काही घटना माणसाच्या आयुष्याला अनाकलनीय कलाटणी देऊन जातात. आनंदीबेन पटेल यांचे तसेच काहीसे झाले. अहमदाबादेतील मोनिबा शाळेच्या मुलांची सहल ही एक घटना या कलाटणीला कारणीभूत ठरली. ही घटना १९८७ मधील.. सहलीला आलेली शाळेची सारी मुले नर्मदेच्या काठावरून मजेत चालत होती. अचानक दोन मुलींचा पाय निसटला आणि नर्मदेच्या खळाळत्या प्रवाहात त्या खेचल्या गेल्या. सारी मुले भयाने गोठून गेली. मुलांसोबत शिक्षिका म्हणून आनंदीबेनच होत्या. हा प्रकार त्यांनी पाहिला आणि क्षणाचाही विलंब न लावता आनंदीबेन यांनी नर्मदेच्या त्या प्रवाहात उडी घेतली. त्या दोन मुलींना पकडले आणि त्या बुडणाऱ्या मुलींना सुरक्षितपणे काठावरही आणले. या शौर्याबद्दल आनंदीबेन यांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक मिळाले आणि त्यांच्या धाडसी कृतीने भारावून गेलेल्या एका वरिष्ठ भाजप नेत्याने आनंदीबेन यांना पक्षात येण्याचा आग्रह केला. त्या वेळी आनंदीबेन यांनी तो आग्रह मानला नाही, पण पुढे दुष्काळ निवारण कार्यात झोकून देताना पुन्हा भाजपच्या कार्यकर्त्यांशी संपर्क आला आणि राजकारणातून आपण काही विधायकही करू शकतो, हे त्यांना पटले. आनंदीबेन भाजपमध्ये कार्यरत झाल्या. विरमगाम जिल्ह्य़ातील बर्ड फ्लूच्या साथीत त्यांनी रुग्णसेवेत स्वत:ला अक्षरश: झोकून दिले. त्या वेळी त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा होत्या. आनंदीबेन पटेल यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अशा सेवाभावातून झाली. आज गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होतानाही तोच सेवाभाव त्यांच्या मनात उमटलेला दिसतो. विकास आणि समृद्धीची गुजरातची वाटचाल त्याच जोमाने पुढे सुरू ठेवण्याची ग्वाही त्यांनी भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. कृतिहीन द्रष्टेपण हे केवळ दिवास्वप्न असते आणि द्रष्टेपणविरहित कृती हे संकट असते, या विचारावर आनंदीबेन यांची श्रद्धा आहे. आपली एखादी लहानशी कृतीदेखील एखाद्या आयुष्यात अमाप आनंद फुलवू शकते, त्यामुळे आपण जेथे असू, जे काम करू त्यातून चांगलेच निष्पन्न झाले पाहिजे, असे मानणाऱ्या आनंदीबेन यांच्या ७३ वर्षांच्या आयुष्याचा पटदेखील याच विचाराने सजलेला दिसतो. गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या आनंदीबेन यांनी २००७ पासून मोदी मंत्रिमंडळात महत्त्वाची मंत्रिपदे यशस्वीपणे सांभाळून आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यामुळेच मोदी यांच्या उत्तराधिकारीपदाची जबाबदारी आनंदीबेन यांच्यावर पडली आहे. उत्तम शिक्षिका म्हणून राष्ट्रपती पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळविणाऱ्या आनंदीबेन यांच्या सामाजिक जाणिवांची आणि प्रशासकीय कौशल्याची पावती त्यांना मिळाली आहे. १९६५ मध्ये पती मफतभाई पटेल यांच्यासोबत अहमदाबादेत येऊन विज्ञान शाखेची पदव्युत्तर पदवी संपादन केलेल्या आनंदीबेन यांनी राजकारणात सक्रिय असतानाही तीन दशके विद्यादानाच्या कामात स्वत:ला झोकून दिले होते.  महिला सबलीकरण हेच देशापुढील कोणत्याही समस्येचे एकमेव उत्तर असल्याचे काही नेते मानतात. तरीही, अजूनही महिला सबलीकरण हा केवळ घोषणेपुरताच शब्द उरला आहे. आनंदीबेन यांनी मात्र, महिला विकास गृहाच्या माध्यमातून एकाकी विधवांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याचा वसा घेतला आणि अनेक वर्षे त्याच कार्याशी त्यांचे नाते जडले. दहशतवादाने पोखरलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात १९९२ मध्ये देशाचा तिरंगा फडकावणारी महिला म्हणून गुजरातच्या या शक्तिमान महिलेचा परिचय अवघ्या देशाला झाला. नरेंद्र मोदी यांनी आखून दिलेल्या स्वर्णिम गुजरातच्या विकासाच्या वाटेवर यापुढेही आनंदीबेन यांच्या नेतृत्वाखाली राज्य चालत राहील, या भावनेने गुजरातही आनंदी झाला आहे..