11 December 2017

News Flash

इस्लामची इभ्रत

एरवी निधर्मीवादाची पुंगी वाजवत टीव्ही वाहिन्यांचे उंबरठे झिजवणारे विचारवंतही काश्मिरी धर्ममरतडांचा सक्रिय निषेध करताना

मुंबई | Updated: February 6, 2013 1:09 AM

एरवी निधर्मीवादाची पुंगी वाजवत टीव्ही वाहिन्यांचे उंबरठे झिजवणारे विचारवंतही काश्मिरी धर्ममरतडांचा सक्रिय निषेध करताना दिसत नाहीत. कोणत्याही धर्माचा असा निलाजरा एकारलेपणा वाईटच.
कोणा निर्बुद्ध धर्मगुरूने केलेल्या विरोधामुळे काश्मिरात स्थापन झालेला पहिलावहिला मुलींचा वाद्यवृंद बंद करावा लागणार आहे. नोमा नझीर, फराह दीबा आणि अनिका खलिद या तीन मुली फक्त दहावीत शिकतात. तिघींनाही गाण्याची हौस. त्याचमुळे तिघींनी एकत्र येऊन स्वत:चा असा छोटा वाद्यवृंद स्थापन केला होता. प्रगाश या नावाच्या वाद्यवृंदाचे नुकतेच कोठे प्रयोग होऊ लागले होते. प्रगाश म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे प्रवास. परंतु इस्लाममधील धार्मिक मूलतत्त्ववाद्यांचा मुळात प्रकाशालाच विरोध असल्याने त्यांना हा प्रयोग सहन झाला नाही आणि त्यावर जोरदार टीका होऊ लागली. प्रकरण इथेच थांबले असते तर ते एक वेळ ठीक म्हणता आले असते. परंतु काश्मीरचे मुख्य धर्मगुरू म्हणवून घेणाऱ्या बशीरुद्दीन यांनी या मुलींमुळे इस्लामला धोका निर्माण झाल्याचे सांगत या मुलींनी मर्यादा पाळत बुरख्यातच राहायला हवे, असा सल्ला दिला. त्यांच्या मते, मुली अशा बाहेर चारचौघात जाऊ लागल्याने त्यांच्याविरोधात अत्याचार वाढू लागले आहेत. त्यात या अशा गाऊ लागल्या, तर चित्रपटातील नायिका आणि या मुलींत फरक तो काय, असाही प्रश्न या महाशयांना पडला आहे. इस्लामला अशा प्रकारचे संगीत मंजूर नाही, असे त्यांचे म्हणणे. परंतु इस्लाम जन्माला आला तेव्हा असे संगीत होते का, असे त्यांना कोणी विचारले काय? संगीतास विरोध असल्यास मग हे धर्मगुरू अमीर खुस्रो याचे काय करणार? अमीर खुस्रो हिंदुस्थानी संगीताचा जनक मानला जातो. या मंडळींच्या असहिष्णुतेची अमर्यादा लक्षात घेतल्यास ते खुस्रो यास काफर ठरवण्यास मागेपुढे पाहणार नाहीत आणि गालिब आदी मंडळींच्या तर त्यांनी मुसक्याच आवळल्या असत्या. तेव्हा धर्मगुरूनेच विरोध केल्याने या मुलींविरोधात वातावरण चांगलेच तापले, त्यांना धमक्या देण्यात आल्या आणि काहींची मजल तर त्यांच्यावर बलात्कार केला जाईल, असे इशारे देण्यापर्यंत गेली. अशा वातावरणात कोणत्याही शहाण्या माणसास जितके असहाय वाटते तितकेच या मुलींनाही वाटले आणि त्यांनी आपला वाद्यवृंद प्रयोग गुंडाळून टाकला. त्यानंतर त्या राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना जाग आली आणि त्यांनी या धर्मगुरूंचा निषेध केला. हे मुख्यमंत्री आधुनिक म्हणून ओळखले जातात. उच्चविद्याविभूषितही आहेत ते.  इंटरनेट, ट्विटर आदी आधुनिक जगाची माध्यमे ते वापरतात. परंतु तरीही त्यांची मजल या धर्मगुरूंचा निषेध केवळ ट्विटरवरून करण्यापर्यंतच गेली. काश्मीरला संगीताचा वारसा आहे असे या मुख्यमंत्र्यांनी टीव्हीवरील चर्चेत सांगितले आणि धर्मगुरूंची कृती अयोग्य असल्याचे ठासून नमूद केले. परंतु पुढे काय? तर काहीही नाही. या उच्चविद्याविभूषित इस्लामी तरुण मुख्यमंत्र्यास असे वाटले नाही की या थोतांड धर्मगुरूवर कारवाई करावी आणि ज्यांनी ज्यांनी या मुलींना धमक्या दिल्या त्यांच्यावर कायद्याचा बडगा उभारावा. कारभारातील अनागोंदीच्या बाबतीत हे ओमर आपले तीर्थरूप फारूख अब्दुल्ला यांच्याशीच स्पर्धा करताना दिसतात. काश्मीर जळत असताना थोरले फारूख अब्दुल्ला युरोपात गोल्फ खेळण्यात धन्यता मानत. धाकटे फारूख ट्विट करतात इतकाच काय तो फरक. मुळात काश्मीरचे मुख्य धर्मगुरू असे काही विशिष्ट पद नाही आणि असले तरी असल्या धर्मगुरूस बखोट धरून तुरुंगात डांबले जायला हवे. या मुलींच्या धाष्टर्य़ाची, त्यांच्या कलासक्ततेची तारीफ सगळय़ांनीच केली. परंतु अतिरेकी इस्लामी धर्मगुरूंपासून त्यांना वाचवण्यासाठी कोणीच पुढे येताना दिसत नाही. एरवी निधर्मीवादाची पुंगी वाजवत टीव्ही चॅनेल्यांचे उंबरठे झिजवणारे विचारवंतही या काश्मिरी धर्ममरतडांचा सक्रिय निषेध करताना दिसत नाहीत. कोणत्याही धर्माचा असा निलाजरा एकारलेपणा वाईटच. मग तो हिंदू असो वा इस्लाम. परंतु आपल्याकडील हे तथाकथित बुद्धिवंत हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांचा निषेध करण्यासाठी जेवढय़ा अहमहमिकेने पुढे सरसावतात तेवढीच त्यांची जीभ इस्लामातील वाईट प्रवृत्तींचा निषेध करण्याची वेळ आली की टाळूस चिकटते. एखाद्या पंडिताने वा हिंदू धर्मगुरूने असा अगोचरपणा केला असता तर मेणबत्ती संप्रदायही मोठय़ा प्रमाणावर निषेधासाठी बाहेर पडला असता आणि चॅनेलचर्चेचे फड जोरजोरात रंगले असते. काश्मिरातील इस्लामी धर्मगुरूंबाबत मात्र सर्वानीच मौन बाळगलेले दिसते. या त्यांच्या लबाडीस काय म्हणावे? या मंडळींचे हे दुतोंडीपण अलीकडच्या काळात वारंवार पुढे येऊ लागले आहे. यातील बरेचसे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबतही गळा काढीत असतात. हल्ली विचारवंत वगैरे म्हणवून घेणारे अनेक सुमार पोपट पाकिस्तानात जाऊन येतात आणि भारताने शेजारी देशाशी मैत्री वाढवण्यासाठी काय करायला हवे याची शहाजोग वटवट करतात. भारतात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारामुळे या मंडळींचे हृदय द्रवते. परंतु पाकिस्तानात झपाटय़ाने कमी होत जाणाऱ्या अल्पसंख्याकांविषयी यांनी कधी चिंता व्यक्त केल्याचे आठवत नाही. भारताबरोबर पाकिस्तान स्वतंत्र झाला तेव्हा त्या वेळी त्या देशात शीख, सिंधी आदी धर्मीयांचे प्रमाण २० टक्के इतके होते. पाकिस्तानी इस्लामी जनतेच्या तुलनेत अन्य धर्मीय आता तेथे दोन टक्के इतकेही नाहीत. परंतु पाकिस्तानच्या आठ-दहा दिवसांच्या दौऱ्यात तेथील शिरकुम्र्यास जागत हे बिर्याणीबहाद्दर त्या देशातील अल्पसंख्याकांच्या अवस्थेबाबत अवाक्षरही काढताना दिसत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानात राहून भारतातील मुसलमानांच्या सुरक्षिततेविषयी खोटेनाटे अo्रू ढाळणाऱ्यांना मग या मंडळींमुळे बळ येते. पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त मुसलमान राहतात आणि ते पाकिस्तानपेक्षा भारतातच अधिक सुरक्षित आहेत अशा शब्दांत यापैकी कोणी पाकिस्तानला ठणकावल्याचे दिसणार नाही. या साऱ्यातून या मंडळींच्या वैचारिक अप्रामाणिकपणापेक्षा लबाडीच अधिक दिसून येते. ही लबाडीही राजकीयदृष्टय़ा त्यांचे पुरोगामित्व मिरवण्यासाठी सोयीची असल्याने सगळय़ांचेच हितसंबंध राखले जातात.
काश्मीरच्या भूमीत जे काही घडत आहे, त्या निमित्ताने हे पुन्हा एकदा दिसून आले. गेल्याच आठवडय़ात इस्लामी मंडळींच्या विरोधामुळे सलमान रश्दी यांना कोलकोत्यात येण्यापासून प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रोखले. इस्लामी जनतेच्या भावना दुखावल्या जातील अशी भीती त्यांना वाटली. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनाही अशीच भीती वाटली आणि त्यांनी कमल हासन याच्या सिनेमाचे प्रदर्शन रोखले. यातील एकाही प्रकरणाचा निषेध गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे वा माजी गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी केल्याचे दिसले नाही. पंतप्रधानांच्या लाकडी व्यक्तिमत्त्वाकडून अशा जिवंत निषेधाची अपेक्षा नाही. परंतु हिंदू दहशतवादाविरोधात अलीकडे बोंब ठोकणारे चिदम्बरम आणि शिंदे हे काश्मीर वा तामिळनाडूतील अतिसंवेदनशील इस्लामी जाणिवांबाबत काही भाष्य करीत नाहीत, हे पुरेसे बोलके मानावयाचे काय? या सगळय़ात उजळून दिसले ते अर्थवेत्ते अमर्त्य सेन यांचे प्रतिपादन. मुसलमानांनी सलमान रश्दीचे काय होते वगैरेपेक्षा आपल्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे, त्यांची त्यांना जास्त गरज आहे, अशा शब्दांत सेन यांनी आपली भूमिका मांडली. बोटचेप्यांच्या गर्दीत सेन त्यामुळेच उठून दिसले.
याचे कारण हे की, इस्लामला खतरा असलाच तर तो अतिरेकी धर्मगुरू आणि भंपक निधर्मीवादी यांच्याकडूनच अधिक आहे. इस्लामची इभ्रत राखायची असेल तर हे आधी मान्य करायला हवे.

First Published on February 6, 2013 1:09 am

Web Title: honour of islam