्वी सुप्रसिद्ध समाजसेवक नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्याचा तपास सुरू आहे. तपासातील संथ प्रगतीबद्दल विरोधी पक्ष सरकारवर तोंडसुख घेत आहेत. मुख्यमंत्री, गृहमंत्री व एकूणच महाराष्ट्रातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे युती सरकार हे अकार्यक्षम आहे, असा सर्वाचा आरडाओरडा सुरू आहे. खरे पाहता एखाद्या गुन्ह्य़ाचा शोध किती काळात लागेल हे कुणीच सांगू शकत नाही. एखाद्या गुन्ह्य़ाचा शोध घ्यायला महिनोन् महिने लागू शकतात. कधी कधी अचानकच एखाद्या गुन्ह्य़ाचा शोध घेताना आधी घडलेल्या गुन्ह्य़ाचा शोध लागतो. दाभोलकर हे कुठल्याही सत्तास्थानावर नव्हते. केवळ एक समाजसेवक होते. मात्र दहा वर्षांपूर्वी गुजरातमध्ये राज्याचे गृहमंत्री असलेले हरेन पंडय़ा हे सकाळी फिरायला गेले असताना त्यांची हत्या झाली होती. त्याच्या चौकशीत काय प्रगती झाली आहे हे कळायला मार्ग नाही. मुळात एखाद्या राज्याच्या गृहमंत्र्याचा खून होणे ही गंभीर बाब आहे. राज्याचा गृहमंत्रीच जेथे सुरक्षित नाही तेथील सर्वसामान्य जनता किती सुरक्षित असेल, याची कल्पना करता येऊ शकते. तेही मोदींसारख्या कर्तव्यकठोर व कार्यकुशल मुख्यमंत्री असलेल्या राज्यात ही घटना घडावी हे मोदींना किती भूषणावह आहे, हे मोदी प्रशंसकांनीच ठरवावे. खोटय़ा चकमकी घडवून आणून निरपराध लोकांची हत्या केल्याबद्दल गुजरातमधील मोठमोठे पोलीस अधिकारी गजाआड आहेत. सर्वात जास्त पोलीस अधिकारी तुरुंगात असण्याचा मानसुद्धा गुजरातकडे जातो. याही बाबतीत गुजरात राज्य आघाडीवर आहे व हे सर्व अधिकारी कॉन्स्टेबल किंवा सबइन्स्पेक्टर दर्जाचे नसून उच्चाधिकारी आहेत. तेव्हा ‘नरेंद्र दाभोलकरांची ही हत्या ही दाभोलकर कुटुंबीयांवर ओढवलेली दुर्दैवी घटना’ असे म्हणताना, ते जास्त दुर्दैवी आहेत की पंडय़ा कुटुंबीय हे वाचकांनीच ठरवावे. 

राजेंद्र कडू

..असे न्यायालयाने म्हटले आहे का?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून बडवे उत्पातांची उचलबांगडी झाली, परंतु पूजा करताना रेशमी वस्त्र परिधान करून पुरुषसूक्ताचे पठण करण्याची परंपरा कायम असून ती ‘बेकायदा’ प्रथा त्वरित बंद करावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉक्टर भारत पाटणकर यांनी केल्याची बातमी (२० फेब्रुवारी) आणि त्यावर, ‘विठ्ठलाला कर्मकांडात गुंतविणाऱ्यांना विरोध हवाच’ हे पत्र (२१फेब्रुवारी) वाचले. गेली ४० वष्रे चालत आलेला पुजारी आणि राज्य सरकार यांच्यातील वाद संपविण्यासाठी कायदेशीर तरतूद झाली हे ठीक आहे. परंतु पूजा करताना सोवळे किंवा रेशमी वस्त्र नेसून पुरुषसूक्ताचे पठण करणे हे बेकायदा कसे होते? सर्वोच्च न्यायालयाने तसे म्हटले आहे का? हा कष्टकऱ्यांचा आणि गोरगरिबांचा देव असल्याने त्याला सोवळे किंवा रेशमी वस्त्र न नेसाविता काठी आणि घोंगडे असा गणवेशधारी पोशाख करावा हे कुणी ठरवायचे? 

पण एकदा मंदिर आणि देवाची संकल्पना मान्य केली की पूजाविधीच्या ज्या काही परंपरा असतील त्या पाळायच्या असतात. त्यावेळचे मंत्र म्हणायचे असतात.. षोडषोपचारे पूजा करताना प्रत्येक उपचाराशी निगडित अशा पुरुषसूक्ताच्या १६ ऋचा म्हणण्याचा प्रघातच आहे. – चिदानंद पाठक, पुणे.

महाराष्ट्राचे भाषिक बंध कायम!
महाराष्ट्राच्या विभाजनापुरते बोलायचे झाल्यास हा मुद्दा मराठी माणसाकरिता तरी कायमच भावनिक राहणार आहे. आजचा महाराष्ट्र हा मराठी माणसाने जबरदस्त संघर्ष करून मिळविलेला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात १०५ जणांनी प्राणांचे बलिदान केले, हा इतिहास मराठी जनता कधीच विसरू शकत नाही. महाराष्ट्रात आíथक सत्ता मराठी माणसाकडे कधीच नव्हती, राजकीय सत्ता मराठी माणसांच्या हाती अजून टिकून आहे ती मराठी माणसाच्या एकजुटीमुळे.
विदर्भ, मराठवाडा व कोकण या विभागांवर पश्चिम महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांकडून झालेल्या अन्यायास या विभागांतील नेत्यांचा नाकत्रेपणा तितकाच जबाबदार आहे. महाराष्ट्राची फाळणी हा यावरील उपाय नसून, आपापल्या विभागांतील नेत्यांवर जनमताचा अंकुश ठेवून विभागीय विकास घडवून आणला पाहिजे. आज पश्चिम बंगालची लोकसंख्या ९ कोटींहून अधिक आहे, तर तामिळनाडूची ७ कोटींहून जास्त, पण या राज्यांचे विभाजन करण्याबद्दल कोणी शब्द तरी काढू शकेल का? भाषीय अस्मिता हा या राज्यांतील लोकांप्रमाणे मराठी माणसांकरिता संवेदनशील मुद्दा आहे.
ब्राझीलचा विषय मांडताना काही तरी गफलत झालेली दिसते. ब्राझीलचे आकारमान संपूर्ण दक्षिण अमेरिका खंडाच्या जवळपास निम्म्याइतके आहे आणि उत्तर प्रदेशच्या जवळपास ३५ पट.
डॉ. मंगेश सावंत

देवाला आर्थिक स्तरांत विभागण्याचा उपद्व्याप
‘पंढरपुरात विठ्ठल मंदिरातील पुरुषसूक्त पठण बंद करा’ ही बातमी आणि त्या संदर्भातले संदेश कासार यांचे पत्र वाचले.
प्रथम, श्रमिक मुक्ती दलाच्या मागणीविषयी : विठ्ठलाच्या पूजेप्रसंगी त्याला रेशमी वस्त्रे नेसवून ‘पुरुषसूक्त’ पठण करण्याची परंपरा ‘बेकायदा’ कशी? ‘विठ्ठल हा गोरगरिबांचा व कष्टकऱ्यांचा देव’ असे पाटणकर म्हणतात, पण तो फक्त गरिबांचा/कष्टकऱ्यांचाच देव असल्याचा शोध कधी व कोणाला लागला? तसे असेल तर मध्यम वर्गीय व श्रीमंत/अतिश्रीमंत भक्तांचे देव कोणते? मानव समाजातील हे मानव निर्मित भेदभाव थेट देवापर्यंत नेऊन पोहोचविण्याचा हा उपद्व्याप कशासाठी? मंदिरातील पूजाविधींसाठी नेमणुका करताना त्यात उच्चवर्णीयांची मक्तेदारी नसावी, याबद्दल दुमत नाही. संस्कृत उत्तम येणाऱ्या व पूजाविधींची उत्तम जाणकारी असलेल्या कोणत्याही जातीच्या व्यक्तीची त्यासाठी नेमणूक व्हायला काहीच हरकत नाही. या मागण्या योग्यच आहेत. पण विठ्ठलाला ‘काठी, घोंगडे असा गणवेशधारी’ पोशाख नेसविणे, हे त्याला एका प्रकारच्या मक्तेदारीतून काढून, दुसऱ्या प्रकारच्या मक्तेदारीत लोटण्यासारखे नाही का? अशाने नेमके काय साधणार? मुळात सगुणोपासनेचे / मूर्तिपूजेचे मर्म, जे जे आपल्याला (भक्ताला) चांगले, सुंदर, उत्तम वाटते, आवडते, ते ते ईश्वराला (देवतेच्या मूर्तीला ) मनोभावे अर्पण करणे, हे आहे. आता गरीब जरी झाला, तरी त्याला रेशमी वस्त्रे, अलंकार वगरे आवडतातच ना? की त्याला गरिबीच आवडते? आपल्या इष्टदेवतेला आपल्यासारखे गरिबीचेच उपचार करावेत, असे कोणत्या गरीब भक्ताला वाटेल? सगुण उपासना/मूर्तिपूजा याविषयी पुरेशी माहिती नसल्याने पाटणकरांनी ही मागणी केली असावी असे वाटते.
आता संदेश कासार यांचे पत्र : ‘पुरुषसूक्त’ यामध्ये वर्णिलेल्या ‘पुरुषा’चा कासार यांनी स्त्री-पुरुषभेदाशी संबंध जोडून टाकलेला दिसतो! वास्तविक ‘पुरुषसूक्ता’तला पुरुष ( किंवा विष्णू सहस्रनामातला श्लोक : नमोस्तु अनंताय सहस्र मूर्तये, सहस्र पादाक्षी शिरोरु बाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युग धारिणे नम: यातील ‘पुरुष’, किंवा भगवद्गीतेतील पंधराव्या अध्यायातील ‘पुरुषोत्तम’योगातला पुरुष -) यांमध्ये वर्णिलेला ‘पुरुष’ ही अतीभव्य ईश्वर संकल्पना आहे. जो / जी शक्ती या अखिल विश्वाचे धारण, भरण, पोषण करतो/करते, तो/ते परमात्म तत्त्व किंवा ईश्वरी शक्ती यात वर्णिलेली आहे. तिथे स्त्री/पुरुष िलगभेद नाही. अगदी याच तऱ्हेने दुर्गा सप्तशतीमधल्या ‘देवी’विषयी म्हणता येईल.
‘ईश्वर’ संकल्पना ही कालातीत असल्याने ती एकविसाव्या काय कोणत्याही शतकात/सहस्रकात अगदी तशीच राहणार. या अशा प्रार्थना समाजाला ‘अडकवून ठेवणाऱ्या’ नव्हेत.
श्रीकांत पटवर्धन , कांदिवली मुंबई</p>

हा वास्तुवारसा जपा
पंडिता रमाबाई यांचे नाव माहीत नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात सापडणार नाही. सरोजिनी नायडू यांनी तर त्यांना संतपद बहाल केले. ११ मार्च १८८९ रोजी पंडिता रमाबाईंनी मुंबईत शारदा सदनची उभारणी करून राज्यात स्त्री-उद्धाराची उभारणी केली. पुढे १८९० साली त्यांनी पुणे येथे स्थलांतर केले. १४ सप्टेंबर १८९८ रोजी त्यांनी शारदा सदन कायमचे केडगाव येथे हलविले. आजही तेथे उपेक्षित स्त्रियांचे संगोपन चालू आहे. केडगाव येथे रस्ता रुंद करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे पंडिता रमाबाई यांनी उभारलेले चर्च व सदन धोक्यात आले आहे. ऐतिहासिक वास्तूंची जपवणूक करणे सरकारचे कर्तव्य आहे. तेथल्या अनाथ स्त्रियांना सरकारने संरक्षण द्यावे. धोंडो केशव कर्वे, महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांचे पंडिता रमाबाई स्फूर्तिस्थान होते. याची आठवण सरकारने ठेवावी.
– मार्कुस डाबरे, पापडी, वसई.