इजिप्तमधील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उभारी घेत असलेल्या ‘अल- दस्तूर’ या पक्षाची सूत्रे हाला शुक्राल्ला यांच्याकडे गेली, ही तशी जुनी बातमी. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे (आयएईए) निवृत्त प्रमुख मोहम्मद अल-बरादी यांनी स्थापन केलेल्या आणि तेच अध्यक्षही असलेल्या या पक्षाची सूत्रे फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवडय़ात हाला यांच्याकडे आली, तेव्हा ‘इजिप्तच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला राजकीय पक्षाचे प्रमुखपद’ असा गाजावाजा झाला होता, तोही आता शमला आहे. पहिल्या काही मुलाखतींमध्येच राजकीय पक्ष-नेत्याच्या सखोलतेचा अंदाज बांधता येतो, तो टप्पा आता हाला शुक्राल्ला यशस्वीरीत्या पार करीत आहेत! आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांतील त्यांच्या मुलाखती वाचणाऱ्या-पाहणाऱ्या कुणालाही, सत्तापालटापेक्षा राजकारणात बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या या नेतृत्वाबद्दल आशायुक्त कुतूहल वाटेल, अशी स्थिती आहे.
या पक्षाचे बहुसंख्य सभासद तरुण आहेत, तहरीर चौकातील निदर्शनांमध्ये भाग घेतलेले आहेत.. किंबहुना निदर्शकांच्या त्या उत्साहाला वळण लागावे, याचसाठी ‘अल- दस्तूर’ म्हणजे राज्यघटनावादी- पक्षाची स्थापना अल-बरादींनी २०१२ मध्ये केली होती. तरुणांमध्ये अनेक चांगले गुण आहेत, दमनशाहीविरुद्ध लढण्याची उत्कट इच्छा त्यांच्याकडे आहे. मूल्ये शिकवू लागलात तर ही मंडळी कंटाळतील, पण तुमच्या वागणुकीत ही मूल्ये आहेतच, याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे, असे हाला सांगतात. समाजशास्त्रज्ञ म्हणून विद्यापीठीय वर्तुळात त्या वावरल्या होत्या, पण प्राध्यापकीपेक्षा प्रत्यक्ष संघर्ष करणे त्यांनी पसंत केले. इजिप्तमधील राजकारण व त्यातील प्रत्येक बदल यांचा महिलांवर कसकसा परिणाम झाला, याचा हाला यांनी केलेला अभ्यास विद्वत्मान्य असला तरी, या अनिष्ट परिणामांशी मी लढा देत होते आणि त्यासाठी अनेकदा तुरुंगातही गेले होते, याचा सूक्ष्म अभिमान हाला यांच्या संयत बोलण्यातूनही जाणवत राहतो.
लष्करीकरण रोखणे, हा आमचा पहिला अजेंडा आहे, असे सांगताना याच संयत पक्षाध्यक्ष सध्याच्या राजकारणावर भेदक टीका करतात. दमनकारी सत्ताकारणच इजिप्तमध्ये झाल्याने सर्वच पक्षांवर ‘तुम्ही श्रीमंतांचे प्रतिनिधी’ किंवा ‘तुमचा पाठिंबा व्यापक नाही’ अशा आक्षेपांतून आमचाही पक्ष सुटलेला नाही, पण आम्हाला सर्वोच्च सत्तापदे नाही मिळालीत तरी चालेल- समाज लोकशाहीवादीच असावा यासाठी आमचा पक्ष आहे आणि राहील, असे त्या ठासून सांगतात.  ‘पुरुषी राजकारण’ विरुद्ध ‘समताकेंद्री राजकारण’ अशा संकल्पना समाजशास्त्रज्ञांना माहीत असतात. तो झगडा समताकेंद्रित्वाच्या बाजूने लढण्यासाठी हाला यांचे प्रयत्न सुरू आहेत.