अहो, धार्मिक उत्सवांत काडीकरण करणारे भाऊ, अखेर आमच्या दहीहंडी मंडळांनी तुमची आणि तुमच्या पक्षपाती न्यायालयांची चांगली जिरवलीच परवा. मुंबई-ठाणेच नव्हे, तर तमाम विश्वातील गोविंदांनी परवाचा दहीकाला आनंद, उत्साहाचे थरावर थर लावून साजरा केला. वर कुठे कुठे आमच्या गल्लोगल्लीच्या बालकन्हैयांनी झक्कपैकी सलामीही दिली. तुम्ही उघडय़ा डोळ्यांनी त्याचे पेडप्रक्षेपण पाहिले असेल आणि उघडय़ा कानांनी आमचे भावसंगीत ऐकले असेल, तर तुमच्या लक्षात हे सारे आले असेलच. ते मानवी मनोरे, त्या पुढे नाचणारे तारे, त्या नर्तकी, त्यांचे हिंदी गाण्यांवरचे डिस्को, लोकांकडून होत असलेल्या नेतेमंडळींच्या आरत्या आणि ओवाळण्या.. काय धार्मिक लोकोत्सव होता तो सगळा. परंतु तुम्हाला त्यातला आनंद कसा दिसणार? तुमच्या काकदृष्टीला दिसणार तो फक्त उत्सवांतला धांगडधिंगा, पैशांचा खेळ, आयोजक नेत्यांनी चाटून-माखून ओरपलेला राजकीय फायदा. आयोजकांनी लाखालाखाच्या हंडय़ा लावायच्या, त्यांच्या जाहिराती करायच्या, दूरचित्रवाणी वाहिन्यांना त्यांच्या प्रक्षेपणासाठी पैसे मोजायचे, झालेच तर गल्लीबोळातले कार्यकर्ते पोसायचे यासाठी खर्च येत नाही? दहीहंडय़ांवर लागलेला पैसा काय झाडावर लागतो? तो काय नेत्यांनी त्यांच्या खिशातून घालायचा? होय, त्यासाठी वर्गणी काढली जाते. तुम्ही तिला खंडणी म्हणता हा भाग वेगळा. पण तो पैसा फुसडीस तरी पुरतो काय? टीकाकार भाऊ, तो पैसा राजकारणातूनच कमवावा लागतो. या पैशाला तुम्ही काळा म्हणा नाही तर गोरा, पण त्यातूनच आपल्या थोर संस्कृतीतील सणवार आणि उत्सव साजरे केले जातात, हे विसरू नका. आज आपली ही थोर संस्कृती जी काही जिवंत आहे ती या उत्सवाच्या आयोजकांमुळे आणि त्यांच्या पैशामुळेच. त्यांचा जयजयकार करायचा सोडून, अहो प्रदूषण नियंत्रणवाले भाऊ तुम्ही या जनसामान्यांच्या उत्सवाविरुद्ध न्यायालयात जाता. म्हणे दहीहंडी उत्सवात माणसे मरतात, जखमी होतात. या वेळीही तसे झाले. एक गोविंदा गेला, सव्वादोनशेच्या वर जखमी झाले. नाही कोण म्हणतो? पण अहो काळजीवाहू भाऊ, बडे बडे उत्सवों मे असे छोटे छोटे हादसे होतातच. म्हणून तर आर. आर. पाटील यांचे पोलीस हात बांधून गप्प बसले. नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पायदळी तुडविले जात असल्याचे पाहून कोणते पोलीस गप्प बसले असते? ध्वनिप्रदूषणाचे म्हणाल तर त्याचे काय एवढे? सणासमारंभातील ध्वनिप्रदूषणाने आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही, असे ठाण्यातील काही तज्ज्ञ डॉक्टरांनी जाहीरच केले आहे. त्यांनी म्हटले नाही, पण उत्सवातील डीजे, फटाके यांमुळे आमची कर्णेद्रिये साफ झाली असे अहवाल काही मंडळांकडे आल्याची चर्चा आहे. खरे तर उत्सवांतील ध्वनिप्रदूषणाबाबत आवाज उठविणाऱ्यांना देशद्रोहाचेच कलम लावले पाहिजे. त्यांना केवळ हिंदूंच्याच सणांतले ध्वनिप्रदूषण बरे दिसते? मशिदींवरील भोंगे दिसत नाहीत? तेव्हा ध्वनिप्रदूषणावर बोलण्यापूर्वी जाओ, पहले उनकी साइन लेके आओ! अखेर समजा असा त्रास होत असला, तरी तो या उत्सवात सहभागी होणारांनाच होतो ना? त्यांचे तर याबाबत काहीही म्हणणे नाही. गोविंदा नाचला, जितेंद्र नाचला, बिपाशा आली, माधुरी बोलली की ते सगळे खूश असतात. थरावर थर पाहून ते आपला थर विसरतात. त्या बिचाऱ्या आमच्या निम्नमध्यमवर्गीय मतदारांना का तुम्ही या धार्मिक रंजनापासून वंचित ठेवणार? पण तसेही तुमच्या हातात काय आहे? सरकार तर आमचेच असते. आणि न्यायालयाला आम्ही जुमानत नाही, कारण आमच्या मागे (आम्ही म्हणतो तोच) धर्म आहे. तुमच्या मागे कोण आहे? तेव्हा अहो मध्यमवर्गीय भाऊ, तुमचा विवेकाचा आवाज तुमच्यापाशीच ठेवा. त्या आवाजाचे प्रदूषण करू नका!