हृदयेंद्रनं एकवार मित्रांकडे नजर टाकली, मग तो म्हणाला..
हृदयेंद्र – तर हा झाला बाह्य़ आणि आंतरिक मौनाभ्यास आता या दोन्ही रीतीने एक संयुक्त मौनाभ्यासही आहे..
कर्मेद्र – अजून आहेच का!
हृदयेंद्र – (हसत) हो.. आपण या जगात वावरतो. त्याचा आधार काय असतो? हे शरीर.. म्हणजेच स्थूल इंद्रियं आणि सूक्ष्म इंद्रियं.. या दोहोंद्वारे आपण या दुनियेशी संलग्न असतो.. या इंद्रियांद्वारे या जगाला आपण आत घेतो आणि या जगाशी प्रतिक्रियात्मक व्यवहार करीत राहातो. आता हे जे बाहेरुन आत आणि आतून बाहेर असं येणं-जाणं आहे ते तोडणं, हा मौनाचा अखेरचा अभ्यास आहे..
कर्मेद्र – म्हणजे?
हृदयेंद्र – म्हणजे या डोळ्यांनी जग आत येत आहे, या कानांनी जग आत येत आहे, पण त्याची अहंकेंद्रित प्रतिक्रियाच उमटली नाही तर मग त्याचा परिणामही नाही! एखादा विक्रेता दारावर आला की, ‘काही नकोय!’ असं सांगून आपण दार लावून घेतो ना? अगदी तसं जेव्हा दुनियेतलं सर्वच हवं-नको संपेल तेव्हा इंद्रियांचे दरवाजेही आपल्या मर्जीप्रमाणे उघडले जातील किंवा बंद होतील!
ज्ञानेंद्र – व्वा! इंद्रियांचे दरवाजे..
हृदयेंद्र – इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.. दुनियेपासूनचं हे जे दूर होणं आहे ना, ते मनाचं आहे.. शरीराचं नाही.. शरीरानं इथेच रहावं लागेल.. कर्तव्य यथायोग्यपणे पार पाडावीच लागतील.. नातेसंबंध राहतीलच.. पण त्याबाबत आसक्तभावच नसेल तर मन त्यात कालवलं जाणार नाही.. आपली मोठी चूक अशी होते की आपण कधी रागाच्या भरात शरीरानं दूर होतो, पण मनानं दूर होत नाही.. मग शरीरानं फिरकत नसलो, तरी मन वारंवार तिकडेच आदळत असतं.. या दुरावण्यात काय अर्थ? तेव्हा शरीरानं दूर न होता, मनानं आसक्तीरहित होणं हेच महत्त्वाचं आहे. तसं झालं की जगात राहूनही, जगातले सर्व व्यवहार करत असतानाही त्या जगाच्या वागण्याची आसक्तीयुक्त प्रतिबिंब मनात उमटत राहाणार नाहीत.. मनावरचं कितीतरी मोठं ओझं दूर होईल आणि मन ध्येयाकडे वेगानं जाऊ शकेल.. तेव्हा साधनेचा मार्ग कोणताही असो हा मौनाभ्यास प्रत्येकासाठी आवश्यक आहे.. मौनम् सर्वार्थ साधनम्! जेव्हा हा मौनाभ्यास पक्व होत जाईल तेव्हाच देवाचं अखंड चिंतन हृदयात होऊ लागेल.. अवघा तो शकुन। हृदयीं देवाचें चिंतन! मग या अभंगाचा दुसरा चरण आहे.. येथें नसता वियोग। लाभा उणें काय मग।। अहो ज्याची अशी स्थिती झाली आहे, ज्याचं अंत:करण सदोदित सद्गुरूस्मरणानं व्याप्त आहे त्याला काय उणं असणार? जो पूर्ण आहे त्यातच रमलेलं मन अपूर्णात गुंतणारच नाही.. जे अपूर्णात नाही, जे पूर्णातच लीन आहे त्याला अतृप्ती कसली? अखंड स्मरणातून त्याला अखंड समाधानाचाच लाभ आहे! मग अशा साधकाला आपलं नाव, आपला लौकिक, आपला मोठेपणा याचं काय कौतुक उरणार? त्याला केवळ सद्गुरूच्याच नामाचा छंद जडणार.. म्हणून या अभंगाचा तिसरा चरण सांगतो, ‘छंद हरिच्या नामाचा। शुचिर्भूत सदा वाचा।।’ या चरणावर आपण मागेही चर्चा केली.. स्वनामाच्या छंदातूनच आपण परनिंदा आणि आत्मस्तुती करीत राहातो. त्यानंच तर आपली जिव्हा सदोदित अशुद्ध असते! ज्याला हरिच्या नामाचा छंद आहे त्याचीच वाचा खऱ्या अर्थानं शुद्ध असते.. आता अखेरचा चरण.. ‘तुका म्हणे हरिच्या दासा। शुभकाळ अवघ्या दिशा’.. हा सोपा आहे.. पण या अभंगाला समांतर असं कबीरसाहेबांचं भजन मला आठवतं..
योगेंद्र – वा! पण हृदू तू ते गाऊनच दाखव.. तुझ्या आवाजात वेगळाच गोडवा आहे.. (ज्ञानेंद्रही मान डोलावतो..)
कर्मेद्र – काय आहे, मला सतत तुझ्या आवाजात सल्लेच ऐकायची सवय लागल्ये त्यामुळे त्या गोडव्याआधी कडूपणाच जाणवतो.. (सगळे हसतात) तरी तू गा..
तोच दारावरची बेल वाजली. हृदयेंद्रनं घडय़ाळाकडे पाहिलं. दुपारचे चार वाजायला आले होते.. सखाराम अभ्यासिकेत आला आणि म्हणाला, ‘‘दादासाहेब आलेत!’’ ज्ञानेंद्र आश्चर्यानं म्हणाला, ‘‘असे अचानक! फार छान.. मी आलोच खाली..’’ सखाराम म्हणाला.. ‘‘एकटेच नाहीत ते..’’
चैतन्य प्रेम