मुंबईच्या सर ग्रँट मेडिकल कॉलेज, विल्सन कॉलेजसमोरची चौपाटी आणि मरिन ड्राइव्ह या स्थळांवर घडणारी ही प्रेमकथा आहे.. या लघुकादंबरीच्या नावावरून चाणाक्षांच्या लक्षात आलेच असेल की, ही कहाणी विफल प्रेमाची आहे. त्याच प्रकारे, किंमत आणि पानांच्या हिशेबावरून हेही लक्षात यावे की, हे पुस्तक सस्त्या प्रेमकथांचा जो बहर गेल्या पाच वर्षांत आला आणि टिकला, त्यापैकी एक आहे! तरीही त्याची दखल घेण्याचे कारण म्हणजे या कहाणीतले प्रेम का विफल होते, याचे कथानक.
मुंबईत २००६ नंतर सुरू झालेल्या ‘भय्या-विरोधी आंदोलना’चा वाटा या कथानकात आहे. नायक उत्तर प्रदेशातल्या बरेली गावचा, नायिका महाराष्ट्रीय. ती दिसताक्षणी आवडल्याने ‘मी तरी तिच्यावर प्रेम करतो की हे नुसतेच आकर्षण (क्रश) हे मलाही माहीत नाही’ असे डॉक्टर होण्यासाठी मुंबईत आलेला नायक आपल्या दिल्लीकर रूम-पार्टनरला सांगतो.. पण हे केवळ आकर्षण नव्हे, ते ‘पॉझिटिव्ह एनर्जी’ देणारे ‘खरे’ प्रेम आहे, असे पुढल्या प्रकरणांत लेखकाने मांडले आहे. विल्सन कॉलेजात शिकणारी ही नायिकाच नायकाची स्फूर्तिदेवता बनते. इतकी की, नायक ग्रँट मेडिकल कॉलेजातून एम.बी.बी.एस. परीक्षेत पहिला क्रमांक पटकावतो! अभ्यास कसा केला, प्रेम कसे बहरले याच्या वर्णनांची गुंफण घालतानाच तरुणवर्गाला काही संदेशसुद्धा देण्याचा लेखकाचा विचार फार वेळा दिसतो. ‘शारीरिक आकर्षणात न रमता प्रेम करता येते’, ‘प्रेम ही सकारात्मक ऊर्जा मानून तुमचे कार्य (अभ्यास वगैरे) नीट करा’ आणि शेवटी- ‘समाज तुमच्या प्रेमाविरुद्ध असेल (अनेकदा असतोच) तरीही तुम्ही खंबीरपणे समाजाला सामोरे जा’ असे तीन ठसठशीत संदेश या छोटय़ाशा सस्त्या पुस्तकात आहेत.
मात्र हा जो ‘प्रेमाविरुद्ध असलेला समाज’ आहे, त्याच्याशी जर सामना करायचा तर हा समाज कसा आहे ते आधी समजून घ्यायला नको का? शत्रूला बागुलबुवा न समजता तो किती पाण्यात आहे एकदा समजून घेतले की त्याच्याशी सामना करणे सोपे जाते.. हे काम कादंबरीचा नायक करत नाही. नायिकेचे वडील हे ‘फॅनॅटिक मराठा’ (हाच शब्द कादंबरीतही आहे) आहेत एवढेच काय ते या हुशार- टॉपर वगैरे- नायकाला समजते. म्हणजे पर्यायाने, लेखकालाही तेवढेच समजते. हा लेखक कादंबरीच्या सुरुवातीला नायकाच्या (आणि त्याच्या सोबत्याच्या) रॅगिंगची वर्णने करताना जसा ‘मला फक्त गोष्ट सांगायची आहे’ या भूमिकेतून लिहितो, त्याच भूमिकेत तो अखेपर्यंत राहतो. त्यामुळे, नायक हा खलनायकापुढे हतबलच ठरतो. खलनायक कसा वाईट आहे, एवढे इतरांना सांगणेच हातात असलेला नायक, म्हणून तो हतबल. हे कथानक कादंबरीच्या पातळीपर्यंत जातच नाही. फार तर ही कथा फिल्मी पटकथेचा आधार ठरेल आणि भाषाभेद- प्रांतभेद यांच्या आधारे प्रेमिकांना एकमेकांपासून तोडू पाहणाऱ्या नायिकेच्या वडिलांचे ‘खलनायकत्व’ छापील कथानकापेक्षाही चित्रपटात अधिक रंगेल!
मुद्दा आहे तो, असे खलनायकत्व एका विशिष्ट भाषक समूहातल्या माणसाला बहाल करताना, त्या माणसाच्या राजकीय (इथे परप्रांतीयविरोधी) विचारांचा मागोवा घेऊन त्या विचारांना निष्प्रभ करण्याची संधी कथानकाने आयती दिलेली असूनही लेखकाने गमावलीच, हा. पुस्तक खपेलही, दुसरी आवृत्तीही म्हणे निघणारच आहे. पण कौशलकुमार झा यांनी लेखक होण्याची संधी गमावून फक्त एक छानशी गोष्ट सांगितली, त्या लेखकीय पराभवाची खूण म्हणजे हे पुस्तक.
युअर लव्ह वॉज ऑल आय हॅड!
: कौशलकुमार झा,
मोमेंट्स पब्लिशर्स,
पाने : १६८, किंमत : १५० रुपये.