अतीव दु:ख झाले तरी ते सहन करून, जीवनाला चिकटून राहणे हा मानवाचाच नव्हे तर सबंध जीवसृष्टीचा निसर्गधर्मच आहे. त्यासाठी ईश्वरावरील वा गुरूवरील श्रद्धेची माणसाला काहीही गरज नाही आणि आपली बुद्धी गुरूकडे गहाण टाकण्याची तर मुळीच गरज नाही..
आज भारतीय समाजात ढोबळपणे तीन आर्थिक स्तर दिसून येतात. एक गरिबी व दारिद्रय़ाने पिचलेले सामान्य लोक जे अभावग्रस्त जीवन कसेबसे जगत असतात. दुसरे स्वत:चे घर असलेले, तुलनेने खाऊनपिऊन सुखी असलेले मध्यमवर्गीय लोक, ज्यांना मुलांचे संगोपन, शिक्षण इत्यादी अडचणी असू शकतात व तिसरे खूप समृद्ध असलेले श्रीमंत वर्गातील लोक ज्यांना अतिसंपन्नतेमुळे धनदौलत सांभाळण्याच्या व इतर अनेक चिंता असू शकतात. तसे पाहता चिंता व अडचणी सर्वानाच असतात. जगी सर्व सुखी असा कुणी नाही. म्हणजे आर्थिक स्तर चांगला किंवा वाईट कसाही असून, प्रत्येकाच्या जीवनात सामाजिक, सांसारिक, भावनिक, आरोग्यविषयक, संकटविषयक, क्लेश, दु:ख, चिंता, कमी वा जास्त प्रमाणात आज, काल ना उद्या असतातच. त्यामुळे जगात कुठल्याही क्षणी कोटय़वधी लोकांना काही मार्गदर्शन, काही आधार, दिलासा याची गरज असते आणि ही माणसे श्रद्धावंत किंवा अंधश्रद्ध असतील, तर त्यांच्या जीवनातील अडचणी, श्रद्धेच्या किंवा गोडबोलू आध्यात्मिक गुरूच्या सल्ल्याने सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
भक्तांच्या गुरूविषयक श्रद्धा कशा असतात त्याची ही काही उदाहरणे पाहा. (१) आमचे गुरुमहाराज हे पूर्वी होऊन गेलेल्या अमुकतमुक महान संताचे अवतार आहेत किंवा ते साक्षात ईश्वराचे मानवी रूप आहेत. (२) आमच्या गुरुबाबांना आध्यात्मिक सिद्धी प्राप्त आहेत आणि ते निसर्गनियमांविरुद्ध चमत्कार करू शकतात. (३) आमचे गुरुबाबा काही होमहवन, यज्ञविधी वगैरे करून, त्याचा अंगारा वा प्रसाद देऊन, भुतेखेते व ग्रहपीडेचा बंदोबस्त करतात. मोठमोठे असाध्य रोग जे डॉक्टर बरे करू शकत नाहीत तेही ते बरे करतात. (४) आमचे गुरुबाबा जो गंडादोरा देतात तो वैदिक मंत्रांनी सिद्ध केलेला असतो. वेद व त्यातील मंत्र अपौरुषेय असल्यामुळे तो गंडा अतिशय प्रभावी व परिणामकारक असतो. (५) आमचे गुरुबाबा हे सिद्धपुरुष असल्यामुळे ते अंतज्र्ञानाने कुणाचेही मन व भविष्य जाणू शकतात. (६) ज्योतिष हे दैवी शास्त्र असून आमच्या गुरुजींसारखे चांगले ज्योतिषी पत्रिकेच्या आधारे किंवा शिवायच, कुणाचेही भविष्य जाणू शकतात.
प्रत्येक अंधश्रद्ध मनुष्य ‘माझी (गुरूवरील श्रद्धा) ती श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नव्हेच’ असे म्हणत असतो. शिवाय आजकाल ‘अंधश्रद्धा निर्मूलनाला’ काहीशी समाजमान्यता मिळालेली असल्यामुळे, अनेक मोठे सद्गुरूसुद्धा म्हणतात की, तेसुद्धा ‘अंधश्रद्धा निर्मूलन’च करतात. ते ज्या श्रद्धांना सांभाळतात त्या खऱ्या उपयुक्त श्रद्धा असतात. प्रत्यक्षात ते एखादी अंधश्रद्धा निर्मूलन करीत असतीलही, पण त्याबरोबर दुसऱ्या चार अंधश्रद्धा, श्रद्धांच्या नावाने जोपासतात व त्यांच्या भक्तांना श्रद्धांचे लेबल लावलेल्या त्या अंधश्रद्धांच्या नादी लावतात.
अगणित लोकांच्या जीवनातील अगणित अडचणी व चिंता, सर्व श्रद्धांच्या आधारे सोडवायचे म्हटले तर त्याबाबतच्या मार्गदर्शनाचे आध्यात्मिक मायाजाल उभे करू शकणाऱ्या चलाख गुरुबाबांना हे केवढे ‘प्रचंड मार्केट’ उपलब्ध आहे ते पाहा. लाखो माणसांना जीवनात सांत्वन हवे आहे, विश्वास हवा आहे. ही सर्व माणसे गुरुबाबांच्या मार्गदर्शन सेवेची ‘संभाव्य ग्राहक’ आहेत. शिवाय त्या मार्गदर्शनाची किंमत म्हणून रोख रुपये किंवा संपत्ती देऊन, त्यांच्यावर केलेल्या किंवा भासविलेल्या उपकारांची परतफेड करण्याबाबत ते तत्पर आहेत. हे सर्व जण गुरूंचे भक्त, श्रीभक्त बनू शकतात. त्यासाठी गुरूने आपले काही मदतनीस हाताशी बाळगून, स्वत: (न) केलेल्या चमत्कारांची प्रसिद्धी मात्र करावी लागते. भक्तांना खरा-खोटा मानसिक आधार देण्यासाठी लागणारी अंगभूत हुशारी मात्र गुरूकडे असायलाच हवी आणि एकदा गुरूला प्रसिद्धी मिळाली की, मोठमोठे सत्ताधीश, राजकारणी, मंत्रीसुद्धा त्यांच्या काही स्वार्थासाठी, भविष्य जाणण्यासाठी किंवा मुहूर्त काढण्यासाठी गुरूंकडे येतील व काय सांगावे, गुरूला सन्मान आणि सांस्कृतिक राज्य पुरस्कारही मिळवून देतील.
सगळे गुरू आणि ज्योतिषी हे फक्त खेडवळ वा अशिक्षित माणसांना भुलवून त्यांनाच लुबाडतात असे काही नाही. चांगली शहरी व सुशिक्षित माणसेसुद्धा स्वत:च्या श्रद्धाशीलतेमुळे गुरूंच्या व त्यांच्या भक्तांच्या थापांना बळी पडतात. मोठमोठय़ा शहरांमध्ये बस्तान मांडलेल्या, काही स्वघोषित अवतार असलेल्या सद्गुरूंनी तर सुशिक्षित भक्तांच्या जणू फौजाच तयार केलेल्या दिसतात. कित्येक गुरूंनी तर गुन्हेगार गुंडांनाही पोसलेले असते. पोलीस व सरकारी अधिकारीही सद्गुरूंचे भक्त असतात. मात्र सगळ्या प्रकारच्या गुरुबाबांची जातकुळी व काम एकाच प्रकारचे असते. श्रद्धाळू लोकांचे आपापले ‘मार्केट सेगमेंट’ हेरायचे, आपल्याला काही दैवी सामथ्र्य आहे, असे सर्वाना सांगायचे व मग त्यांची यथेच्छ लूट करायची. गुरू जेवढा मोठा आणि प्रसिद्ध तेवढी त्याच्याकडे जास्त धनसंपत्ती जमा झालेली असते. लोकांना ती कधी कळते, कधी कळत नाही.
आजकाल प्रत्येक लहान-मोठय़ा शहरात किंवा आसपासच्या निमशहरी किंवा ग्रामीण भागातही, आपापले आध्यात्मिक दुकान थाटून, भक्तांना बोधामृत पाजून, प्रसिद्धी मिळवून मोठे झालेले सद्गुरू, महाराज, बुवा, बापू इत्यादी गुरुबाबांची मोजणी करायची तर ती डझनाने करावी लागेल, म्हणजे जिकडे तिकडे एवढे गुरुबाबा फोफावलेत. त्यांच्यापैकी कुणी देवांचे, संतांचे अवतार असतात, कुणी चमत्कार करतात वगैरे. यांच्याकडे भक्तांच्या रांगा लागतात व त्यांच्यापैकी अनेक जण कोटय़वधी रुपयांची माया जमा करतात. अगदी टॅक्स फ्री. सारांश सद्गुरू बनणे, गुरुबाबा बनणे हा या देशात चलाख व हुशार माणसासाठी, एक उत्तम ‘बिनभांडवली धंदा’ आहे यात काही संशय नाही. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात जर एवढे गुरुबाबा कार्यरत आहेत व अत्यंत फायदेशीर धंदा करीत आहेत, तर त्यावरून सबंध भारतभर काय परिस्थिती असेल याची कल्पना करता येईल. याबाबत विशेष हे की, असा आध्यात्मिक गुरुबाबा म्हणून धंदा करण्यासाठी तुम्हाला काही मोठे शिक्षण, ज्ञान किंवा स्वच्छ चारित्र्य असण्याचीही आवश्यकता नाही. प्रत्यक्षातले काही गुरुबाबा हे स्वत: गुन्हेगार असतात, घृणास्पद गुन्हे करून, जेलमध्ये शिक्षा भोगून, खडी फोडून आलेले असतात व तरी लोक त्यांचे पाय धरायला जातात, एवढे या देशातील लोक सश्रद्ध व धर्मशील आहेत. आमच्या देशातील अनेक गुरुबाबा तर एवढे हुशार आहेत की, प्रत्यक्षात अनेक गुन्हे करून ते पकडलेही जात नाहीत.
अडचणी आणि चिंता तर सगळ्यांनाच असतात, पण बुद्धी वापरून त्यांच्यावर योग्य उपाय शोधण्याचे कष्ट घेण्याऐवजी, श्रद्धांच्या प्रभावामुळे आपण कुणी गुरुबाबा शोधण्याचा सोपा मार्ग स्वीकारतो; पण तोच गुरू आपल्या श्रद्धा आणखी घट्ट करतो आणि किंवा नव्या श्रद्धा रुजवतो. म्हणजे श्रद्धांमुळे गुरू येतात व गुरूंमुळे श्रद्धा वाढतात असे हे ‘दुष्टचक्र’ आहे. शिवाय एकदा कुठल्याही गुरूच्या नादी लागलेला माणूस (आणि यात भलेभले तथाकथित सुशिक्षितसुद्धा असतात.) बहुधा त्याच्या प्रभावातून कधीही बाहेर पडू शकत नाहीत. त्या दृष्टीने गुरू हे ‘अमली पदार्थाच्या व्यसनांप्रमाणेच’ असतात. एकदा गुरूकडे गेलात, की कायमचे अडकलात समजा. नंतर त्यातून सुटका नाही.याचा परिणाम असा होतो की, लोक शेती, नोकरीधंदा वगैरे करून स्वत:साठी व कुटुंबासाठी कष्टाने मिळविलेला पैसा, गुरू भेटल्यावर त्याच्या पायाशी नेऊन ओतत राहतात. त्याऐवजी लोकांना जर असे कळले की, पूजा, मंत्रतंत्र हे सर्व निरुपयोगी आहेत. कुठल्याही गुरूच्या, देवाच्या अंगारेधुपाऱ्याने आजार बरा होत नाही. ग्रहपीडा, भूतबाधा, बाहेरचे असे काहीही नसते, फलज्योतिष, हस्तसामुद्रिक ही सर्व थोतांडे आहेत. कोणतीही पूजाप्रार्थना, यज्ञ, विधी, व्रतवैकल्ये वगैरे काहीही करणे हे आपल्या सांसारिक अडचणींवर व चिंतांवर खरे उपाय असू शकत नाहीत, तर लोक गुरुरूपी दुष्टचक्रात, व्यसनात अडकायला जाणारच नाहीत. मात्र त्यासाठी आपणा सर्वापाशी असलेला विवेक व तर्कबुद्धी वापरण्याची जरूर आहे.
ईश्वरावरील व गुरूवरील श्रद्धा ही माणसाला ‘स्फूर्ती व शक्तीचा स्रोत’ असते असे श्रद्धावंतांना वाटते. आशावादी माणसाला श्रद्धेमुळे प्रोत्साहन मिळेल हे शक्य असले, तरी दुसऱ्या अनेक माणसांवर त्याचा उलट परिणाम होऊन ते आळशीही बनू शकतील. तसेच श्रद्धावंत माणसाच्या प्रयत्नात काहीसे अपयश येऊ लागले, तर त्याला ‘ते पुढील यश आपल्या नशिबातच नसावे’ किंवा ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ असे काही वाटून तोही अधिकच दैववादी आणि प्रयत्नशून्य बनू शकेल. स्फूर्ती व प्रोत्साहन राहील बाजूला. तसेच ईश्वर, गुरू व ज्योतिषी यांच्यावरील श्रद्धेने लोकांना ‘सांत्वन’ मिळते असे म्हणतात. तेही खरे मानले तरी त्या सांत्वनाची ते केवढी किंमत मोजत असतात ते कुणी लक्षात घेत नाही. स्वत:वर संकट परंपरा कोसळली तरी मनुष्यस्वभाव मुळात एवढा लवचीक असतो की, तो कोणत्याही परिस्थितीशी कसेबसे जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा अतीव दु:ख होते तेव्हासुद्धा ते सहन करून, जीवनाला चिकटून राहणे हा मानवाचाच नव्हे तर सबंध जीवसृष्टीचा निसर्गधर्मच आहे. त्यासाठी ईश्वरावरील वा गुरूवरील श्रद्धेची माणसाला काहीही गरज नाही आणि आपली बुद्धी गुरूकडे गहाण टाकण्याची तर मुळीच गरज नाही.
कुठलाही गुरू आपल्या भक्तांना ‘स्वावलंबी बना’ असे कधी शिकवीत नाही, कारण ते गुरूच्या स्वत:च्या हिताचे नसते. प्रत्यक्षात समाजातील बहुतेक लहानमोठे गुरू समाजाचे एकूणच आर्थिक, भावनिक वगैरे अनेक प्रकारचे शोषण सातत्याने करीत असतात असे दिसते. म्हणून आपण बुद्धीने आपापले प्रश्न सोडवावेत, एकमेका साह्य़ करावे आणि सर्वानी शक्य तेवढे सुखी जीवन जगावे. माणुसकीची मूल्ये जपावीत, पण श्रद्धांना मात्र सोडचिठ्ठी द्यावी आणि गुरूला रामराम करून त्याच्यापासून आपली कायमची सुटका करून घ्यावी, स्वातंत्र्य मिळवावे.