विरोधाचा जरासा सूरही डोके भडकण्यास कारणीभूत ठरावा, अशा आजच्या वातावरणात ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ मल्लेशप्पा कलबुर्गी यांची हत्या होणे हे केवळ क्लेशकारक नाही. त्यामागे जगभरातील असहिष्णू वातावरण कारणीभूत आहे. भारतात गेल्या दशकभरात ते वाढले आहे. राजकारण्यांच्या पाठिंब्याने त्या आगीत सतत इंधन ओतण्याचे कामही सुरू आहे. वैचारिक सहिष्णुता हा जर भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा विशेष असेल, तर तो आता कालग्रस्त झाला आहे. त्यामुळे कुणीही, कुणाचेही, काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. हे वातावरण अधिकाधिक तीव्र होणे काही मूठभरांना आवश्यक वाटते. तरीही बहुसंख्येने त्याविरोधात असलेले सगळे जण जर मूग गिळून गप्प बसणार असतील, तर यापुढील काळ किती भयावह असेल, त्याची कल्पना येऊ शकते. मल्लेशप्पा कलबुर्गी हे कर्नाटकातील एक ख्यातनाम साहित्यिक आणि विचारांचा लढा विचारांनीच करायला हवा, यावर दृढतम विश्वास असणारे विचारवंत. कोणत्याही धर्मावर वा विचारपद्धतीवर अंधपणे विश्वास न ठेवता, त्याची चिकित्सा करणारे आणि त्याबद्दल परखड मत व्यक्त करणारे म्हणून त्यांची ख्याती. ‘मार्ग’ या शीर्षकाने त्यांनी विविध विषयांवरील टीकात्मक अभ्यासलेखांचे केलेले संकलन अतिशय मूलगामी स्वरूपाचे चिंतन करणारे म्हणून प्रसिद्ध. पहाटे घरात घुसून गोळ्या घालून त्यांची हत्या करावीशी वाटणे हाच मुळी विचारांचा पराभव म्हटला पाहिजे. अशा हत्येचा निषेध केलाच पाहिजे. ज्यांच्यामुळे समाज कणाकणाने पुढे जाण्याची शक्यता असते, त्यांना वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षी अशा रीतीने मृत्यूला सामोरे जावे लागणे हा किती पराकोटीचा पराभव आहे, याची समज येणे दुरापास्त वाटावे, अशी आजची स्थिती आहे. महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे जी मनोवृत्ती होती, तीच कलबुर्गी यांच्याही हत्येस कारणीभूत ठरली असावी, असा संशय घेण्यास पुरेसा वाव आहे, याचे कारण जगभरात अनेक ठिकाणी या प्रकारच्या शक्ती आता आपली ताकद दाखवू लागल्या आहेत. ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर देताना त्याचा जीवच घेण्याची ही अजब तऱ्हा एकूणच वैचारिक प्रगतीला किती मोठय़ा प्रमाणात खीळ घालते आहे, याचे भान आज कुणापाशी नाही. कर्नाटकातील ज्या हम्पी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून प्रा. कलबुर्गी यांनी काम केले, त्या हम्पीची ओळख जगातील एके काळचे अतिशय आधुनिक संस्कृतीचे शहर म्हणून आहे. विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेल्या हम्पीमधील जुन्या शिलालेखांचे जतन करणे, त्यावरील मजकुराच्या लिपीचा अभ्यास करणे आणि त्या काळातील समाजरचनेचा अभ्यास करणे हे प्रा. कलबुर्गी यांचे विशेष कार्यक्षेत्र. ‘मार्ग’ या त्यांच्या विचारसमृद्ध ग्रंथमालेत अनेक समाज व्यवस्थांबद्दल उलटसुलट मते व्यक्त करण्यात आली आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये शतकानुशतके अशा प्रकारे विचारांचे आदानप्रदान होत आल्यानेच ती काळाशी सुसंगत राहण्याचा प्रयत्न करू शकली, परंतु विचारांशी लढा देण्याची तयारी नसलेल्यांना त्यात अजिबात रस नसतो. आम्ही जे म्हणतो, तेच सर्वानी म्हटले पाहिजे आणि तसे न करणाऱ्यांना या जगातच राहण्याचा अधिकार नाही, अशी त्यांची ठोक भूमिका असते. प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येचा शोध ही आता शासनाची जबाबदारी असेल. त्यानंतरच कोण कोणाविरुद्ध कशासाठी उभा आहे, हे उघड होऊ शकेल. ज्या समाजाला विद्वत्तेची कदर करण्याची आवश्यकता वाटत नाही, तो रसातळाला जातो, हे तत्त्व समजून घेण्याची क्षमता निर्माण होणे ही आजची खरी गरज आहे.