भारतातील मुस्लिमांना भेडसावणाऱ्या समस्या अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षितता आणि ओळख. त्याशिवाय त्यांची शिक्षणातील टक्केवारी कमी आहे. सबलीकरणाचा प्रश्न आहे आणि राज्यव्यवस्थेकडून मिळणाऱ्या लाभांमध्ये, निर्णयप्रक्रियेमध्ये योग्य वाटा मिळण्यासाठी त्यांना झगडावे लागत आहे. या समस्या दूर करायच्या तर योग्य उपाय योजले पाहिजेत. मुस्लिमांसाठी सकारात्मक कृती कार्यक्रम सुरू केला पाहिजे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे हे वक्तव्य. त्यावरून हिंदूुत्ववादी संघटनांनी मोठा गदारोळ आरंभला आहे. विश्व हिंदू परिषदेस अन्सारी यांची ही मागणी जातीयवादी वाटत आहे. उपराष्ट्रपती हे मुस्लीम असल्यानेच असे बोलले असा छुपा आरोप यात आहे. पण त्यांचे भाषण झाले तो मेळावा मुस्लिमांचा होता. तेथे जाऊन त्यांनी मुस्लिमांच्या समस्यांवर भाष्य केले आणि मुस्लिमांना काही कानपिचक्याही दिल्या तर ते औचित्यहीन कसे म्हणता येईल? असे आक्रस्ताळे आक्षेप दुर्लक्षाच्याच लायकीचे. लक्ष दिले पाहिजे ते अन्सारी यांनी केलेल्या मूळ मांडणीकडे. त्यांनी मुस्लिमांची परिस्थिती सुधारण्याचा एक उपाय म्हणून सकारात्मक कृतीचे धोरण मांडले आहे. अमेरिकेत कृष्णवर्णीयांकरिता असे ‘सकारात्मक कृती’ – अ‍ॅफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन – धोरण राबविले जाते. चीन, जपानसारख्या देशांतही हे धोरण या ना त्या स्वरूपात आहे. अन्सारी यांची मुख्य सूचना ही आहे. याशिवाय मुस्लिमांची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती पाहता त्यातील काही अनुसूचित जाती वा इतर मागासवर्गीय या गटांत मोडतात. पण त्यांना त्यात योग्य स्थान मिळालेले नाही. ते मिळावे अशीही सूचना त्यांनी केली आहे. या सूचनेचा शेवट राखीव जागांच्या टप्प्यावर होतो हे वेगळे सांगण्यास नको. त्यांनी ते स्पष्ट मांडलेले नाही. पण तो वादाचा मुद्दा होऊ शकतो. त्यातून एक प्रश्न येतो, तो म्हणजे खरोखरच मुस्लिमांची स्थिती इतकी वाईट आहे का? सच्चर समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचे नेमके काय झाले याचे मूल्यमापन करण्यासाठी नेमलेल्या प्रो. अमिताभ कुंडू समितीचा अहवाल दोन महिन्यांपूर्वीच आला. त्यानुसार २००४-०५ आणि २०११-१२ या दरम्यानच्या काळातील मुस्लिमांतील दारिद्रय़ाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीहून अधिक आहे. सरकारी नोकऱ्यांतील त्यांचे प्रमाण कमी आहे. यामागची कारणे अन्सारी जे बोलले, त्याहून फार काही वेगळी नाहीत. ‘सब का साथ, सब का विकास’ करायचा तर ही कारणे दूर करणे आवश्यक आहे हेच त्यांचे म्हणणे आहे. मात्र त्याचबरोबर ही एका हाताने वाजणारी टाळी नाही हेही त्यांना ठाऊक आहे. आणि म्हणूनच त्यांनी जादिदियत (आधुनिकता) – म्हणजे हराम मानणाऱ्या, इज्तिहाद (बदलांशी जुळवून घेणे) – यास पाप मानणाऱ्या मुस्लिमांना कानपिचक्या दिल्या आहेत. विविधता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या तीन मितींमध्ये राहूनच मुस्लिमांना आपल्या समस्यांना उत्तरे शोधायची आहेत हे अन्सारी यांचे विधान येथे अधोरेखित करण्यासारखे आहे. मुस्लिमांच्या समस्या केवळ दारिद्रय़ वा अशिक्षितपणा यातून आलेल्या नाहीत. त्या मानसिकही आहेत. त्यातील बदलांसाठीची ही हाक आहे. आता असा बदललेला मुस्लीम समाज कोणाला नको आहे? तेव्हा अन्सारी यांच्या या भाषणाकडे कावीळ झालेल्या नजरेने पाहण्याऐवजी त्यावर किमान विचार होणे, देशासाठी फायद्याचे आहे.