‘नमों’ची तुलना हिटलरशी केल्याने अपेक्षेप्रमाणे खवळलेल्या अरुण जेटली यांनी आपल्या वकिली बाण्याला अनुसरून इंदिरा गांधी यांनीच हिटलरपासून स्फूर्ती घेतल्याचा आरोप करून तात्काळ बाजी उलटविण्याचा बालिश प्रयत्न केला आहे. तर्क काढण्याचे स्वातंत्र्य सर्वानाच आहे. पण तर्कट म्हणजे इतिहास नव्हे, शिवाय सत्तेत असताना निवडणुकीचा आदेश देऊन हिटलरने पराभवाचा सामना कधीही केला नव्हता.
जेटलींच्या माहितीसाठी एक ऐतिहासिक सत्य : डॉ. बी. एस. मुंजे, हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते आणि  रा. स्व. संघाच्या पाच संस्थापकांपैकी एक. यांनी इटलीस जाऊन मुसोलिनीची भेट घेतली होती. त्याच्या ‘ब्लॅक शर्ट्स’ या संघटनेपासून स्फूर्ती घेऊनच रा. स्व. संघाची स्थापना करण्यात आली. फरक इतकाच की, ब्लॅक शर्ट्सऐवजी ‘ब्लॅक कॅप’ आली. आणखीही एक ऐतिहासिक सत्य : इंग्लंडहून मायदेशी परत येत असता पं. जवाहरलाल नेहरूंचे विमान रोम येथे थांबा घेणार होते. त्या वेळी मुसोलिनीने, तो त्या वेळी इटलीचा सर्वेसर्वा होता; पं. नेहरूंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, तसा संदेशही पाठविला होता, पण नेहरूंनी ते आमंत्रण धुडकावून लावले. इीं१्िरल्लॠ ३ँी ’्रल्ल ्रल्ल ्र३२ीिल्ल म्हणतात ते हे, ही वस्तुस्थिती आहे. तर्कट, कल्पनेची भरारी वा जशास तसेसारखा प्रयत्न नव्हे. शेवटी हिटलरही निवडणूक जिंकून बहुमतानेच सत्तेवर आला होता!

शहीद विनयकुमारसाठी हे तरी करा!
२४ मार्च ही तारीख आम्हा आजदेगाववासीयांना अभिमानाची आहे. आजदेगावच्या मातीत खेळून खूप मोठा झालेल्या कॅ. विनयकुमार सचानचा आज स्मृतिदिन. तो शहीद झाल्याचे दु:ख जरूर आहेच. कॅ. विनयकुमारला त्याच्या तुकडीसह दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांनी पाठविले. आपल्या तुकडीतून काही जणांना बरोबर घेत तो सरसावला, पण दहशतवाद्यांच्या टोळीपुढे त्याचे साथीदार दगावत गेले असता तो पुढे गेला. मात्र अभिमन्यूप्रमाणे तोही फसला. त्यात तो शहीद झाला. तो दिवस होता २४ मार्च २००५.
एकुलता एक मुलगा (व एक बहीण) असताना त्याच्या पालकांनी त्याला त्याच्या मनाप्रमाणे सैन्यात पाठविले, याबद्दल राष्ट्रप्रेमाची नुसतीच महती न गाता कर्तव्य केले, यास्तव ती दोघेही गौरव करण्याजोगे आहेत.
आज २४ मार्चला त्याच्या स्मृतीला, घरडा चौकातील स्मारकाला अभिवादन करून त्याच्या राहत्या घरापर्यंत मिरवणूक काढीत काही संस्था, काही शाळा, नेते, पक्षधारी हे सर्वजण येतील. सालाबादप्रमाणे त्याच्या भव्य फोटोला पुष्पांजली वाहतील आणि उद्यापासून पुढच्या २३ मार्चपर्यंत सर्व विसरून जातील. ही खरी शोकांतिका. म्हणूनच माझी आजदे परिषदेला, आमदार, खासदार यांना विनंती आहे की, निवडणुकांनंतर शहीद कॅ. विनयकुमारची आठवण म्हणून गावदेवी चौक (निवासी एमआयडीसीचा शेवटचा बस स्टॉप) ते मॉडेल कॉलेज अशा रस्त्याला त्याचे नाव द्यावे. म्हणजे तो  परिसर धन्य होईल.
-हेमंत भा. दिघे, आजदेगाव, डोंबिवली (पूर्व)

स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळांना विशेष अनुदानासाठी कोणते निकष?
‘स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळांना १० लाखांचे विशेष अनुदान’ ही बातमी  (१६ मार्च) वाचून आनंद झाला, पण त्यासाठी निवडण्यात आलेल्या शाळांसाठी कोणता निकष लावला आहे ते मात्र कळले नाही. बातमीमध्ये अगदी स्पष्ट म्हटलेले आहे की, इंग्रजी वगळून अन्य भाषांच्या गुणवत्तापूर्ण शाळांना हे अनुदान देण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील सेंट कोलंबा हायस्कूल, ह्य़ुम हायस्कूल आणि मराठा हायस्कूल या शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील मराठी माध्यम जवळजवळ बंद पडलेले असून इंग्रजी माध्यम जोरात सुरू आहे.
याउलट दक्षिण मुंबईतीलच पूर्णपणे मराठी माध्यम असलेल्या आणि गुणवत्तेच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या चिकित्सक समूह हायस्कूल, आर्यन हायस्कूल, युनियन हायस्कूल या व अशा अनेक शाळांचा विचारच केलेला नाही. आज या शाळांची आर्थिक स्थिती खूपच दयनीय आहे. एक शतकाहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या,  कला, विज्ञान, अर्थ अशा विविध क्षेत्रांतील बौद्धिक संपदेत भर टाकणारे विद्यार्थी पुरविणाऱ्या आणि सातत्याने चांगला निकाल असणाऱ्या या शाळांना आज निधीअभावी विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा पुरविणे अशक्य होत आहे. असे असताना शासकीय अनुदान देताना कोणत्या बाबींचा विचार केला तेच कळत नाही. अल्पसंख्याकांना खूश करून मते मिळविण्यासाठी असे केले की काय, अशी शंका मनात येते.
    -मनोहर नारखेडे, मुलुंड (प.)

परीक्षांचे ओझे कमी करण्यासाठी..
डॉ. विपुल सितूत यांचा ‘वैद्यकीय प्रवेश परीक्षांची गरजच काय?’ हा लेख (करिअर वृत्तान्त,       ३ मार्च) वाचला. एकंदर शैक्षणिक व्यवस्था पाहिल्यानंतर परीक्षांचे ओझे कमी होण्याऐवजी वाढतच गेले आहे असे दिसते. विद्यार्थी एवढय़ा परीक्षा व्यवस्थेमधून जात असताना सरकारी पातळीवर दरवर्षी होणारा गोंधळसुद्धा वाढतच चालला आहे.
 मुळात असा प्रश्न निर्माण होतो की ‘एमएच-सीईटी’ किंवा ‘नीट’ या प्रवेश परीक्षा कशासाठी निर्माण केल्या आहेत? बारावी परीक्षेत कमी गुण मिळाले तर चालतील, पण वरील दोन्ही परीक्षेत उत्तम गुण मिळालेच पाहिजेत अशीच विद्यार्थ्यांची धारणा होते. म्हणून खाजगी क्लासेसना जाऊन त्याद्वारे जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी त्यांची धडपड असते.  यावर तोडगा खालीलप्रमाणे काढता येईल, असे वाटते.
१) वरील दोन्ही परीक्षा त्वरित बंद व्हावयास हव्यात. २) दोन्ही परीक्षांचा जो अभ्यासक्रम आहे तो दहावी, अकरावी व बारावी या तीनही वर्षांत विभागला गेल्यास शाळांमधून याचे नियमित शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल. ३) दहावी, अकरावी व बारावी अशा तीनही परीक्षा बोर्डामार्फत व्हाव्यात आणि त्यानंतर तीनही परीक्षेत विद्यार्थ्यांना जे गुण मिळाले असतील त्याचे सरासरी गुण हे पुढील अभ्यासक्रमासाठी ग्राह्य़ धरून गुणानुक्रमे पुढील शिक्षणासाठी प्रवेश दिले जावेत.     
रामचंद्र  मेहेंदळे, गोरेगांव (पूर्व)

हा सेनेचा दुटप्पीपणा
शिवसेनेने लालकृष्ण अडवाणी यांची कड घेऊन भाजपवर शरसंधान करणे हा शुद्ध दुटप्पीपणा आहे.  त्यांनी स्वत:च्या घरात डोकावून पहावे. त्यांनीही आपल्या पक्षातील जुन्या नेत्यांना खडय़ासारखे बाजूला टाकले आहे.  मनोहर जोशी यांचे उदाहरण तर ताजे  आहे.  मात्र जुन्या मंडळींनी स्वत:हून तरुणांना संधी दिली पाहिजे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.
दुसरे म्हणजे शिवसेना आता उ. प्रदेश आणि दिल्लीतही निवडणुका लढवणार आहे.  ज्यांना आपला दादरचा बालेकिल्ला राखता आला नाही,  ‘आमच्या’ मुंबईत त्यांचा एकही खासदार नाही ते महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन काय दिवे लावणार?  
    -एस. एम. खोत
चितळे नव्हे, पितळे!
शब्दकोडे क्र. ९८० मधील आडवा शब्द (१) द्वारकानाथ माधव चितळे यांचे रहस्यमय कादंबरीकार म्हणून सर्वतोमुखी असलेले टोपणनाव? असा प्रश्न आहे व त्याचे उत्तर ‘नाथमाधव’ असे दिलेले आहे.
आपल्या ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय कादंबऱ्यांनी मराठी साहित्य समृद्ध करणारे महाराष्ट्राचे आवडते कादंबरीकार कै. नाथमाधव ऊर्फ द्वारकानाथ माधवराव पितळे  (चितळे नव्हे!) यांच्या प्रसन्न व सहजसुंदर साहित्यशैलीने वाचकांना रिझविले. त्यांच्या ‘रायक्लब अथवा सोनेरी टोळी’, ‘सावळ्या तांडेल’, ‘वीरधवल’ इ. कादंबऱ्यांनी तत्कालीन पिढीला भुरळ घातली होती. अज्ञ वाचकांना नवे नवे शब्द कौशल्याने शिकविणाऱ्या मनोहर बा. काणेकरांकडून इतकी ढोबळ चूक अपेक्षित नव्हती!
भिकाजी गणपत वैद्य, कर्जत