सपा, जदयू, द्रमुक, अण्णाद्रमुक, बिजू जनता दल, कम्युनिस्ट, राष्ट्रवादी आदी पक्षांनी बुधवारी तिसऱ्या आघाडीचा घाट घातला. मात्र या मंडळींचा आजपर्यंतचा एकूणच व्यवहार व्यभिचाराकडे झुकणारा आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने तर उद्या काँग्रेसचे जहाज बुडणार असेल आपण पहिल्यांदा त्यातून बाहेर पडू हेच सूचित केले आहे..
वर्षांऋतूच्या आगमनाने ज्याप्रमाणे तृणांकुर फुटतात, भाद्रपदाच्या चाहुलीने सारमेयांना वंशसातत्याची गरज वाटू लागते, तद्वतच निवडणुकांच्या केवळ गंधाने आपल्याकडे तिसरी आघाडी नामक बिनचेहऱ्याच्या आणि निराकार घटकास सत्ताकंडू निर्माण होतो. १९९१ साली साथी चंद्रशेखर, १९९६ च्या निवडणुकांनंतर देवेगौडा, इंदरकुमार गुजराल आदींना या तिसऱ्या आघाडीच्या निमित्ताने पंतप्रधानपदाच्या खुर्चीचा स्पर्श झाल्याने या आघाडीतील हौशे, गवशे आणि नवशांनाही आपण तेथे का बसू नये, असा प्रश्न पडून त्यांच्या राजकीय उद्योगांना बहर येतो. नवी दिल्लीत बुधवारी झालेल्या या कथित तिसऱ्या आघाडीच्या शक्तिप्रदर्शनात या मारून मुटकून आणण्यात आलेल्या बहराचे दर्शन झाले. देशभरातील १४ विविध राजकीय पक्षांनी या मेळाव्यात काँग्रेस आणि भाजपमुक्त करण्याचे आश्वासन देत पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कोणत्याही राजकीय पक्षाचे अंतिम ध्येय सत्ता हेच असल्याने त्याबाबत गैर ते काहीही नाही. परंतु या मंडळींच्या संदर्भात समस्या ही की यातील जवळपास सर्वच पक्षांनी भाजप आणि काँग्रेस या पक्षांशी कधी ना कधी सत्तासोबत केलेली आहे. म्हणजे यांना भाजप वा काँग्रेस नको म्हणावा तर तसे नाही. बरे हवा आहे असे मानावे तर त्यांच्याकडे उघडपणे पाहणे यांना नको वाटते. या दोन पक्षांचा चोरटा स्पर्श, चोरून केलेली नेत्रपल्लवी यांना चालते, परंतु मतदारांच्या साक्षीने उघडपणे राजकीय हात धरणे यांना पसंत नाही. तेव्हा या मंडळींचा एकूणच व्यवहार व्यभिचाराकडे झुकणारा आहे.
या मेळाव्यात नितीशकुमार यांनी दणकून भाषण ठोकले. त्यांचे म्हणणे भाजपचे धार्मिक राजकारण हे दहशतवादाकडे झुकणारे आहे. नितीशकुमार हे समाजवादी. त्या अर्थाने त्यांचे विचार त्यांच्या राजकीय विचारधारेशी जुळणारेच यात संदेह नाही. परंतु प्रश्न पडतो तो असा की मग याच दहशतवादी राजकारण्यांना घेऊन त्यांनी इतके दिवस बिहारचा संसार कसा चालविला? त्यांना नरेंद्र मोदी अप्रिय आहेत, हे मान्य. पण याच मोदी यांचे पक्षबंधू सुशील मोदी हे नितीशकुमार यांचे उपमुख्यमंत्री होते, हे कसे? दुसरे तृतीय आघाडीकार मुलायमसिंग यादव यांनाही भाजप आणि काँग्रेसविरहित सत्ताकारणाची गरज वाटू लागली आहे. उत्तर प्रदेशात आपले चिरंजीव अखिलेशकुमार यांचे बागबुग करणारे सरकार स्थिर व्हावे यासाठी त्यांना काँग्रेसचे साह्य़ घेण्यात काहीही कमीपणा वाटत नाही, दिल्लीत काँग्रेसच्या सरकारचा डोलारा डगमगू लागल्यास त्यास उघडपणे टेकू देण्यात त्यांना काहीही गैर वाटत नाही, अमेरिकेशी झालेल्या अणुकराराच्या निमित्ताने २००८ साली काँग्रेसचा पाठिंबा मुलायमसिंग यांचे वैचारिक साथीदार, मार्गदर्शक अशा डाव्यांनी काढला असता ते सरकार वाचवण्याचे पुण्यकर्म करण्यात मुलायमसिंग यांची ना नाही आणि तरीही आपण काँग्रेसच्या विरोधात असल्याचा दावा हे करणार. यास विनोद म्हणावा की आपली चेष्टा? या मेळाव्यात तामिळनाडूच्या अम्मा जयललिता सहभागी झाल्या नाहीत. त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवून या संभाव्य आघाडीस नैतिक पाठिंबा दिला. परंतु नैतिक म्हणजे काय, असा प्रश्न पडावा असे त्यांचे वागणे. विद्यमान राजकीय परिस्थितीत त्या भाजपच्या तंबूत आहेत असे मानण्यास जागा आहे. तरीही आपण भाजपविरोधी असू शकतो असे मानावे असे त्यांचे म्हणणे. या आधीही अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारास अम्मा यांच्या अद्रमुकने पाठिंबा दिलेला होता, हेही विसरता येणार नाही. तामिळनाडूच्या राजकारणात द्रमुक जे जे करेल त्याच्या विरोधी काही करणे यापेक्षा मोठा विचार अद्रमुकचा कधी नसतो. गेल्या दोन निवडणुकांत द्रमुकने काँग्रेसची साथ करून दूरसंचारचा टू-जी आनंद लुटला. तेव्हा त्याला विरोध म्हणून अद्रमुक भाजपच्या तंबूत शिरला हे राजकीय वास्तव आहे. त्या आधी द्रमुकची सोयरीक भाजपशी होती आणि मुरासोली मारन आदी अटलबिहारींच्या सरकारात महत्त्वाचे मंत्री होते. अम्मा त्या वेळी काँग्रेसच्या संपर्कात होत्या. त्यामुळे त्यांच्या राजकीय विचारासही गांभीर्याने घेण्याचे कारण नाही. गेली काही वर्षे ओदिशाचे नवीन पटनाईक यांच्या तुळतुळीत राजकीय चेहऱ्यावर निधर्मी खुंट फुटू लागले आहेत. वास्तवात हे पटनाईक स्वत: भाजपच्या सरकारात अटलबिहारींचे मंत्री होते. पुढे ओदिशात ख्रिस्ती धर्मीयांवर हल्ले झाल्यावर ओदिशाची वडिलोपार्जित गादी चालवण्यासाठी त्यांना निधर्मी बुरखा घ्यावयाची गरज निर्माण झाली. या नवीन यांचे वडील बिजू हे तर आणीबाणीनंतरच्या सरकारात संघीयांच्या समवेत मंत्रीही होते. तेव्हा अशा पटनाईकांचे राजकारण हे पटणारे नाही आणि त्यात नवीनही काही नाही. या तिसऱ्या आघाडीसाठी आघाडीवर दिसतात ते मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश करात, सीताराम येचुरी आणि नुसत्या कम्युनिस्टांतील ए बी बर्धन. या डाव्यांचे काहीही सांगता येत नाही. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकाराला एका बाजूने संघीय भाजपचे चाक होते तर दुसरे चाक या डाव्यांचे होते. त्या वेळी एका अर्थाने भाजपशीच संग करण्यात त्यांना कोणताही कमीपणा वाटला नाही. नंतर एकदम मनमोहन सिंग सरकारला पाठिंबा देतानाही त्यांचा काँग्रेसविरोध आड आला नाही. दरम्यानच्या काळात त्या पक्षाचे ज्येष्ठ ज्योती बसू यांना पंतप्रधानपदी बसण्याची संधी आली असता ती नाकारण्याचा करंटेपणा दाखवला याचेही त्यांना काही सोयरसुतक नाही. तेव्हा आता पुन्हा एकदा त्यांचा भाजप आणि काँग्रेसविरोध उफाळून आला आहे. वास्तवात त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे तो पश्चिम बंगालातून ममता बॅनर्जी यांना सत्तापार करणे. राजकीय चक्रमपणाच्या बाबत ममताबाई डाव्यांच्या तोडीस तोड असल्याने तेथील राजकारणात डाव्यांना आव्हान निर्माण झाले आहे. परंतु ममताबाईंचा मूळचा पिंड विरोधी राजकारणाचा असल्याने मुख्यमंत्रिपदी बसल्यावरही त्या विरोधी पक्षाच्या थाटातच राज्य करीत आहेत. त्यामुळे खरे तर डाव्यांना त्यांच्याकडून दीर्घ धोका नाही. परंतु आगामी निवडणुकीत तिसरी आघाडी व्हावी यासाठी ममताबाईंनीच प्रयत्न सुरू केल्याने डाव्यांच्या पोटात गोळा आला. म्हणजे ममताबाईंना त्यात न जाणो यश आले तर आपली अवस्था न घर का ना घाट का अशी होईल या रास्त भीतीने त्यांना घेरले आणि त्यामुळेच तिसऱ्या आघाडीचा हा बुधवारचा तालकटोरी घाट घालण्यात आला. यातील नाटय़ हे की उद्या खरोखरच निवडणुकीनंतर या आघाडीस संधी मिळालीच तर आपली सत्तासंधी हुकायला नको या चतुर विचाराने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आपलाही प्रतिनिधी या मेळाव्यास धाडला. या असल्या राजकीय कौशल्यात पवार यांचा हात धरणारा उभ्या भारतवर्षांत कोणी सापडणार नाही. एका बाजूला भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी, त्याच वेळी सोनिया गांधीचलित संयुक्त पुरोगामी आघाडी आणि त्याच वेळी या दोनही पक्षांना वगळून तिसरी आघाडी असा तिहेरी संसार करण्याची कला पवार यांना अवगत आहे हे यानिमित्ताने दिसले. आम्ही सत्तेत आहोत म्हणजे विरोधी नाही असे नाही, असे अप्रतिम स्पष्टीकरण देऊन राष्ट्रवादीने उद्या काँग्रेसचे जहाज बुडणार असेल तर आपण पहिल्यांदा त्यातून उडी मारून बाहेर पडू हेच सूचित केले.
या सर्व तिसऱ्या आघाडीतील सर्व १४ पक्षांकडे मिळून लोकसभेत सध्या ५४५ पैकी १०१ जागा आहेत. उद्या खरोखरच ही आघाडी एकत्र लढली तर त्यात काही फार फरक पडून आपण २००चा टप्पा ओलांडू शकू असे त्यांना वाटते. तसे झाले तर चमत्कारच म्हणावयास हवा. सतराशे लुगडी आणि भागुबाई उघडी अशी एक म्हण आहे. ती या तिसऱ्या आघाडीला लागू पडावी. या सतराशे पक्षांच्या आघाडय़ाबिघाडय़ानंतरही आपली लोकशाही उघडी ती उघडीच.