News Flash

भावसंगीताचा सन्मान

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना महाराष्ट्र शासनाचा पहिलाच ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाल्याने गानरसिकांना मनस्वी आनंद झाला आहे. किशोरीताईंनी गायिलेल्या

| February 25, 2013 12:31 pm

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना महाराष्ट्र शासनाचा पहिलाच ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाल्याने गानरसिकांना मनस्वी आनंद झाला आहे.
किशोरीताईंनी गायिलेल्या असंख्य बंदिशींपैकी ‘सहेला रे आ मिल लाए’ या स्वरचित बंदिशीने गानरसिकांवर अधिराज्य करून वेड तर लावलेच, परंतु ही बंदिश त्यांनी अजरामर केली. किशोरीताई म्हणतात, एखाद्या कलाकाराचे सादरीकरण जेव्हा सगळ्यांना भावते, तेव्हा त्यातला राग कोणता हे महत्त्वाचे नसते. रसिकांना जाणवतो तो भाव असतो. त्यांची फसगत स्वरात होते पण स्वरांना स्पर्श करता येत नाही. त्यांना स्वरांमधला भाव जाणवत असतो. एखाद्या लहान मुलांसमोर शृंगार आळवणारा राग म्हटला तर त्याला तो कसा कळेल? त्यासाठी भावविश्वाचा अभ्यास केल्याशिवाय शास्त्रीय संगीत कळणार नाही. याचा अनुभव मला २००६च्या त्यांच्या ‘दिवाळी पहाट’च्या शनिवारवाडय़ातील मैफलीत आला. किशोरीताईंनी रम्य सकाळी नेहमीप्रमाणे मैफल रंगवली. त्यांचे गाणे म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात बसून ईश्वराला केलेली आळवणीच होय. सरतेशेवटी करुणरसपूर्ण भैरवीचे सूर त्यांनी आळविले.
महानिर्वाणाचे वर्णन करणारी भैरवी मनाला स्पर्शून गेली. या संपूर्ण भैरवीने डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या. मानवाच्या मूर्ततेतून अमूर्ततेकडे घडणाऱ्या प्रवासाच्या वर्णनाने त्या भैरवीचे त्यांनी सोने केले होते. कधी एकदा किशोरीताईंना भेटेन असे झाले. मैफल संपल्यानंतर त्यांना भेटायला रांगच लागली, मीही त्यात होतो. किशोरीताईंना भेटून सांगितले, की नुकतेच माझ्या आईचे निधन झाले. तिच्या गंभीर आजारपणापासून अखेरच्या श्वासापर्यंतचे गांभीर्य तुमच्या स्वरात जाणवले. आईच्या आठवणीने आणि तुमच्या कारुण्यमय गायनाने व्याकुळता अनुभवली, धन्यवाद. अतिशय आत्मीयतेने त्यांनी माझे बोलणे ऐकल्यानंतर त्या म्हणाल्या, शास्त्रीय संगीताचे हेच तर महत्त्व आहे आणि आईच्या सेवेचे हेच तर पुण्य आहे. किशोरीताईंशी प्रत्यक्ष बोलण्याचा आनंद तर झालाच पण एक अलौकिक स्वर कायमचा मनात घर करून राहिला.
– सुनील दादोजी भंडगे, पुणे.

नाटय़ परिषदेचा फार्स !
‘भुक्कडांची भैरवी’ (दि. २०) हा अग्रलेख या पत्राचे कारण आहे. प्रतिक्रिया नव्हे. फार पूर्वी फार्स हा नाटय़प्रकार मुख्य नाटकाच्या आधी, सादर होणाऱ्या छोटेखानी नाटुकल्याचा एक गमतीचा प्रकार होता. (पाहा- नाटकांचे तारे) उदा. ‘नारायणरावाच्या खुनाचा फार्स’ याची जाहिरात, नारायणरावाच्या पोटातून प्रत्यक्ष बाहेर पडलेला साखरभात पाहा, अशी केली जात असे. पुढे पाश्चात्त्यांच्या नाटय़सृष्टीमधील फार्स प्रकरण चपखलपणे मराठीमध्ये कै. श्री. बबन प्रभू व श्री. आत्माराम भेंडे यांनी आणले आणि गंमतशीर, खुसखुशीत आणि पूर्ण रंजक अशा थियेट्रिकल नाटय़धुडगुसाची मराठी नाटय़सृष्टीमध्ये भर घातली. हसा आणि मोकळे व्हा असा एकूण त्याचा फॉर्म होता.
सध्याच्या आणि गेल्या काही वर्षांमधल्या अ. भा. नाटय़ परिषदेची अवस्थाही तशीच दिसून येत आहे. मात्र हसा आणि मोकळे व्हा ऐवजी हसावे की रडावे, असा प्रकार दिसून येत आहे. दूरचित्रवाणीवरून एकमेकांना काढलेले घरंदाज ओरखडे, चौथ्या अंकात मद्यपानामुळे होणारे गलिच्छ प्रकार आणि ही आताची निवडणुकीची धुळवड! नाटय़ परिषद ही काय संस्था आहे? नाटय़संमेलनामध्ये दादागिरी आणि रुबाब दाखवणाऱ्या या संस्थेला काय अधिकार आहेत? प्रतिवर्षी देवल स्मृतिदिनी पारितोषिकांचे रुटीन वाटप करण्याव्यतिरिक्त इतर कुठल्या रंगकर्मीचे भले नाटय़ परिषदेने केले आहे? परिषद शाखेच्या एकांकिका स्पर्धा? अशा स्पर्धा ग्रामीण भागातून सुद्धा होतात, त्याही भरघोस बक्षिसांच्या. या नाटय़ परिषदेकडे काय घबाड आहे? तरीही निवडणुकीमध्ये लांडीलबाडी होते. निर्लज्जपणे ‘तो मी नव्हेच’ असे सांगितले जाते. नाटय़पुंगव फुत्कारे टाकत एकमेकांचे वाभाडे काढतात.
निवडणुकीत अनेक ठिकाणी गैरप्रकार घडले, मात्र मुंबई विभागाची निवडणूक फक्त रद्द होते, पुणे विभागातील सांगलीमध्ये दोनशे मतदारांना मतपत्रिका मिळत नाहीत तरीही इथली निवडणूक वैध ठरते. त्यामुळेच नाटक झाले जन्माचे, या विचाराने नाटय़धर्म आचरणारे पराभूत होतात, आणि फुटकळ नाटक्ये निवडून येतात. नाटय़ संमेलनाचे पदाधिकारीही तेच. नाटय़संमेलनाच्या जमा-खर्चाचा हिशेब या पदाधिकाऱ्यांनी नाटय़ परिषद शाखा सांगलीच्या सभासदांना आजपर्यंत दिला नाही, आता तर केंद्राकडेही दिला जाणार नाही; कारण ते तिथेच.
अशा परिस्थितीत तयार झालेल्या काही भुक्कडांची ही परिषद शासनाकडे राज्यनाटय़ स्पर्धाचे संयोजन नाटय़ परिषदेकडे द्या असे म्हणते आहे, ते कशाच्या आधारावर? शासनानेही आपले अधिकार या बेभरवशी संस्थेला का द्यावेत? सध्या सां. का. संचालनालय त्या त्या ठिकाणच्या नाटय़स्पर्धाना तेथीलच एक मान्यवर व सर्वाना सामावून घेणारा नाटय़धर्मी ‘समन्वयक’ म्हणून नेमते, हेच योग्य आहे, कारण तो संचालनालयाला बांधील राहतो.
पण एकदा का परिषदेकडे ही जबाबदारी सोपवली की ते भ्रष्टाचाराचे कुरणच ठरणार, कारण पैसा शासनाचा, खर्च परिषद करणार, मग हिशेबाची बातच नसणार आणि द्रव्य म्हटले की सुंदोपसुंदी आलीच. गटबाजीने पोखरलेल्या आणि निवडणुकीतही भ्रष्ट कारभार करणाऱ्या परिषदेवर भरवसा ठेवून गेली बावन्न वर्षे, काही किरकोळ अपवाद सोडल्यास उत्तम तऱ्हेने चालणाऱ्या या नाटय़स्पर्धा शासनाने कुणासही चालवायला देऊ नयेत, अशी अनेक नाटय़धर्मीची तीव्र इच्छा आणि तशी शासनास विनंती आहे. मराठी हौशी नाटय़ स्पर्धाच्या प्रतिवर्षीच्या नाटय़-महोत्सवाचे संयोजन महाराष्ट्र राज्य शासनानेच करावे.
– डॉ. मुकुंद फडणीस, माधवनगर.

‘आम आदमी’चा लोकपाल कुठे आहे?
अरिवद केजरीवाल यांनी मोठय़ा झोकात ‘आम आदमी पार्टी’ची स्थापना करून आपल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला राजकीय परिमाण दिले. पक्षस्थापनेनंतर त्यांनी काँग्रेसच्या जावयांपासून ते मंत्र्यांपर्यंत अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत रान पेटवले. मात्र त्यांच्या पक्षातील अंजली दमानिया, प्रशांत भूषण आणि मयंक गांधी यांच्यावर जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा त्यांनी पुन्हा त्याच झोकात ‘आमच्या पक्षात अंतर्गत लोकपाल या तिघांची चौकशी करेल व दोषी आढळल्यास त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येईल’ असे सांगितले होते.
त्यासाठी तीन महिन्यांचा काळदेखील निश्चित करण्यात आला होता.
केजरीवालांच्या या विधानामुळे ते नक्कीच काहीतरी वेगळे करून दाखवतील असे वाटले होते; परंतु आज चार महिने होऊनदेखील या आरोपांचे काय झाले हे केजरीवालांनी सांगितले नाही.
जर केजरीवालांनी म्हटल्याप्रमाणे केले असते तर जनतेचा त्यांच्या वर विश्वास बसला असता, पण त्यांचे वागणेदेखील इतर राजकीय पक्षांप्रमाणेच झाले. येत्या निवडणुकीत ते लोकांकडे मते मागायला जातील तेव्हा जनता त्यांना हा सवाल विचारल्याशिवाय राहणार नाही.
– महेश भानुदास गोळे , कुर्ला,  मुंबई

‘साहेब’ नकोच
‘साहेबाने गुडघे टेकले, पण.. ’ या स्फुटातील (अन्वयार्थ, २२ फेब्रु.)  प्रतिपादन योग्य असले तरी, स्वातंत्र्य मिळून ६४ वर्षे झाल्यानंतरही अजून आपण मानसिकरीत्या गुलामच आहोत का, असा प्रश्न ‘साहेब’ या शब्दाच्या वापरामुळे पडला.
‘साहेब’ असे प्रत्येक वेळी इंग्रजांना म्हणणे अयोग्यच आहे. मी आणि माझ्यासारख्या अनेक तरुणांवर इंग्रजांना ‘साहेब’ म्हणण्याचे संस्कार नाहीत. मग आमच्यावर चुकीचा प्रभाव पडावा अशी ‘लोकसत्ता’ची इच्छा आहे का? यापुढे इंग्रजांना ‘ब्रिटिश’ अथवा ‘इंग्रज’ असेच संबोधावे, ही विनंती.
– श्रेयस परुळेकर

मातृभाषा हवीच..
‘मातृभाषा दिनाचे चिंतन’ हा मनोहर राईलकर यांचा लेख (२१ फेब्रु.) विचार करायला लावणारा आहे. जर मातृभाषेत आपण विविध सांख्यिकी आणि विज्ञान पुस्तके लिहिली, तर ती भाषिकदृष्टय़ा समजण्यासाठी खूपच सोपी जातील आणि त्यांचे आकलनही लवकर होईल. लेखक प्रा. राईलकर यांनी दिलेली काही उदाहरणे हे स्पष्ट करतात की, मातृभाषा ही ज्ञानाला समृद्ध करते.. आणि तिचा रोजच्या व शालेय जीवनात वापर करणे साऱ्यांच्या फायद्याचे ठरते!
– शरद बोदगे

‘ लोकमानस ’साठी  विरोपाने (ई-मेलने) मजकूर पाठवत आहात?
टंकांतराच्या (फाँट कन्व्हर्जन) तांत्रिक सोयीसाठी कोणतेही चिन्ह आणि पुढले अक्षर यांत एक जागा ( स्पेस ) मोकळी सोडा. वाईट दिसेल, पण टंकांतरात पुढल्या अक्षराचे नुकसान टळेल!
मजकूर युनिकोडमध्येच पाठवा, अशक्यच असल्यास ‘.आरटीएफ’ फायलीत मजकूर आणि त्याच मजकुराची ‘.पीडीएफ’ फाइलही पाठवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 12:31 pm

Web Title: honour of emotional music
Next Stories
1 इशाऱ्याकडे कोण गांभीर्याने पाहणार?
2 लग्नकार्यात उधळपट्टी कोण करत नाही?
3 पक्षपाती तामिळ संघटना
Just Now!
X