परदेशात कसोटी मालिका हरण्याची परंपरा महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय पुरुष संघाने पुन्हा एकदा जोपासली, तर मिथाली राजच्या महिला राजने याच इंग्लिश भूमीवर कसोटी मालिका जिंकून आपल्या ‘मर्दानी’ कामगिरीने सर्वाचे लक्ष वेधले. भारताच्या पुरुष संघाच्या पराभवाचे तात्कालीन पडसाद आता उमटू लागले आहेत, परंतु भारताच्या महिला संघाच्या यशाचे कौतुक मात्र हव्या त्या प्रमाणात होताना दिसत नाही. धोनीचे कर्णधारपद काढून घ्या, डंकन फ्लेचरची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करा, या मागण्या जोर धरू लागल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सत्ताधारी पक्षात नसलेली ‘विरोधक’ क्रिकेटपटू, जाणकार मंडळी ही संधी साधून तोफ डागावयास लागली आहेत. तिकडे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने ‘ट्विटर’वर पांढरा झेंडा फडकवत ‘तमाम भारतीयांनो हे स्वीकारा’ अशा शब्दांत या जखमांवर मीठ लावण्याचे कार्य त्वेषाने केले आहे. भारताने परदेशात कसोटी मालिका जिंकल्याच्या घटनेला आता तीन वष्रे लोटली. दुबळ्या वेस्ट इंडिजविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारतीय संघाने ४-० अशा फरकाने मानहानीकारक पराभव पत्करले. मागील वर्षीच्या उत्तरार्धात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड दौऱ्यावरसुद्धा भारत अपयशी ठरला. भारतीय क्रिकेटने आयपीएल, चॅम्पियन्स लीग हे आर्थिक कमाई करणारे ट्वेन्टी-२०चे कारखाने काढले. परंतु या प्रवासात कसोटी क्रिकेटचे प्रमाण अतिशय कमी झाले. याच साऱ्या गोष्टी मारक ठरल्या. भारतातील मैदानांवर फिरकीचे चक्रव्यूह रचून कसोटी मालिका जिंकता येते, हा गेली अनेक वष्रे बीसीसीआयने जोपासलेला समज दोन वर्षांपूर्वी याच इंग्लिश संघाने खोटा ठरवला होता. परंतु तरीही कसोटी क्रिकेटचे गांभीर्य भारतातील क्रिकेटधुरीणांना आलेले नाही. महिलांच्या क्रिकेटमध्ये हा कसोटी सामना झाला तो तब्बल आठ वर्षांनी. भारताची कर्णधार ३१ वर्षीय मिथाली आपल्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत जेमतेम नऊ कसोटी सामने खेळली आहे. हीच गोष्ट महिलांच्या क्रिकेटला किती सापत्न वागणूक दिली जाते, महिला संघ ‘नकोशी’च कसा असतो, हे मांडण्यासाठी पुरेशी आहे. आठ वर्षांपूर्वी भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्येच कसोटी मालिका जिंकली होती. त्यामुळेच भारतीय महिला संघाच्या यशाचे अप्रूप वाटणे स्वाभाविक आहे. झुलन गोस्वामी आणि मिथाली राज या दोघी भारताच्या दोन्ही यशांच्या शिल्पकार. पण दोघींची कारकीर्द आता सूर्यास्ताकडे वाटचाल करणारी. त्यामुळेच हा कसोटी सामना खेळायला मिळाल्याचा मिथालीला अतिशय आनंद झाला. महिलांसाठीच्या सामन्यांचे प्रमाण हे खूप कमी प्रमाणात असते. बीसीसीआय भारताच्या पुरुष संघाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते, परंतु महिलांच्या क्रिकेटकडे तितक्या गांभीर्याने पाहिले जात नाही, परंतु २००५मध्ये महिलांच्या क्रिकेट संघाचे बीसीसीआयमध्ये विलीनीकरण झाले नसते, तर यापेक्षाही वाईट दिवस त्यांना सहन करावे लागले असते. सध्या महिला क्रिकेटपटूंना मानधन मिळते, परंतु पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणे श्रेणीनिहाय खात्रीदायक मानधनाची पद्धत इथे राबवली जात नाही. आयपीएलप्रमाणे महिलांचे अर्थकारण सुधारणारी कोणतीही स्पर्धा नाही. याशिवाय स्थानिक पातळीवर पुरेशा स्पर्धा आणि स्पर्धात्मक वातावरण नसल्यामुळे नोकऱ्यांबाबत कमालीची वानवा आहे. इंग्लंडच्या भूमीवर भारताच्या महिला संघाने आत्मविश्वासाने कामगिरी केली, परंतु धोनी, मुरली विजय़, अजिंक्य रहाणे व भुवनेश्वर कुमार वगळता सारेच सपशेल अपयशी ठरले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्याने धावा काढणारे आपले क्रिकेटवीर परदेशातील खेळपट्टय़ांवर का तग धरत नाहीत, याचा शोध आणि बोधही घेण्याची गरज आहे.