नैसर्गिक आपत्तीस तोंड देण्याची क्षमता तयार करणे, पायाभूत सोयीसुविधा विकसित करणे आणि या बरोबरीने नागरिकांची मानसिकता तयार करणे या त्रिसूत्रीमुळे विकसित प्रदेशांत आपत्तींमुळे होणारे नुकसान कमी भासते. आपल्याकडे यातील एकही सूत्र पाळले जात नसल्याने आपत्तीत सारे काही संपल्याची भावना नागरिकांच्या मनात तयार होते आणि माणसे मोडून पडतात.
नैसर्गिक आपत्ती या सांगून येत नाहीत आणि आल्या तर थांबवताही येत नाहीत. पावसाचा अतिवर्षांव असो की त्याचे हात आखडून घेणे असो, त्यावर नियंत्रण मिळवण्याची व्यवस्था अद्याप विकसित देशांकडेही नाही. तीच बाब धरणीकंप असो वा समुद्रातील धरणीकंपामुळे निर्माण होणारी त्सुनामी असो. त्यांना फक्त तोंड देणे वा त्यांनी केलेल्या विध्वंसानंतर स्वत:ला सावरणे एवढेच काय ते आपल्या हाती राहते. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना सध्या याचा अनुभव येत आहे. वस्तुत: हा काळ चैत्रपालवीच्या प्रतीक्षेचा. आठवडय़ाभरावर आलेला होलिकोत्सव आणि त्या निमित्ताने शिशिराच्या काढत्या पायाकडे नजर ठेवून असणाऱ्या महाराष्ट्राला आकाशाने कोंडीत पकडले आणि या बेसावध क्षणी गारांचा मारा करून त्यास विदग्ध केले. एका अर्थाने निसर्गाने केलेली ही फसवणूकच. पण तक्रार करणार तरी कोणाकडे? ग्रीष्माच्या काहिलीने भेगाळलेल्या जमिनीच्या जिवात जीव यावा, मृगाच्या आगमनापर्यंत तिने तग धरावा यासाठीची सोय म्हणून वळिवाचे बरसणे महाराष्ट्राला ठाऊक. परंतु त्याचा काळ हा मे महिन्याच्या उत्तरार्धात. धुळीची वादळे आणि त्यामुळे झालेले वातावरणाचे विस्कटणे पुन्हा ठीक व्हावे यासाठी झालेला पावसाचा शिडकावा ही वळीवतऱ्हा. पण थंडी पुरती संपलीही नाही, घराघरातील रजया, घोंगडी पुन्हा डांबराच्या गोळ्यांसमवेत ट्रंकात किंवा अलमारीत गेल्याही नसतील तोच हे असे वळीव बरसणे महाराष्ट्राने कधीही पाहिले नव्हते. खरे तर त्यास वळीव म्हणणेही अयोग्यच. तेही पुन्हा गारपिटीच्या रूपात. एकेक गार लिंबाच्या आकाराची. अनेक डोक्यांवर टेंगळांना जन्म देणारी. तिला या काळात पाहायची कधी सवयच नाही महाराष्ट्राला. त्यामुळे या गारांचे झोडपणे फक्त माणसालाच नाही तर प्राणीपक्ष्यांनाही झोपवून गेले. वसंताच्या चाहुलीने वडाची लाल बोंडे खायला मिळतील या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो राघूमैनांना या गारांनी बेसावधपणे टिपले आणि त्यांचे प्राणच घेतले. चिमण्यांची अवस्था तर अधिकच केविलवाणी. अलीकडच्या काळात तर त्यांना जणू शहरबंदीच झालेली. अशा वातावरणात देहाच्या वाढत्या आकारामुळे कपडय़ाची शिवण उसवावी त्याप्रमाणे विस्तारणारी खेडी हाच काय तो त्यांचा आसरा. तिथेही होत चाललेली झाडकपात आणि वाढते प्रदूषण यामुळेही त्यांचे जगणे अवघड झालेले. त्यात हा गारांचा मारा. कोंबडय़ा, कबुतरे, शिवारात बांधली गेलेली गायबैल आणि शेळ्यामेंढय़ा अशा जनावरांना या निसर्गाच्या क्रूर गनिमीकाव्याने चकवले आणि गारांच्या माऱ्याने घायाळ केले.
जवळपास निम्मा वा अधिक महाराष्ट्र हा गारपीटग्रस्त झाला असून  विदर्भाचा काही भाग, प. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक विभाग, मराठवाडय़ाचा काही भाग आदी प्रदेशांना या निसर्गलहरीची झळ लागलेली आहे. प्रसारमाध्यमांच्या नजरेतून राज्य माहीत असणाऱ्या मुंबई वा अन्य शहरवासीयांनी झालेल्या हाहाकाराची फक्त छायाचित्रेच पाहिली असावीत. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रात काश्मीर तर नाही ना अवतरला.. या आणि अशा मनोरंजनाच्या पातळीवरच राहिल्या. या शहरवासीयांच्या दृष्टिकोनातून गहू असो तांदूळ वा अन्य काही. ते पिकते ते नाक्यावरच्या किराणा दुकानात वा अलीकडच्या मॉलमध्ये. त्यामुळे या गारपिटीच्या अस्मानी संकटाची भावनिक झळ त्याला अद्याप नाही. परंतु हातातोंडाशी आलेले रब्बीचे तरणेताठे पीक या गारपिटीच्या माऱ्यापायी झोपताना पाहिल्यावर, खुडायला तयार झालेले रसरशीत द्राक्षघोस या गारपिटीच्या माऱ्यात पडून चिखलगाळ होताना दिसल्यावर, पहाटेच्या अंधाऱ्या गारव्यात अंगणात शिंपणरांगोळीच्या ऐवजी कोंबडय़ांची कलेवरे गोळा करायची वेळ आल्यावर त्या शेतकऱ्याला काय वाटत असेल, हा प्रश्न शहरमनांना शिवत नाही. जोपर्यंत माध्यमांकित शहरांनाही निसर्गलहरींची झळ पोहोचत नाही तोपर्यंत ग्रामीण परिसराच्या वेदना परदु:ख शीतल वाटण्याइतक्याही आपल्याला भिडत नाहीत, हे वास्तव आहे. गेले काही दिवस राज्यात झालेल्या गारपिटीने हे पुन्हा एकदा सिद्ध केले.
त्याच वेळी आणखी एक बाब सिद्ध झाली. ती म्हणजे निसर्गाच्या लहरीपणास तोंड देण्यातील आपले बेसावधपण. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय याची एक निर्बुद्ध वर्गवारी सरकारी पातळीवर तयार करण्यात आली असून त्याच्या पलीकडचे काही आल्यास त्याला सामोरे जाण्यातील आपली तयारी उघडी पडते. परीक्षा देणारा विद्यार्थी प्रश्नांच्या भिन्न रूपास सामोरे जायची वेळ आल्यास जितका गडबडतो तितकाच गोंधळ सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनाचा वेगळ्या आपत्तींना तोंड देताना उडतो हे या निमित्ताने दिसून आले. पावसाळ्यात अतिवृष्टी वा अवर्षण, भूकंप आणि/ किंवा त्सुनामी अशा घटना म्हणजेच आपत्ती असे सरधोपटपणे मानत राहिल्याने वेगळे काही घडल्यास आपल्या व्यवस्थेचा गोंधळ उडतो. अर्थात हे खरे की इतक्या मोठय़ा गारपिटीला तोंड देणे शारीरिकदृष्टय़ा कोणत्याही व्यवस्थेस शक्य नाही. परंतु ती होत असताना, हवामान खात्याच्या साहय़ाने तिचा अंदाज बांधत शेतकऱ्यांना धीर देण्याची व्यवस्था तयार करणे अशक्य नाही. तसे करायचे तर चाकोरीबाहेरचा विचार लागतो. त्याचाच अभाव असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनते. त्याचमुळे गारपिटीमुळे असहाय झालेल्या शेतकऱ्याच्या मनात आपण आता वाऱ्यावर पडणार ही भावना निर्माण होते आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल टाकायची वेळ त्याच्यावर येऊ शकते. मुंबईपासून हजार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्याच्याच मनात इतके दिवस ही असहायता दिसत होती. परंतु मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नाशिक आणि परिसरातील समृद्ध भूमीत द्राक्षे पिकवणाऱ्या शेतकऱ्यासही आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही असे वाटत असेल तर तो सरकारवर दाखवलेला अविश्वास आहे, हे आपण लक्षात घ्यावयास हवे. हे असे का होते याचा विचार आपल्या व्यवस्थेने करावयाची वेळ आली आहे, हेही या निमित्ताने दिसून आले. याचे कारण हे की जे काही घडले ती काही पहिली नैसर्गिक आपत्ती नाही आणि शेवटची तर नक्कीच नाही. अशा वेळी विकसित देशांतील प्रारूप डोळ्यासमोर ठेवून आपत्ती निवारणाची व्यवस्था करणे ही काळाची गरज आहे. निसर्गाचा प्रकोप हा विकसित प्रदेशास झेलावयास लागल्यावर होणारे नुकसान हे अविकसित प्रदेशावर तशी वेळ आल्यास होणाऱ्या नुकसानीच्या किती तरी प्रमाणात कमी असते. याचे कारण प्रकोपाची तीव्रता हे नाही. तर त्यास तोंड देण्याची क्षमता तयार करणे, पायाभूत सोयीसुविधा विकसित करणे आणि या दोन्हींच्या बरोबरीने नागरिकांची मानसिकता तयार करणे या त्रिसूत्रीमुळे विकसित प्रदेशात नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान कमी भासते. मग ते अमेरिकेतील वादळ असो वा जपानमधील अणुकेंद्राचा अपघात. ते देश या परिस्थितीतून लगेच सावरतात ते या त्रिसूत्रीमुळे. आपल्याकडे या त्रिसूत्रीतील एकही सूत्र पाळले जात नाही. त्यामुळे अशा आपत्तीत सारे काही संपल्याची भावना नागरिकांच्या मनात तयार होते आणि माणसे मोडून पडतात. या संदर्भात जपानमधील फुकुशिमा अपघातानंतर काय झाले याचा दाखला देणे प्रसंगोचित ठरेल. त्या भीतिदायक अपघातानंतर अगदी मोजक्याच दिवसांत जपानमध्ये प्राप्तिकर भरण्याची मुदत संपत होती. परंतु जगाला हादरवून सोडणाऱ्या अपघातात घायाळ झालेल्यांतील एकानेही प्राप्तिकर भरण्याची मुदत वाढवा अशी मागणी केली नाही तर उलट रांगा लावून आपला देय कर भरला. राष्ट्राचे, प्रदेशाचे चारित्र्य दिसून येते ते अशा प्रसंगात.
हे चारित्र्य घडते व्यवस्थेच्या उत्तम हाताळणीने. अन्यथा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.. या भावोत्कट ओळींतील आशीर्वादपर सल्ल्यावरच आपणास समाधान मानावे लागते. आपण सध्या तेच करीत आहोत.