ऑस्ट्रेलियातील ओलिसनाटय़ाने धार्मिक कट्टरतावादाचा धोका किती मोठा, भयंकर आणि सर्वव्यापी आहे आणि सुसंस्कृत जग त्यापुढे किती हतबल होत चालले आहे हेच पुन्हा एकदा दाखवून दिले. धार्मिक दहशतवादाचा मुकाबला करणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही; तितकीच ती केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न समजून हाताळण्यायोग्य नाही हे वास्तवही या घटनेने समोर आणले आहे. याचे कारण म्हणजे सिडनीतील ती घटना हा वैयक्तिक दहशतवादाचा प्रकार होता. जगभरातील दहशतवादाची समस्या ही प्रामुख्याने संघटित गटांनी, संघटनांनी निर्माण केलेली आहे. अशा संघटनांचा प्रतिकार करणे हे अवघड असले तरी अशक्य नसते. पोलीस, लष्कर यांचा वापर करून अशा संघटना नामशेष करता येतात.  पण एकेकटय़ा व्यक्तीच्या पातळीवरून जर दहशतवादी कारवाया घडत असतील, तर त्या कशा रोखायच्या? सिडनीतील हॉटेलातील ग्राहक-कर्मचाऱ्यांना ज्याने शस्त्रांच्या धाकावर ओलिस ठेवले तो मन हरून मोनिस नावाचा दहशतवादी हा कोणत्याही दहशतवादी संघटनेचा क्रियाशील सदस्य नव्हता. त्याची आतापर्यंत जी माहिती उपलब्ध झाली आहे, त्यावरून तो एक धर्मवेडा माथेफिरू होता. त्याच्याविरुद्ध विनयभंगापासून पत्नीच्या खुनात मदत केल्या प्रकरणापर्यंतचे अनेक गुन्हे दाखल होते. पण आपण म्हणजे विकिलिक्सचे असांज असल्याचा त्याचा समज होता आणि असांज यांच्याप्रमाणेच सरकारने आपल्याला खोटय़ा गुन्हय़ांमध्ये अडकविले असल्याचे त्याचे म्हणणे होते. गुन्हेगारी प्रवृत्ती आणि त्याला धार्मिक कट्टरतावादाची जोड मिळाल्यानंतर जे होणार त्याचे मूर्तिमंत रूप म्हणजे हा माथेफिरू. अशा धार्मिक अतिरेक्यांची संख्या वाढतच चालल्याचे प्रत्यही दिसत असून, त्यांचा मुकाबला कसा करायचा हा यापुढचा मोठा प्रश्न असणार आहे. अशा घटना घडल्यानंतर वा घडत असताना एक समाज म्हणून आपली प्रतिक्रिया काय असते हेही येथे महत्त्वाचे ठरते. समाजाच्या प्रतिक्रियांना वळण लावण्याचे काम माध्यमे करू शकतात. पण अशा वेळी माध्यमांचा तोल सुटला तर? सिडनीमध्ये तसे झाले नाही. मुंबईतील छाबड हाऊसवरील कमांडोंच्या कारवाईचे थेट प्रक्षेपण करून आपल्या वृत्तवाहिन्यांनी दहशतवाद्यांनाच नकळत मदत केल्याचे आता उघड झाले आहे. ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी मात्र सुरक्षा दलांच्या कारवायांचे थेट प्रक्षेपण करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क मानला नाही. त्यांनी ते थांबविले. तशी ही छोटी गोष्ट. परंतु दहशतवादाविरुद्धची लढाई अशा विवेकनिष्ठ गोष्टींतूनच जिंकता येण्यासारखी असते. एरवी ऑस्ट्रेलिया हा देश आक्रमक वंशवाद्यांचे आगर म्हणून ओळखला जातो, पण या वेळी मात्र तेथील अनेक नागरिकांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांप्रमाणेच विवेकाची कास धरली. सिडनीतील ओलिसनाटय़ ही असंख्य ऑस्ट्रेलियन नागरिकांसाठी धक्कादायक अशीच गोष्ट होती. ती घडविणारा एक मुसलमान होता. अशा वेळी सगळेच मुसलमान दहशतवादी नसतात, पण सगळेच दहशतवादी मुसलमान असतात अशी मूर्ख तर्कटे आपल्याकडेही लढविली जाणार हे ओळखून काही सुसंस्कृत नागरिक तेथील मुसलमानांच्या पाठीशी उभे राहिले. मुसलमानांना बसमधून, रेल्वेतून प्रवास करताना धार्मिक अतिरेक्यांचा वा वंशवाद्यांचा त्रास होऊ नये यासाठी अनेकांनी त्यांच्याबरोबर प्रवास करण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी ट्विटरवरून आवाहने करण्यात आली. ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे. धार्मिक कट्टरतावादी हे असहिष्णूच असतात. त्यांचा सामना करताना आपणही तसे बनायचे नसते, हे या छोटय़ा कृतीतून या नागरिकांनी दाखवून दिले. दहशतवादविरोधी लढाई अवघड खरी पण अशक्य नाही, अशी आशा जागवणारीच ही घटना म्हणायची.